September 26, 2025

फ्रीलान्सर अनुवादकाचं आयुष्य!😅

पहिल्या फोटोमध्ये दिसतंय ते “शेअर बाजार” हे मी अनुवाद केलेलं पुस्तक जानेवारी २०२५ मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर दिसतंय ते दुसरं पुस्तक, “इट्स ओके” जुलै, २०२५ मध्ये तर तिसरं, “रेडी फॉर एनिथिंग” प्रकाशित झालं ऑगस्ट २०२५ मध्ये. म्हणजे पहिल्या दोन पुस्तकांमध्ये सहा-सात महिन्यांचं अंतर होतं, तर पुढच्या दोन पुस्तकांमध्ये कसंबसं एक महिन्याचं अंतर होतं 😀 विशेष म्हणजे, तीनही प्रकाशक वेगवेगळे आहेत! तरीही हे झालं 😊
 



 
त्याहीपुढचं ऐका 😀 "रेडी फॉर एनिथिंग"चा अनुवाद गेल्या वर्षी, म्हणजे नोव्हेंबर, २०२४ मध्ये मी सुपूर्त केला होता. पण ते पुस्तक प्रकाशित व्हायला तब्बल १० महिने लागले 😱 याउलट, "इट्स ओके"चा अनुवाद सुरू केला याच वर्षी मे अखेर, जूनमध्ये तो सुपूर्त केला आणि जुलैमध्ये, म्हणजे start to finish साठी केवळ दोन महिने लागले आणि पुस्तक प्रकाशित झालंदेखील 🤩 त्यामुळे कोणतं पुस्तक कधी येईल, याचं काहीही भाकीत वर्तवता येऊ शकत नाही.
 
एक सिक्रेट सांगू? मी केलेला पहिला अनुवाद प्रकाशितच झाला नाहीये!! ☹️😆 It never saw light of the day. May be, its lost forever by now 😭 कारण, या गोष्टीला बारा-तेरा वर्ष झाली असतील. तेव्हा मी हाताने लिहून अनुवाद दिला होता, त्यामुळे माझ्याकडे सॉफ्ट कॉपीही नाहीये त्याची. त्यामुळे तो "गेलाच" असं समजायचं 😕 असं असतं प्रत्येक पुस्तकाचं भाग्य! आणखी एक अनुवाद आहे, जोदेखील सुमारे वर्षभर अडकलेला आहे. पण मला खात्री आहे, तो येईल 🤞🤞बघूया.
 
सहसा प्रकाशकालाही पुस्तक प्रसिद्ध करायचं असतंच, पण त्याच्यासमोर विविध व्यावहारिक अडचणीही असतात. कधी एखादा personal score settle करायचा असतो, कधी खरोखर प्राधान्याचा विषय असतो, कधी एखादं ’हॉट’ किंवा ’ट्रेंडिंग’ पुस्तक किंवा एखादा चलती असलेला लेखक असतो. त्यामुळे बाकी पुस्तकं मागे सारून त्या पुस्तकाला प्राधान्य मिळतं. अशावेळी मी माझ्या अनुवादाच्या प्रगतीबद्दल विचारलं, की मी पुण्यातच असले, तरीही मला, ’आप कतार में है’ ऐकायला लागतं (क्षीण विनोद!) 😜😆
थोडक्यात, पुस्तकाचा अनुवाद सुपूर्त करणं माझ्या हातात असतं, पण ते प्रकाशित करणं माझ्या हातात नसतं. खरंतर अनुवाद पूर्ण करून दिला, त्याचे पैसे मिळाले की माझं काम संपतं. पण पुस्तक प्रकाशित झालं, तरच वर्तुळ पूर्ण झालं, मेहनत फळाला आली असं वाटतं. त्यामुळे पुस्तकाचं प्रकाशन लांबलं, की अस्वस्थही वाटतं 🥲
 
मी आहे फ्रीलान्स अनुवादक. त्यामुळे त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक insecurities नाही मी तोंड देते. अनुवाद सुपूर्त केला आहे, तो प्रकाशित होईल ना? प्रकाशित झाला, पण तो लोकांपर्यंत पोचेल ना? त्यात अनवधानाने का होईना, काही अक्षम्य चुका झाल्या नसतील ना? मला पुढचं काम मिळेल ना? मला केलेल्या कामाचे पैसे मिळतील ना? मला नीट काम जमतंय ना? मी आणखी किती वर्ष तग धरून राहू शकेन? स्वत:ला लेखक म्हणवणारे लोक पुस्तक आणि चित्रपट परिचय आता एआयकडून करवून घेतात. अनुवादकही सर्रास मशीन ट्रान्सलेशन करतात. अशात, माझ्यासारख्या ’जुन्या वळणाच्या’ अनुवादकाचं आयुष्य आणखी किती वर्ष असेल? मी आणखी किती काळ ’रेलेव्हन्ट’ राहीन? किती काळाने माझी गरज संपेल? पुढचं पुस्तक कधी येईल- यापेक्षा हे प्रश्न अधिक गंभीर असतात, घाबरवून टाकणारे असतात ☹️🙄😱 (फ्रीलान्सर असलेल्या प्रत्येकालाच त्या-त्या व्यवसायानुरूप तत्सम प्रश्न पडत असतात.) त्यांच्यावर मात करून हातातलं काम सुरू ठेवावं लागतं.
 
Meanwhile, लागोपाठ पुस्तकं आली, की, ’तू तर पुस्तकांची फॅक्टरीच काढली आहेस’ 😁😁 आणि मध्ये गॅप गेली, की ’पुढचं पुस्तक कधी येतंय? सध्या काम आहे का नाही ?’ 🤪😏 अशा दोन लंबकांमध्ये फ्रीलान्सर अनुवादकाचं आयुष्य कधी घाबरत, कधी आनंदात, कधी अनिश्चिततेचं सावट घेऊन, तर कधी समाधानानं सुरू असतं. Tik Tok Tik Tok, Life goes on, Until it Stops!

1 comments:

इंद्रधनु said...

एका पाठोपाठ पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन :)
जोपर्यंत लोकांना दर्जा हवा आहे, तोपर्यंत तरी मशीनलाच नाहीत जाणार सगळी कामं :)