July 13, 2026

लोगोकथा - व्हॉट्सॅप

 अगदी सहा-सात वर्षांच्या लहान मुलांपासून पंच्याहत्तर-ऐंशी वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत प्रत्येक जण वापरतो, त्या मोबाईल ऍप्लिकेशनचे नाव आहे, “व्हॉट्सॅप”. एकमेकांशी थेट संवाद साधता येणे, हे या ऍपचे वैशिष्ट्य आहे.

करोनाच्या साथरोगाच्या काळात शाळा बंद झाल्या आणि वर्ग “ऑनलाईन” भरायला लागले. त्या ऑनलाईन वर्गाची लिंक मुलांच्या पालकांच्या व्हॉट्सॅपवरच यायला लागली, शाळेचा गृहपाठ, पाठ्यपुस्तकांशिवाय इतर शैक्षणिक माहिती, व्हिडिओ व्हॉट्सॅपवरच यायला लागल्या, आणि अचानक लहान मुलांसाठी व्हॉट्सॅप अनिवार्य झाले! आजी-आजोबा मंडळींसाठी तर व्हॉट्सॅप “अतिशय आवश्यक” गटातले ऍप झाले, कारण ते घरबसल्या त्यांच्या नातेवाइकांशी आणि मित्र-मैत्रिणींशी छानपैकी गप्पा मारायला लागले. त्यानंतर काही महिन्यांनी कोव्हिड गेला, पण तोपर्यंत व्हॉट्सॅपने सर्वांच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवला, तो कायमचाच.  

व्हॉट्सॅपचे जनक आहेत ब्रायन ऍक्टन आणि यान कोम. २००९ मध्ये आय-फोन बघितल्यावर ब्रायनच्या असे लक्षात आले, की संवाद आणि संपर्काचे माध्यम म्हणून मोबाईलमधल्या ऍप्लिकेशन्सचे महत्त्व फारच वाढणार आहे. म्हणून, त्यानेही मित्र, परिवार आणि व्यवसाय या सर्वांशी सहज संवाद साधेल असे ऍप तयार करायचे ठरवले. ब्रायन, यान आणि आणखी पाच मित्रांनी स्वत:चे पैसे घातले, निधी मिळवला आणि व्हॉट्सॅपची सुरूवात केली.

“व्हॉट्सॅप” हा शब्द इंग्रजी बोलीभाषेतून तयार झालेला आहे. दोन लोक भेटले, की एकमेकांना मराठीत, ’कसा आहेस?’ असं विचारतात. त्याचेच इंग्रजी रूप आहे, ’व्हॉट्स अप?” ब्रायनने त्याच्या ऍपसाठी हेच शब्द निवडले. त्यातला ’व्हॉट्स’ हा भाग त्यांनी कायम ठेवला. आणि, ते मोबाईलवरचे ’ऍप्लिकेशन’ आहे, म्हणून ’अप’चे झाले ’ऍप’ आणि तयार झाले, “व्हॉट्सॅप”.       

सुरूवातीपासूनच व्हॉट्सॅपवर संवादाची पद्धत मुद्दामच अतिशय सोपी ठेवलेली आहे. त्यामुळेच व्हॉट्सॅप बघताबघता लोकप्रिय झाले. २०१३ मध्ये फेसबुकने ते विकत घेतल्यावर त्याची लोकप्रियता आणखी वाढली. आजही, व्हॉट्सॅप हे संवादासाठी सगळ्यात जास्त वापरले जाणारे ऍप आहे.

’हिरव्या रंगाच्या ’चॅट बबल’वर टेलिफोनचा रिसिव्हर’ असा व्हॉट्सॅपचा लोगो आहे. हा लोगोही २००९ पासून अगदी असाच आहे- स्पष्ट आणि साधा. चॅट बबल म्हणजे काय? तुम्ही कॉमिक्स वाचता ना? त्यात दोन पात्र एकमेकांशी बोलतात, तेव्हा त्यांचे संवाद एका गोलात लिहिलेले असतात. जे पात्र संवाद बोलत असते, त्याच्या दिशेने गोलातून एक बाण जातो. आठवले? त्या चॅट बबलचा अर्थ आहे, कोणीतरी बोलत आहे. आणि, पूर्वी लॅंडलाइन फोन होते, त्याच्या रिसिव्हरचे चित्र लोगोमध्ये वापरले आहे. कारण, रिसिव्हरचा अर्थही तोच आहे : कोणीतरी बोलत आहे. थोडक्यात, व्हॉट्सॅपचा लोगो सांगतोय… बोला!         

आणि खरोखर, जगभरातले लोक व्हॉट्सॅपवर रोजच भरभरून बोलत आहेत. निरोप, गप्पा, प्रश्न, उत्तरे, बातम्या, फोटो, वर्णने, कथा, कविता, लेख, मुलांचे अभ्यास, माहितीची देवाणघेवाण, व्हिडिओ, स्टेटस, व्हॉइस मेसेजेस… सारे काही व्हॉट्सॅपवर अव्याहत सुरू आहे. व्हॉट्सॅप इमोजीची एक स्वतंत्र भाषा आहे. फक्त इमोजीमधून दोन जण एकमेकांशी बोलू शकतात, इतके हे इमोजी परफेक्ट आहेत.

ब्रायनचा अंदाज अचूक ठरलाय. लोक एकमेकांशी ऍपवरच बोलत आहेत, आणि त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहन देतोय एक साधा हिरवा-पांढरा लोगो!  

****  


 

0 comments: