बदामीमध्ये #ऐहोळे आणि #पट्टडकल या दोन गावांना cradle of temples in India असं म्हणलं जातं. मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या ऐहोळे इथे चालुक्य काळात, ७व्या आणि ८व्या शतकात भारतातली शिल्पकला पहिल्यांदाच विकसित झाली. राज्य संपन्न होतं आणि राजा दिलदार होता. त्याने कलाकारांना आश्रय दिला, द्रव्य दिलं आणि प्रोत्साहनही. भौगोलिक स्थितीमुळे मोठमोठे नैसर्गिक दगड उपलब्ध होते. त्यामुळे इथे शिल्पकला आणि कोरीवकाम शब्दश: बहरलं. ऐहोळे इथे एकाच परिसरात अनेक देवळं आहेत आणि प्रत्येकाचा कळस वेगळ्या प्रकारचा आहे
म्हणजे, "ही जागा तुमची, दाखवा तुमचं कसब", असा शिल्पकारांना free hand दिला असावा राजाने, असं वाटतं
नुसता कळस नाही, तर देवळाचे खांब, छत, समोरचा नंदी, त्याची बैठक, खिडक्या... प्रत्येक इंचावर अप्रतिम आणि वैविध्यपूर्ण कोरीवकाम आहे. शिव-पार्वती यांच्या प्रणयमुद्रा आहेत, तसंच नुसत्या गप्पा मारणाऱ्या मुद्रा पण आहेत. स्त्रियांचे अनेक विभ्रम, शृंगार, मुद्रा आहेत, लहान मुलं आहेत, नुसती फुलांची डिझाईन आहेत... पाहाल तितकं कमी
इथे शिल्पकला शिकून कारागीर भारतभर विखुरले, त्यानंतर दक्षिणेत, मध्य भारतात पूर्वेकडे त्या त्या राजांच्या आश्रयाने भव्य मंदिरं बांधली. त्यात ऐहोळेमधल्या कामाचा प्रभाव दिसतो, त्याचं हे कारण आहे.
इथे क्षत्रियांचा संहार केल्यावर परशुरामाने आपला रक्ताने माखलेला परशु मलप्रभा नदीत बुडवला, त्यामुळे ती नदी आणि पूर्ण परिसरच लाल झाला, असं म्हणतात
यात तथ्य असो अथवा नसो, पौराणिक कथेला परिसराशी जोडण्याची रीत मला लोभसावाणी वाटते
याच परिसरात ASI चे उत्तम म्युझियम आहे. त्यात अनेक मूर्ती आहेत, त्या जवळून पाहता येतात, त्याचं वर्णन, इतिहास पण लिहिलेला आहे. छान माहिती मिळते.









0 comments:
Post a Comment