ज्यांच्यावर गुरूकृपा झालेली आहे, ते भाग्यवान असतात!
माणसांच्या या अथांग सागरात काही मोजक्या लोकांवरच खऱ्या अर्थाने भगवंताची/ अध्यात्मिक गुरूची अथवा एखाद्या ऋषीतुल्य व्यक्तीची कृपा होते. भले गुरूंना लाखो शरण जाऊदेत, पण आपल्या छत्राखाली घेण्याच्या पातळीचं कोण आहे, याचा निर्णय गुरूंचाच असतो! जे खरे गुणवंत असतात, त्यांच्यावरच गुरुकृपा होते. आणि त्यानंतर आनंदीआनंद! त्यांच्या साऱ्या चिंताच मिटतात! खांद्यावरचं चिंतांचं, अपेक्षांचं, परिपूर्तीचं ओझं गुरूंच्या सहज स्वाधीन करता येतं. पुढचा मार्ग गुरूच दाखवतात.
सुयोग्य गुरू लाभणं, आणि त्यांनी आपल्याला स्वीकारणं यासाठी खचितच पूर्वपुण्याई लागत असणार. कारण, ही कृपा प्रत्येकावर होत नाही.
गुरुंच्या कृपाछत्राखाली असण्याची भावना किती सुखद असते! कोणत्याही प्रश्नाचं, समस्येचं, त्रासाचं उत्तर मागण्यासाठी गुरूंकडे जाता येतं, मानसिक द्वंद्व असेल, उलथापालथ होत असेल, भावनांचा निचरा करायचा असेल, वाट चुकली असेल… गुरूंना शरण जाता येतं. तिथे सगळा अहंकार गळून पडतो, उकल होत जाते, गुंता सुटत जातो, उत्तरं मिळायला लागतात. ’मला कोणाची गरज नाही, मी स्वयंपूर्ण आहे, मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही’ अशा या मी-पणाच्या काळात गुरूंचं केवळ ’असणं’ किती आधार देतं याची कल्पनाच अहंकारी, मूढ व्यक्तींना येणार नाही. They don’t know what they are missing. They should take time to reflect, at least today.
म्हणून, गुरुपौर्णिमा महत्त्वाची, कारण गुरुविण नाही दुजा आधार!

0 comments:
Post a Comment