December 25, 2025

शेअर ट्रेडिंगची पुस्तकं

 

पुण्यात १४ ते २१ डिसेंबर, २०२५ या काळात फर्गसन कॉलेज ग्राउंड इथे नॅशनल बुक ट्रस्टतर्फे भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भारतभरातल्या ३०० हून अधिक प्रकाशकांचे स्टॉल्स इथे होते, लाखो वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली, करोडो रुपयांची पुस्तके विकत घेतली गेली. मान्यवरांच्या मुलाखती, पुस्तक प्रकाशने, लेखक भेट असे या प्रदर्शनात अनेक उपक्रम राबवले गेले. साकेत प्रकाशन, छ. संभाजीनगर यांच्यासाठी मी शेअर ट्रेडिंगसंबंधी सहा पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्या निमित्ताने माझीही छोटी मुलाखत साकेतच्या स्टॉलवर झाली. त्यात,

शेअर ट्रेडिंगच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीचे अनेक व्हिडिओ YouTube वर उपलब्ध असताना शेअर ट्रेडिंगची पुस्तकं लोकांनी का वाचावीत, त्याची गरज आणि फायदे काय आहेत?- असा प्रश्न मला परवाच्या मुलाखतीत विचारला होता.

त्याचं उत्तर : “शेअर ट्रेडिंगमध्ये इंजिनियर/ डॉक्टर / पोलिस / सरकारी अधिकारी यांना गंडा घातला. करोडोंची फसवणूक. आधी विश्वास संपादन करून मग विश्वासघात” अशा बातम्या तुम्ही रोज वाचत असाल. असं आपल्या बाबतीत होऊ नये, म्हणून पुस्तकं महत्त्वाची आणि गरजेची असतात. 


 

खरंतर, पुस्तकं का वाचायची हा प्रश्न पडत असेल, तर हेच चिंतेचं कारण आहे! असो, पण आत्ता त्या खोलात न जाता, विषयाला धरून सांगायचं, तर पुस्तकं, त्यातही कोणत्याही विषयावरची तांत्रिक पुस्तकं मूलभूत शिक्षण देतात. यूट्यूबवर जी माहिती असते, ती एका विशिष्ट पातळीच्या वऱची असते. तिथेही तुम्हाला बेसिक शिक्षण मिळू शकतं. पण यशस्वी यूट्यूबर्स जे व्हिडिओ करतात, त्यात तुमचा बेस पक्का आहे, असे समजून त्या पुढचे सांगण्याचा कल असतो. त्यामुळे शेअर ट्रेडिंग समजून घ्यायचं असेल, तर पुस्तकांना पर्याय नाही.

पण लोकांना शॉर्टकट हवा असतो. पायाच पक्का नसताना लोकांना त्यावर इमारत बांधायची असते. पायाच पक्का नसल्यामुळे तो यूट्यूबर काय सांगत आहे, हे नीट कळत नाही. तरीही मोहापायी आणि अज्ञानापोटी लोक पैसे बाजारात लावतात आणि मग फसवणूक होते!

अभियांत्रिकी, शास्त्रीय, वैद्यकीय, ट्रेडिंग अशा तांत्रिक पुस्तकातून तुम्हाला लेखक मलभूत शिक्षण देतो. इथे वेळेची मर्यादा नसते. पन्नास पानी ते पाचशे पानी- तुमच्या भुकेनुसार तुम्हाला पुस्तक मिळू शकतं. एका संज्ञेवरचं एकच पुस्तक असू शकतं, (उदा. मी अनुवाद केलेली- प्राइस ऍक्शन ट्रेडींग, ऑप्शन्स ट्रेडिंग ही फक्त एका संकल्पनेवरची दोन-अडीचशे पानी पुस्तकं आहेत.) किंवा, अनेक संकल्पना ज्यात समजावलेल्या आहेत, असंही एक पुस्तक असू शकतं (उदा. टेक्निकल ऍनॅलिसिस नावाचं जॉन जे मर्फी यांचं पुस्तक. त्याचाही मी अनुवाद केलेला आहे. येईल पुढच्या वर्षी).

तुम्ही ते पुस्तक अनेकवार चाळू शकता, त्या संकल्पना, त्याची चित्र, त्यावर लेखकाने दिलेली माहिती अनेकदा वाचू शकता, ती समजली, की मग ती यूट्यूबवर पडताळून पाहू शकता. यूट्यूबवर एकच व्हिडिओमधले काही परत पहायचं असेल, सर्च करायचं असेल तर तो अनेकदा पुढे-मागे करावा लागतो. तो सेव्ह करून ठेवावा लागतो. तो सेव्ह केला आहे, हे ऐनवेळी लक्षात ठेवावं लागतं… त्यापेक्षा पुस्तक हातात घेणं, त्यात हवं ते शोधणं, अनेकदा वाचणं किती सोपं आहे.

त्यामुळे, सारं काही इंटरनेटवर उपलब्ध असूनही, संकल्पना स्पष्ट समजण्यासाठी तांत्रिक पुस्तकांना पर्याय नाही. ही पुस्तकं म्हणजे तुमची प्राथमिक शाळा आहे. ती उत्तीर्ण न करताच तुम्ही यूट्यूबवरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, की काय होतं? स्पष्ट सांगायचे तर, वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा विषय तुम्हीही होण्याची शक्यता वाढते!

त्यामुळे, तांत्रिक पुस्तकंच वाचा. मूळ भाषेतली वाचा, अनुवादित वाचा. समजून घ्या. कादंबऱ्या वाचता त्याच आवडीने ही पुस्तकंही वाचा. ज्ञानवृद्धीचा तो एकमेव ’सेफ’ मार्ग आहे.

0 comments: