पार्ले-जीचे बिस्किट खाल्ले नाहीये, असे लोक भारतात फार कमी असतील. दुकानदाराला “बिस्किट द्या”, म्हणले, की तो हातात पार्ले-जीचा पुडा ठेवेल, इतके हे बिस्किट लोकप्रिय आहे. कारण, हे बिस्किट स्वस्त असते, ते गोड असते, आणि त्याने झटकन पोट भरते! 😊
पार्ले-जीला जवळपास शंभर वर्षांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मोहनदास दयाळ नावाच्या व्यापाऱ्याने मिठाईचा कारखाना सुरू करण्यासाठी इर्ला-पार्ला या मुंबईच्या उपनगरात एक जागा घेतली. ते त्याआधी जर्मनीला जाऊन मिठाई तयार करायचे प्रशिक्षण घेऊन आले होते आणि त्यासाठी लागणारी यंत्रही त्यांनी आयात केली होती. १९२९ मध्ये कुटुंबातल्याच १२ सदस्यांसह मिठाईचा व्यवसाय सुरू झाला. बिस्किटांचा व्यवसाय मात्र १९३९ मध्ये, तब्बल दहा वर्षांनी सुरू झाला. तेव्हाच्या ब्रिटिश राजवटीत सामान्य माणसाला परवडतील अशी बिस्किटेच मिळत नव्हती. स्वदेशी चळवळीने प्रेरित होऊन मोहनदास यांनी स्वस्त आणि चविष्ट बिस्किटे तयार करून विकायची, असे ठरवले, आणि, कणीक, साखर आणि ग्लुकोज असलेल्या “पार्ले ग्लुको” या बिस्किटाचा जन्म झाला.
या “पार्ले ग्लुको” नावाचीही एक गंमत आहे. बिस्किटे तयार करून, ती विकण्याच्या प्रक्रियेत दयाळ कुटुंब इतके व्यग्र होते, की बिस्किटाच्या नावाबद्दल त्यांनी फारसा विचारच केला नव्हता. शेवटी, कारखाना “विलेपार्ले” या मुंबईच्या उपनगरात होता, म्हणून त्यातले “पार्ले” आणि ग्लुकोजचे बिस्किट, म्हणून “ग्लुको” असे दोन शब्दांचे नाव असलेले बिस्किट बाजारात आले.
१९६० पासून इतर बिस्किट कंपन्याही त्यांची ग्लुकोजची बिस्किटे घेऊन बाजारात आल्या. लोकांचा गोंधळ व्हायला लागला. पार्ले-ग्लुको समजून लोक वेगळेच बिस्किट घ्यायला लागले. म्हणून मग ’एव्हरेस्ट’ या जाहिरात कंपनीला पार्ले-ग्लुकोचे नवीन रूप तयार करायचे, अर्थात ब्रॅंडिंग करायचे काम दिले गेले. एव्हरेस्टमधल्या मगनलाल दहिया यांनी हातानेच एका लहान, गुबगुबीत गालांच्या, गोंडस मुलीचे चित्र काढले आणि तेव्हापासून ती छोटी मुलगी “पार्ले-ग्लुको”ची “ब्रॅंड ऍम्बॅसॅडर” झाली! (ती मुलगी मालकांचीच होती, तो सुधा मूर्ती यांचा लहानपणीचा फोटो आहे अशा अनेक खोट्या बातम्या अनेक वर्ष फिरत होत्या. अखेर, पार्ले कंपनीने स्पष्ट शब्दांत सांगितले, की ती मुलगी काल्पनिक आहे.) मगनलाल यांनी लहान मुलीचे चित्र काढले, कारण पार्ले-ग्लुको लहान मुलांनासुद्धा आवडेल- असे त्यांना सूचित करायचे होते.
१९८० मध्ये आणखी एक बदल करण्यात आला, “पार्ले-ग्लुको”चे “पार्ले-जी” एवढेच छोटे सुटसुटीत नाव केले गेले. एव्हाना ’जी’ म्हणजे ग्लुकोजचे बिस्किट हे लोकांना माहित झाले होते, म्हणून “जी माने जिनियस” अशी जाहिरात केली गेली.
लोगो म्हणून पाहिले, तर पुड्यावर “पार्ले-जी” हे शब्द ठळक अक्षरात लिहिलेले आहेत आणि खाली मुलीचे चित्रही आहे. म्हणजेच, शब्द+चित्र असे दोन घटक असलेला हा लोगो आहे. पार्ले कंपनीच्या इतर उत्पादनांसाठी त्यांचा वेगळा लोगो आहे. मुलगी असलेला हा लोगो फक्त पार्ले-जीसाठीच आहे, हे विशेष.
अगदी पहिल्यापासूनच पार्ले-ग्लुको लोकांच्या पसंतीस उतरले. आजही या बिस्किटांचे लाखो पुडे रोज विकले जातात. हे बिस्किट भारताचे बिस्किट आहे, असे म्हणले तरी चालेल. बाजारात ग्लुकोजची अनेक बिस्किटे आहेत,
पण बिस्किट = पार्ले-जी आणि पार्ले-जी = छोट्या मुलीचे चित्र, हे मात्र नक्की!😀
****


0 comments:
Post a Comment