March 18, 2024

फॅक्स

Mam, “फॅक्स” म्हणजे काय?   

मी सध्या शिकवते त्या कंपनी कायद्यामध्ये कंपनीशी किंवा संचालकांशी संपर्क साधण्याचे एक साधन म्हणून “फॅक्स”चा उल्लेख अनेकदा येतो. असंच एकदा मी विद्यार्थ्यांना “तुम्ही कधी पोस्टात गेलाय का? रजिस्टर्ड पोस्ट केलंय का?” असं विचारलं होतं तेव्हाही माना आडव्या हलल्या होत्या. त्यामुळे त्यांना फॅक्स मशीन माहीत असणं शक्यच नव्हतं. एका क्षणात मी त्यांच्या वयाची झाले.

गाड्या, यंत्र, भांडी, साड्या अशा वस्तूंबद्दल काही लोकांना आकर्षण असते. तसे मला का कोणास ठाऊक, पण फॅक्स मशीनचे फार आकर्षण वाटायचे. मला जादूचे मशीन वाटायचे ते. माझी पहिली नोकरी होती सॉफ्टवेअर कंपनीत. तिथे झाडून सगळी अद्ययावत यंत्र होती. पीसी तर होतेच, पण प्रिंटर, फॅक्स आणि झेरॉक्स मशीनही होतं! तिथल्या किशोर नावाच्या प्यूनने माझा आणि फॅक्स मशीन चा परिचय करून दिला.

 


 

“शहा एक फॅक्स करतील आत्ता दहा मिनिटात, त्याप्रमाणे काम करून घे”, असं एके दिवशी मला बॉस म्हणाला. शहा हे कंपनीचे वकील. ते म्हणतील ती पूर्व दिशा. मी मान डोलावून फॅक्स मशीनपाशी जाऊन उभी राहिले. किशोर तिथेच बसलेला होता. “फॅक्स आला की आणून देतो”, तो म्हणाला. “मला बघायचा आहे”, मी म्हणाले. तो माझ्याकडे पाहून हसला.

आणि आला, फॅक्स आला!

वावा! अजूनही ते दुष्यं डोळ्यापुढे आहे... आधी रिंग वाजली, किशोरने रिसिव्हर उचलून ऑनचे बटण दाबले आणि जादू झाल्याप्रमाणे मशीनमधून चकाकता कागद गोल गोल फिरत बाहेर यायला लागला. त्यावर शहांचं हस्ताक्षर! जणू काही ते लांबून, तिथून माझ्या हातात त्यांच्या कागदाची फोटोकॉपीच देत होते. कसली जादू ही! फार फार भारी वाटलं मला. किशोरने सराईतपणे तो कागद रोलमधून फाडला आणि म्हणाला, “यावरची शाई उडून जाते बरंका. मॅटर महत्वाचा असेल तर झेरॉक्स काढून ठेवा फाईलला.” हे आणखी एक नवल! फारच रॉयल कारभार.

मग मला फॅक्सची भुरळच पडली. एरवी एखादा ड्राफ्ट तयार केला, की शहांना मी ईमेल करायचे, किंवा फोनवर वाचून दाखवायचे. आता प्रिंट करून वर “To Mr. Shah for approval as discussed असं झोकात लिहून स्वत: फॅक्स करायचे. तो चकचकीत कागद किती मस्त होता. पुढे नोकरी बदलली, ती कंपनी तर listed होती. तिथे सतत फॅक्स यायचे किंवा करायला लागायचे. एव्हाना मी स्वत: फॅक्स करत नव्हते, त्यासाठी लोक होते, पण त्यांनी फॅक्स केला, की समोरच्या पार्टीला फोन करून खात्री करून घेणे, मला फॅक्स आला असेल, तर तो कोणाचा आहे, काय काम आहे, तो अस्पष्ट असला तर उलट फोन करून परत करायला लावणे ही कामे  मी अगदी आनंदाने करायचे.  वेळोवेळी जुन्या फायलींमधले कागद आम्ही नष्ट करायचो, त्यातही हे फॅक्सचे शाई उडालेले, नुसते चकचकीत कागद असायचे. ते फाडून फेकून देणे जिवावर यायचे माझ्या. मग मी ते काहीतरी scribble करायला ठेवून द्यायचे आणि मगच टाकून द्यायचे. एक काळ असा होता, की कॉम्प्युटरपेक्षाही प्रिंटर, फॅक्स आणि फोटोकॉपी या यंत्रांमध्येच असायचे मी.

