“मा बहन” एक one time watch movie नक्की आहे.
१) अत्यंत सुंदर, डोळे दिपवणारी सुंदर स्त्री नव्याने कोणत्याही वसाहतीत रहायला आली, की तिचं सौंदर्य हेच तिचा शाप ठरतं. तिच्याबद्दल काहीही ठाऊक नसताना तिने तिच्या नवऱ्याला फसवलेलंच असणार, त्याच्या प्रॉपर्टीवरच तिचा डोळा असणार, ती बदफैली असणारच, ती व्यभिचारीच असणार हे सो कॉल्ड पांढरे कपडे परिधान करणाऱ्या पांढरपेशा समाजाने ठरवलेलंच असतं. एका बाईबद्दल असे विचार करणारे हे पांढरपेशे लोक स्वत: मनाने किती काळे असतात, कृत्य किती काळी करतात याचा त्यांना मात्र सोयिस्कर विसर पडतो आणि समाजालाही. हा या सिनेमाचा बेस, यावर आधारित गोष्ट आहे.
२) “मा बहन” हे नाव scandalous वाटतं? चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी मुद्दामच sensationalise केलेलं marketing gimmick वाटतं ना? मग ’मा-बहन’ वरून सर्रास दिल्या जाणाऱ्या शिव्या कशा वाटतात? त्या derogatory नाही वाटत? एखाद्या स्त्रीला प्रत्यक्ष किंवा आता ऑनलाईन ट्रोल करताना दिलेल्या शिव्या ’मा-बहन’वरूनच असतात ना? एखाद्याचं चारित्र्यहनन करण्यासाठी दिलेल्या शिव्याही ’मा-बहन’वरूनच असतात ना? म्हणून सिनेमाचं नावही ’मा-बहन’, शिवाय एक आई आणि तिच्या दोन मुलींचीही ही गोष्ट आहेच.
३) माधुरी दिक्षितवर टीका करणारे लोक बरेच आहेत. “ती आम्हाला तरुण असतानाही कधी आवडली नाही. आता तर काय म्हातारचळच लागलाय” वगैरे (कोणीही विचारलेलं नसताना) मतं देणारे कैक आहेत. माधुरीने कोणाचीच पर्वा न करता, संपूर्ण करियर तिला पाहिजे तेच सिनेमे केलेत. यात अगदी नगण्य रोल्सपासून मेनस्ट्रीम हीरॉइनपर्यंत, सपोर्टिंग रोल्स, नॉन-ग्लॅमरस रोल्स… सगळं केलंय. या सिनेमातही माधुरीने उत्तम काम केलंय. बॉलीवुडच्या अतिशय यशस्वी, कमालीच्या लोकप्रिय, टॉप हिरॉइनने ही बरीच ग्रे शेड असलेली भूमिका साकारली यातच तिचं कौतुक आहे. ती आज साठ वर्षांची आहे! चेहरा निबर दिसतो. पण ग्रेस टिकवून आहे. संपूर्ण सिनेमात फुलाफुलांच्या साडीत आहे. एक इंचही अंगप्रदर्शन नाही. बिनधास्त काम करताना कुठे कुठे अडखळलीही आहे. पण मिसफिट अजिबात नाही.
४) माधुरीचे स्लीव्हलेस ब्लाउज हा या सिनेमातला एक महत्त्वाचा घटक आहे. एक स्वतंत्र पात्रच आहे! मुळात थोड्या मागास भागात एक स्त्री स्लीव्हलेस ब्लाउज घालते, यावरूनच तिचं चरित्र ठरवलं जात असेल, तर अशी स्त्री “डायन”, “कुल्टा” असणारच, ना? हे या ब्लाउजचं महत्त्व!
५) तृप्ती डिमरीला १०० पैकी १०० मार्क. अप्रतिम, सहज काम! ती जयाच वाटते. या रोलसाठी अन्य कोणाचा विचारच आता करवणार नाही. तिला यापुढे असेच चांगले सशक्त रोल्स मिळूदेत. सुषमाचं काम करणारी “धरना” म्हणून मुलगी रीलस्टार आहे. तिला फार वेगळं काम नाहीये, पण तिचा वावर अगदी सराईत आहे. रवी किशन, गीतांजली कुलकर्णी आपापली कामं चोख करतात. त्यांना जास्त स्कोप नाहीये.
६) ट्रेलरवरून कळलंच असेल, की रेखा, जया आणि सुषमा ही यातल्या पात्रांची नावं आहेत. ही “निरमा”च्या जाहिरातीतली अत्यंत फेमस नावं आहेत. यातली “हेमा” मिसिंग आहे, असं वाटू शकतं. आहे का?
७) काही दिग्दर्शकीय बारकावे दाद द्यावे असे आहेत, पण चुकाही भरपूर आहेत. काही पात्रांना फार खोली नाही, अर्धवट आहेत. हा सिनेमा सर्वोत्कृष्ट आहे, असा दावा नाहीच, पहिलंच वाक्य आहे, की एकदा बघावा असाच आहे, पण नक्की बघावा असा आहे. “माधुरीला काय म्हातारचळ लागलाय” असं नुसतं म्हणण्यापेक्षा, नक्की बघा. माधुरी तर दिसेलच, वर मनोरंजन होईल, थोडा सटायर दिसेल आणि आणखी दोन गोष्टीही समजतील.
#MABEHEN #Netflix


0 comments:
Post a Comment