नुकताच गणेशोत्सव होऊन गेला, आता नवरात्र येईल. खऱ्या अर्थाने हे मोठे सण, कारण त्यात प्रत्येक घरानुसार प्रथा, परंपरा, रुढी ठरावीक पद्धतीने पाळल्या जातात. त्यावर सोशल मीडीयातही खूप चर्चा होते. ’आमच्या घरी असं…’, ’आमच्याकडे तसं…’ इत्यादी. यात प्रकर्षाने एक विषय अनेकदा येतो- बायकांची ’अडचण’. मग ते दिवस कसे पवित्र / अपवित्र, माहेर / सासरच्या पद्धती, कोण किती कर्मठ, कोण समजूतदार, हे शास्त्रीय कसे आहे आणि कसे नाही, हा वेडगळपणा आहे किंवा ’शुचिता’ कशी पाळली गेलीच पाहिजे, गोळ्या घेणे / न घेणे… वगैरे वगैरे वगैरे. हो. ही चर्वितचरणं आजही होतात, खूप होतात आणि दर वर्षी होतात!
या सगळ्या चर्चा वाचताना, मला माझ्या आईचं इतकं कौतुक वाटतं! माझी आई प्रॉपर जुन्या पिढीतली. पण तिने स्वत: ना कधी तिच्या पाळीचा बाऊ केला, त्यामुळे आपसुकच मी आणि माझ्या बहिणीनेही तो कधी केला नाही. पाळी आहे, म्हणून देवाला नमस्कार करू नकोस, स्वयंपाकघरात येऊ नकोस, पाण्याला शिवू नकोस, शाळेत / कॉलेजला जाऊ नकोस… असं ती कधीही म्हणली नाही. In fact, अशा चर्चा घरात होतात, बायकांना त्यांच्या तारखांबद्दल उघड प्रश्न विचारले जातात, हे मला फार उशीरा कळलं आणि त्याचा धक्काही बसला होता.
तिचे असे त्या काळच्या मानाने ’आधुनिक’ विचार कसे झाले? कारण तिची आई आणि आजीदेखील तशाच सुधारकी आणि मोकळ्या विचारांच्या होत्या. पन्नासच्या दशकात अर्थातच त्या देव, पूजा, उपास, वार्षिक सण सगळं सगळं यथासांग करत होत्या. त्यांना पाळीसंबंधी सायंटिफिक टर्म्स माहित नसतील, पण त्यांना लॉजिक समजत होतं. पाळी हा स्त्रीचा शरीरधर्म आहे. त्रास होत असेल, तर विश्रांती घे, प्रसंगी औषध घे, वेळ पडली तर डॉक्टरकडेही ती मला घेऊन गेली आहे. पण तिने मला पाळी असूनही नॉर्मल रहायला शिकवलं. ’शिवाशिव’, ’अस्वच्छता’, ’विटाळ’ हे शब्दही तिने कधी उच्चारले नाहीत.
तेच उपासांबद्दल. त्याकाळी तर बायकांनी दर आठवड्याचा उपास, संकष्ट्या, वार्षिक उपास, स्पेशल उपास करायची पद्धतच होती. पण आईला पित्ताचा त्रास होत असल्यामुळे तिने एकही उपास कधी केला नाही. मला पित्ताचा त्रास होत नाही. पण तिने माझ्यावरही सक्ती केली नाही. माझी आजी, म्हणजे तिची सासू कदाचित तिला बोलली असेल, टोमणेही मारले असतील. पण माझी आई गप्प राहून सूज्ञपणे बऱ्याच गोष्टी साध्य करते, हेही तिचं कौतुक आहे. ते मला अजूनही जमलेलं नाही!
आईने कायम छोटी का होईना, नोकरी केली. तिच्या तिच्या परीने ती स्वावलंबी होती. तिच्या लहान-सहान हौशी तिने स्वत:च्या पैशाने पुरवल्या. ती दुचाकी चालवायची. आजही बॅंकांची कामं करते, घरात धुणं-भांडी-निवडणं-इस्त्री सगळं काम ती करत होतीच, आजही जमेल तितकं करते. थोडक्यात, मुलगी म्हणून, स्त्री म्हणून आई कधी विशेष वागली नाही, कधी नखरे केले नाहीत, कधी विशेष वागणुकीची अपेक्षा केली नाही. ती फक्त तिला योग्य वाटतं ते करत राहिली. म्हणजे, ती पर्फेक्ट आहे का? अर्थात नाही. आमच्यात मतभेद नाहीत का? अर्थात आहेत. पण त्यापलीकडे जाऊन तिच्या या स्त्री-वादी वागणुकीचे नकळत जे संस्कार माझ्यात रुजले आहेत, ते मला अधिक महत्त्वाचे वाटतात. आजकालच्या ’संस्कार, परंपरा’ वगैरेच्या प्रदर्शनी वातावरणात ते अधिक मौल्यवानही वाटतात.
आज मी स्वतंत्र बुद्धीने विचार करते, विचार मांडते, स्वावलंबी आहे, निर्णय घेऊ शकते. यात आईचा केवढा मोठा वाटा आहे! आई मला कधीही हे असं कर, तसं वाग, तिकडे जाऊ नकोस, असं करू नकोस म्हणाली नाही. मी परिस्थितीनुसार, वेळोवेळी आपापले अर्थ लावत गेले, चुकत गेले, शिकत गेले. याचं कारण, तिचा हरप्रकारचा non interference आणि माझ्यावरचा विश्वास.
मी नेहेमी म्हणते, की संस्कार काही ’चला, आता संस्कार शिकवतो’ म्हणून केले जात नाहीत. ते कृतीतून होतात. प्रत्येक आईचा तिच्या मुलांवर मोठा प्रभाव असतो. माझी आईही तशीच आहे. अतिशय साधी, unassuming, तरीही silently खंबीर. स्त्रीत्वाचा माझा आदर्श.
0 comments:
Post a Comment