या फारच पुरातन काळातल्या गोष्टी झाल्या. (cassettes, cds, व्हिडिओ cassettes, vcr players, pagers प्रमाणे)  ईमेल्स आणि आताच्या  whatsapp क्रांतीमुळे तार, पत्र, फॅक्स हे प्रकार कालबाह्य झाले आहेत. कायद्यात तरतुदी आहेत, म्हणून मोठ्या कंपन्यांमध्ये असतीलही फॅक्स मशीन. पण मला फॅक्स करायचा असेल, तर कुठून करू? त्यामुळे या सगळ्या “आमच्या वेळेच्या आठवणी” फक्त.

विद्यार्थ्यांच्या चार शब्दांच्या प्रश्नाला ४०० शब्दांचे उत्तर दिले मी! तेही पूर्णपणे irrelevant. मारकांच्या दृष्टीने संपूर्ण बिनामहत्त्वाची माहिती! म्हणून मला विद्यार्थी सहसा प्रश्नच विचारत नाहीत.

पण चुकून विचारला तर मला लिहायला विषय मिळतो, तो असा!       

February 27, 2024

अतीलघुकथा (अलक)

 इंग्रजी साहित्यात लेखनाचे अनेक प्रयोग होत असतात. Terribly Tiny Tales (TTT)  हा त्यातलाच एक प्रकार. मराठीत त्याला ’अतीलघुकथा’ किंवा ’अलक’ म्हणतात. मराठीत शतशब्दकथा, अलक लिहितात लोक, पण प्रमाण कमी. मला लेखक म्हणून हे असे प्रयोग करायला फार आवडतं. एक तर आपला साचा मोडून वेगळा विचार केला जातो, त्यात जे आव्हान असतं, ते पेलता येतं का हे तपासून बघता येतं आणि जमलं लिहायला, तर छानही वाटतंच की! 😄

आज २७ फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिवस. त्या निमित्तानं माझ्या या तीन अतीलघुकथा. कथा लांबीने ’लघु’ असल्या, तरी आशय सखोल आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा.

*****

१.

“तू मला कधीच विसरणार नाहीस ना?”, ती त्याच्या कानात कुजबुजली.

 “कधीच नाही”, तो तिच्या फोटोचं चुंबन घेत म्हणाला.💔

***

२.

“तुमच्या लग्नाला ५० वर्ष झाली. तुमच्या सुखी संसाराचं रहस्य मला सांगाल का?”, बातमीदारानं उत्साहानं विचारलं.

“बघू”, पती म्हणाला.

“आत्ता नाही”, पत्नी म्हणाली.

 😜😁

***

३.

“दारात रांगोळी, देवाची प्रसन्न पूजा, चंदनाची उदबत्ती, केसात गजरा, नवीन ड्रेस, जेवायला गोड… आज कोणता सण आहे?”, त्याने आश्चर्यानं विचारलं.

“आज माझा वाढदिवस आहे”, शांतपणे हसून ती म्हणाली 😊

***

February 21, 2024

मी तुझ्या पाठीशी आहे!

 “ओपेनहायमर”साठी किलियन मर्फीला या वर्षीचे सर्वोत्तम अभिनेत्याचे एमी आणि बाफ्टा अवॉर्ड मिळाले आहे आणि आता मार्च महिन्यात दिले जाणारे प्रतिष्ठित, सर्वोच्च मानाचे ऑस्कर अवॉर्डही बहुतेक मिळेलच.

