या महिन्याची #लोगोकथा आहे इन्स्टाग्रामच्या लोगोबद्दल. (logo ला मराठीत ’बोधचिन्ह’, ’नाममुद्रा’ असेही म्हणले जाते)
आजचे जग जर सोशल मीडीयाचे आहे, असे म्हणले, तर “इन्स्टाग्राम” या जगाचा “स्टार” आहे असे म्हणता येईल. इन्स्टाग्रामचा लोगो कसा दिसतो, हे तुम्हाला माहित आहेच. पण हा लोगो कसा तयार झाला? इन्स्टाग्राम कोणी सुरू केलं? ते त्यांनी का सुरू केलं, हे आज जाणून घेऊया.
गोष्ट आहे २०१०ची. केव्हिन सिस्ट्रॉम हा तरुण अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीधर झाला आणि त्याला ’गूगल’मध्ये नोकरी मिळाली. काही दिवसांनी त्याने ’Burbn’ नावाचं स्वत:चं ऍप तयार केलं. २०१० मध्ये फोटो आणि व्हिडिओंचा वापर अगदी कमी प्रमाणात व्हायचा. सोशल मीडीया नुकताच सुरू होत होता. ज्या ठिकाणी आपण गेलो आहोत, त्याचं ’लोकेशन’ ज्यावर शेअर करता येईल, अशी ऍप्स अगदी कमी होती. ’Burbn’ त्यांपैकी एक ऍप होतं. तुम्ही ज्या ठिकाणी ज्यांच्याबरोबर फिरायला किंवा जेवायला गेला आहात, त्याचे फोटोसह लोकेशन ’Burbn’वर अपलोड करता यायचे.
’Burbn’चा विस्तार करण्यासाठी केव्हिनला निधी मिळाला. माईक क्रिगर नावाचा केव्हिनचा मित्र होता. ’मीबो’ नावाच्या एका सोशल मीडीया कंपनीतच त्याने त्याआधी काम केलं होतं. त्याच्या अनुभवाचा फायदा होईल, या दृष्टीने केव्हिनने माईकला त्याच्याबरोबर काम करायला बोलावलं. त्यानंतर एखाद्या लोकेशनचे फोटो ’इन्स्टंटली’ मोबाईलवरून अपलोड करता येईल असं ऍप केव्हिन आणि माईक यांनी विकसित केलं. झटपट शेअरिंगची सोय देणाऱ्या या ऍपला त्यांनी नाव दिलं- ’इन्स्टाग्राम’.
दरम्यान, आयफोन-४ बाजारात आला होता आणि त्यात फोटो उतम यावेत यासाठी अप्रतिम सुविधा दिलेल्या होत्या. आयफोन-४ आणि इन्स्टाग्राम या जोडीमुळे लोकांना कोणत्याही ठिकाणाचे, लोकांचे किंवा खाद्यपदार्थांचे आकर्षक फोटो काढून ते लोकांबरोबर ’शेअर’ करता यायला लागले. त्यामुळे, इन्स्टाग्रामची ’क्रेझ’च निर्माण झाली. तीन महिन्यांत तब्बल दहा लाख लोकांनी स्वत:च्या मोबाईल फोनवर इन्स्टाग्राम डाऊनलोड केलं!
इन्स्टाग्रामचा पहिला लोगो अगदी साधा होता. खाकी रंगाच्या पार्श्वभूमीवर एक चौकोनी कॅमेरा लेन्स होती आणि तिच्या डाव्या कोपऱ्यात इंद्रधनुष्याचे उभे पट्टे होते. २०१० ते २०१६ हाच लोगो होता. त्यानंतर ’तरुणाई’ला डोळ्यापुढे ठेवून त्यात मोठे बदल करण्यात आले.
लोगोमधली कॅमेरा लेन्स तशीच राहिली. कारण इन्टाग्राम = फोटो यात बदल झाला नव्हता. पण, आधीच्या खाकी रंगाऐवजी ’हॉट पिंक’ रंग आहे. त्यात फिका गुलाबी, पिवळा, केशरी हे रंगही मिसळले आहेत. हे सगळे रंग ’सेलिब्रेशन’चे, उत्साहाचे, जोशाचे रंग आहेत. गडद गुलाबी रंगावर काढलेला पांढरा चौकोन आणि गोल मिळून कॅमेऱ्याच्या लेन्सचा आकार, असा पूर्ण लोगो दिसतो.
प्रत्येक क्षण कॅमेरात टिपा आणि तो लोकांसमवेत साजरा करा, हे हा लोगो सुचवतो. ’लाईव्ह व्हिडिओ’, ’रील्स’, ’स्टोरी’, ’फिल्टर्स’, ’म्युझिक’ अशा इन्स्टाग्रामवरच्या सुविधा वापरून करोडो युजर्स रोज त्यांच्या आयुष्यातल्या घटना इन्स्टंटली शेअर करतात. इन्स्टाग्रामसाठी मुद्दाम रील्स केली जातात, फोटो काढले जातात. नवीन फोनवर सर्वप्रथम इन्स्टाग्राम डाऊनलोड केलं जातं. काही वेळ इन्स्टाग्राम ’चेक’ केलं नाही, तर युजर्सना चैन पडत नाही. अशा रीतीने, एक रंग आणि पांढऱ्या रेषांचा हा लोगो आज सोशल मीडीयावर राज्य करत आहे.
****
#trademark #instagram #logo
"निर्मळ रानवारा"च्या फेब्रुवारी २०२६ च्या अंकात ही कथा प्रकाशित झालेली आहे.


0 comments:
Post a Comment