September 17, 2025

Saiyyara = Hype

सैय्यारा बघून मुलं ढसाढसा रडत आहेत, मुली चक्कर येऊन पडत आहेत वगैरे व्हायरल करण्यापुरतंच आहे, ही शंका खरीच ठरली. सिनेमा अगदीच फुसका आहे. आणि मुख्य म्हणजे, आजच्या हुशार जेन झी-ला अपील होण्यासारखंही त्यात काहीच नाहीये. 


कथेला ना उंची, ना खोली. हीरो-हिरॉइनसकट सगळी पात्र अगदी विसविशीत आहेत. Characterization नावाचा प्रकारच नाही. आज एखादा मुलगा हीरोइतका बेपर्वा आणि उर्मट असेल, तर तो इतका लोकप्रिय कलाकार होऊच शकणार नाही. आणि, तो कलाकार असेल, तर तो गिटार, ड्रम आणि सिंथेसायजर फोडणार नाही. लेखकाला आणि दिग्दर्शकाला इतकीही अक्कल नाही! उगाच काहीतरी भारी दाखवायच्या नादात उथळ भडकपणा दाखवलाय. आजची पिढी एकदम स्मार्ट आहे. ज्यादापणा करणाऱ्या असल्या कोणालाच डोक्यावर घेत नाही.

हिरॉइन अतिशय गोड दिसते, अंगप्रदर्शन सहजतेने करते, रडते चांगली. ती आवडण्याची एवढीच कारणं आहेत. नाहीतर, लिटरली मेषपात्र आहे. तिला कोणतीही भूमिका नाही, ठामपणा नाही, पळपुटी आहे.

पैसा मिळवायला किती कष्ट लागतात, हे आजची पिढी व्यवस्थित समजून आहे. आणि, ज्यांच्याकडे उधळण्यासाठी बापाचा पैसा आहे, ते तर कोणाचीच मुजोरी सहन करत नाहीत. त्यामुळे हीरोचे मित्र स्वत:चे पैसे खर्च करून त्याला सतत सांभाळून घेतात, त्याची अरेरावी सहन करतात वगैरे तद्दन सिनेमॅटिक लिबर्टी आहे.

सहा-सात संगीतकार असूनही गाणी रटाळ आणि एकसारखीच आहेत. कोणतं गाणं झालं आणि शब्द काय होते, हे लक्षातही रहात नाही.

चला, सिनेमा म्हणून हेही सगळं सगळं माफ. पण अल्झायमर्ससारख्या अत्यंत गंभीर आजाराचं सिनेमात जसं वरवरचं मनोरंजनात्मक चित्रण केलं आहे, त्याला मात्र माफी नाही. किमान एक अल्झायमर्स पेशंट आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी दिग्दर्शक मोहित सुरीने बोलायचं धारिष्ट्य दाखवलं असतं तर…

थोडक्यात, तीनेक बरे लिहिलेले सीन, हीरो-हीरॉइनचे मुक्त प्रणयाचे सीन आणि एक बरं गाणं = सैय्यारा.

जागतिक मनोरंजनाचे दरवाजे उघडे असलेल्या, अत्यंत लॉजिकल तरुणाईला या मिळमिळीत सैय्यारामुळे नक्कीच ढसढसा रडायला आलेलं नसणारे. सगळा हाईप होता, हे नक्कीच.

(जाताजाता, स्वप्नवत तरीही वास्तव प्रेमकथा पहायची असेल, तर मी आजही सैराटच पाहीन. सिरियस मास्टरपीस. थोडं मागे जायचं, तर कयामत से कयामत तक पाहीन. खूऽऽऽऽप मागे जायचं असेल, तर एक दूजे के लिये किंवा साथ-साथ पाहीन. तुम्ही काय पहाल?)      

0 comments: