कोणीही हे नाकारू शकत नाही, की भारतीय सण आणि परंपरा या भारतीय स्त्रीच्या जिवावर वर्षानुवर्ष सुरळीत सुरू आहेत. कोणताही प्रांत असो, तिथी आणि ऋतूनुसार इष्ट देवतेची पूजा करायची आणि त्या निमित्त यथोचित स्वयंपाक करायचा अशा स्वरूपाचे आपले सण आहेत.
त्यात पूजा करायची पुरुषांनी, पण तिची सर्व पूर्वतयारी करायची घरातल्या स्त्रीने! त्यात उपकरणं स्वच्छ करण्यापासून पूजा सामग्री, फुले, पत्री, नैवेद्यापर्यंत सारं काही तयार ठेवायचं, स्त्रीने. मग कर्ता पूजेला पुरुष येणार, पाटावर बसणार आणि पूजा विधी करणार.
तो आला, की स्त्रीने पळायचं स्वयंपाकघरात आणि रांधायला लागायचं. घरात ज्येष्ठ स्त्रिया असतील, तर त्यांच्या कठोर नजरेखाली वावरायचं. चूक करायला काही स्कोपच नाही. मुद्दाम कोणी चूक करत नाही, पण अनवधानाने केलेली चूकही या दिवशी मान्य नसते. इतकं कसं समजत नाही? आपल्याकडे असंच असतं... हे संवाद परजून ठेवलेले असतातच. स्वयंपाक आणि नैवेद्यासाठी तिच्या मदतीला सासवा, जावा, नणंदा, मुली कधी असतात, कधी नसतात. त्या असल्या, तर प्रत्येकीची तऱ्हा निराळी
त्या नसल्या तर सगळी जबाबदारी एकटीचीच
त्यामुळे, जिच्यावर ultimate जबाबदारी असते, ती मुख्य स्त्री सतत दबावाखाली असते… सगळं नीट होईल ना, काही राहिलं नाही ना, काही चुकलं नाही ना अशा शंका स्वत:लाच विचारते 



वर्षानुवर्ष करून हे सगळं सरावाचं झालं, तरी घरचे तिच्यावर नजर ठेवणं थांबवत नाहीत आणि तिचा self doubt कमी होत नाही. परिणामी, ती स्त्री कोणताही परंपरागत सण मनापासून एन्जॉय करू शकत नाही. गृहस्वामिनी म्हणून सगळीकडे जिची ओळख करून दिली जाते, ती खरोखर स्वामिनी असते का? नैवेद्याला खीरीऐवजी सुधारस करू, इतका साधा बदल करायचीही तिची टाप नसते. खीर असो, पुरण असो नाहीतर सुधारस… करणार असते तीच. पण परवानगी मात्र तिला घ्यावी लागते नवऱ्याची नाहीतर सासूची. कशी राहील ती आनंदी?
वास्तविक, सण, पूजा, नैवेद्य करायला तिचा विरोध नसतोच. तिलाही ते आवडतंच की. विरोध असतो सक्तीला. हे असंच, ते तसंच, हे त्याच क्रमाने, ते तशाच पद्धतीने… यादी संपतच नाही. याचा त्रास होतो. ती आळशी नसते, हलगर्जी नसते, तिलाही रीतभात कळते. तिला फक्त हवी असते मोकळीक. देव तिचाही असतो ना? मग त्याचं स्वागत तिच्या मनाप्रमाणे थोडं तरी का करू दिलं जात नाही?
या घुसमटीचं टोक गाठलं गेलं, की मग एक वेळ अशी येते, की ती स्त्री सगळंच सोडून देते. सण नको, नैवेद्य नको, सगळं करूनही फक्त टोकदार बोलणी ऐकणं नको, काहीच नको!! मग ’ती काही करत नाही, तिला काही करायला नको’ हा आहेरही तिला मिळतो. पण तोपर्यंत ती त्या पलीकडे गेलेली असते.
अट्टहास, नको इतका कठोरपणा याने सण साजरा करण्याची तिची हौसच संपते. तिने दुसरं टोक गाठू नये, असं वाटत असेल, ती कार्यरत असताना तिच्यावर विश्वास ठेवा. तिला सहकार्य करा. तिला मदत केली तर उत्तम. पण नसेल जमत, तर टीका तरी करू नका.
सर्व कुटुंबीय असं वागले, तरच खऱ्या अर्थाने घरातले सण आणि विधी समाधानाने होऊ शकतील 

0 comments:
Post a Comment