विक्रांत मासीला या वर्षी “ट्वेल्थ फेल”साठी फिल्मफेअरचे सर्वोत्तम अभिनेत्याचे क्रिटिक्स अवॉर्ड मिळाले.

किलियन २००२पासून अभिनय करतोय. नोलानबरोबर तो २००५ पासून काम करतोय, नोलानच्या तीन सिनेमांमध्ये तो झळकलादेखील, पण दुय्यम भूमिकांमध्ये. त्याच वेळी त्याचा स्वतंत्र प्रवास सुरू होताच. ’पीकी ब्लाइंडर्स’ने मात्र तो लोकांच्या नजरेत भरला. जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या व्यक्तीरेखेसाठी नोलानला तोच योग्य वाटला. आणि आज अत्यंत प्रतिष्ठेचे सन्मान त्याच्याकडे चालून येत आहेत. लोक त्याचं कौतुक करताना थकत नाहीयेत- त्याला हातचं राखून अभिनय त्याला येत नाही, तो पात्राच्या व्यक्तिमत्त्वात स्वत:ला झोकून देतो, कमी बोलतो, विचार अधिक करतो, प्रचंड मेहनत घेतो… वै वै. शिवाय त्याचे निळे, काहीसे पारदर्शक डोळे, उंच गालफडं आणि प्रसिद्धीपासून लांब राहणं त्याच्या गूढपणात भर घालतंय. 


 

विक्रांत मासीचीही कहाणी साधारण अशीच आहे. २००७ पासून तोही अथक काम करतोय, अनेक गाजलेल्या टिव्ही मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये तो होता. पण पब्लिकच्या नजरेत भरत नव्हता, इतकंच. झोया अख्तरने तिच्या ’दिल धडकने दो’च्या तगड्या स्टारकास्टमध्ये त्याला एक महत्त्वाची भूमिका दिली, ’छपाक’मध्ये दिपीकाचा तो प्रियकर होता, तर ’लूटेरा’मध्ये रणवीरचा मित्र. ’डेथ इन द गूंज’मध्ये तर तो मुख्य भूमिकेत होता. कोंकणा सेनने दिग्दर्शित केलेल्या या जबरदस्त इन्टेन्स सिनेमात त्याला मुख्य भूमिका मिळाली, हे त्याच्यावर झालेलं शिक्कामोर्तबच. पण “ट्वेल्थ फेल” हा सिनेमा, त्याचा अप्रतिम विषय, माहितीच्या कहाणीची प्रभावी मांडणी आणि विधू विनोद चोप्राचे दिग्दर्शन! विक्रांत मासी ’माहित’ होता, तो एकदम लोकप्रिय झाला. त्याचं मध्यमवर्गीय दिसणंही एकदम आवडायला लागलं, त्याचा साधा चेहऱ्यालाही स्टारडम आलं!


 

सांगायचा मुद्दा काय, की गुण प्रत्येकात असतात, कष्ट प्रत्येक जण घेत असतो. पण तेवढं पुरत नाही. पाठीशी द्रष्टा आणि खंबीर ’कर्ताकरविता’ आवश्यक असतोच. किलियनला नोलन मिळाला, विक्रांतला चोपडा आणि या हिऱ्यांना साजेसं कोंदण मिळालं.

असं नशीब प्रत्येकाचं नसतं. अनेक जण केवळ धडपडच करत राहतात, पण नशीबाची पुरेशी आणि योग्य वेळी साथ न मिळाल्यामुळे तसे दुर्लक्षित राहतात. एखाद्याची जेवढी क्षमता आहे, तेवढा तिचा पुरेपूर वापर करणाराही कोणीतरी हवा ना! म्हणूनच, ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे, आणि स्वत:वर, स्वत:च्या निवडीवर जास्त विश्वास आहे, असा “मी तुझ्या पाठीशी आहे” म्हणणारा कोणीतरी प्रत्येक लायक व्यक्तीला मिळो, ही देवापाशी, अर्थात या जगाच्याच दिग्दर्शकाकडे प्रार्थना.  

*********