June 3, 2026

लोगोकथा - फेसबुक

या महिन्याची #लोगोकथा आहे "फेसबुक"च्या लोगोबद्दल.

“सोशल मीडिया” हा शब्द ज्या ऍपमुळे अस्तित्वात आला, ते ऍप म्हणजे फेसबुक! “फेसबुक” वाचल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर निळ्या पार्श्वभूमीवर लिहिलेले “एफ” हे अक्षर आले असेलच. ही आहे त्या लोगोची ताकद. ’त’ वरून ताकभात, ही म्हण तुम्हाला माहित असेल. त्याचप्रमाणे, आजच्या जगात ’एफ’ म्हणजे फेसबुक म्हणावे, इतके हे ऍप लोकप्रिय आहे.

फेसबुकचा संस्थापक आहे मार्क झकरबर्ग. २००३ मध्ये मार्क अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापिठात शिकत होता. प्रचंड मोठ्या विद्यापिठात मुलामुलींना बुजल्यासारखे व्हायचे, चटकन नवीन मित्र व्हायचे नाहीत. मार्क स्वत:ही स्वभावाने लाजाळू होता. म्हणून त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून फक्त हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसाठी ’फेसबुक’ नावाची एक वेबसाईट तयार केली. या वेबसाईटवर समान आवडी असलेले विद्यार्थी एकमेकांना आधी ’ऑनलाईन’ भेटायचे आणि मग पुढे मैत्री झाली, तर प्रत्यक्ष भेटायचे. ही कल्पना विद्यार्थ्यांमध्ये इतकी ’हिट’ झाली, की इतर विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनीही त्याची मागणी केली. टप्प्याटप्प्याने, २००६ पासून १३ वर्षांवरच्या जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीला फेसबुक.कॉमवर लॉगिन करण्याची सोय सुरू करण्यात आली.

फेसबुकचा पहिला लोगो असा दिसत होता : [thefacebook] माइक बझर्ड आणि जो क्राल या दोघांनी हा लोगो तयार केला होता. यात पार्श्वभूमीला गडद निळा रंग होता आणि द फेसबुक हे शब्द फिक्या निळ्या रंगात लिहिलेले होते. २००५ मध्ये शॉन पार्कर या फेसबुकच्या अध्यक्षाच्या आग्रहामुळे त्यातला ’द’ शब्द वगळला गेला. तो शब्दच अनावश्यक आहे, असे शॉनचे मत होते. त्याचे म्हणणे योग्य सिद्ध झाले. २००५ पासून बाजूचे दोन कंस आणि द हा शब्द गाळला गेला. लोगोच्या रंगामध्येही बदल केला गेला. पार्श्वभूमी निळ्या रंगाचीच राहिली, पण अक्षरे मात्र आता पांढऱ्या रंगात लिहिली गेली. या अक्षरांच्या ’फॉन्ट’चे नाव आहे- क्लाव्हिका. यात जोरकसपणे अक्षरे उमटतात. त्यामुळे फेसबुक हा शब्द ठळकपणे लोकांना दिसायला लागला आणि लक्षात रहायला लागला. २००५ ते २०१५ पर्यंत हाच लोगो होता. याच काळात सोशल मीडियाचा वापर हळूहळू वाढायला लागला. आपल्या लोगोमुळे आणि अर्थातच, जे हवे ते व्यक्त करण्याच्या सुविधेमुळे फेसबुक या कंपनीने जम बसवला.

फेसबुक.कॉम या वेबसाईटसाठी लोगोमध्ये २०२१ मध्ये मोठा बदल करण्यात आला. फेसबुक सुरू झाल्यापासून लोगोची पार्श्वभूमी निळ्या रंगाची आणि अक्षरे पांढऱ्या रंगाची होती. आता उलटापालट करण्यात आली. आता पार्श्वभूमी पांढरी आणि अक्षरे निळी झाली. याच दरम्यान लोगोची मोबाईलवरून वापरण्यासाठी एक छोटी आवृत्ती तयार केली गेली. मोबाईल फोनवर ऍपचा चौकोन अगदी छोटा दिसतो. म्हणून, त्यात ठळकपणे दिसेल असा फक्त ’एफ’ असा लोगो तयार करण्यात आला.





फेसबुकच्या लोगोमधला निळा आणि पांढरा रंग २००३ पासून बदलला नाहीये. याचे कारण फारच मजेशीर आहे. मार्क झकरबर्ग अंशत: रंगांधळा आहे, त्याला लाल आणि हिरवा रंग दिसत नाहीत, निळा रंग मात्र व्यवस्थित दिसतो. म्हणून त्याने निळा रंग निवडला असे म्हणतात. कारण काहीही असो, या साध्या लोगोने जगभरातील लोकांना समाज माध्यमावर सक्रीय केले आणि त्यांना एका नवीन जगाचे दरवाजे उघडले, हे मात्र नक्की.

0 comments: