August 19, 2025

"सदैव सैनिका..."

 “सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती पुन्हा कधी फिरायचे!” मी गायला सुरूवात केली, आणि हॉलमध्ये शांतता पसरली, सन्नाटाच! साहजिकच होतं ते. नाही, नाही… आवाज बरा होता माझा, पण “आता आपल्यापुढे सादर होणार आहे, एकपात्री नाटुकले…” अशी घोषणा झालेली असताना, दबक्या, अन-शुअर आवाजात मी एकदम हे भलतेच गाणे गायला लागले होते. आपला फ्लॉप शो झालेला आहे, हे मला लगेचच कळलं, पण, कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट! ना पेटी, तबला, ना समूहस्वर… हे समरगीत एका भजनासारखं गाऊन, एका मिनिटात मी मान खाली घालून स्टेजवरून उतरले! माझा मीच करून घेतलेला पचका वडा! 

ही गोष्ट आहे, मी बहुतेक प्राथमिक शाळेत होते तेव्हाची. बहुतेक मंथ-एन्डला, मला नक्की आठवत नाही, पण सगळे वर्ग शाळेच्या हॉलमध्ये गोळा केले जायचे आणि उपस्थित विद्यार्थी आणि टीचर्ससमोर मुलं विविधगुणदर्शन करायची. मिनी-गॅदरिंगसारखंच, पण कॉस्चूम, मेक-अप वगैरे नाही. तासभर वगैरे अल्प मनोरंजन आणि मग साई सुट्ट्यो. नाट्यछटा, गाणी, नाच वगैरे सहसा सादर व्हायचे.

उपरोल्लिखित दिवशी, मी एकपात्री नाट्यछटा सादर करणार होते. एक छोटी मुलगी घरात एकटी असते. आई बाहेर जाताना, ’तिने काय काय करायचं नाहीये’ हे तिला बजावून सांगते आणि ती नेमकं तेच सगळं कसं करते आणि तिची फजिती कशी होते… वगैरे नाट्यछटा होती ती. त्यात वेडगळपणा होता, विनोद होता, मी घसरून वगैरे पडते वगैरे फिजिकल कॉमेडी होती, गाणी होती… फुल मनोरंजन. पण त्या दिवशी माझ्याआधी ज्यांचं सादरीकरण झालं, ते फारच छान झालं असावं. मला माझी नाट्यछटा एकदमच बोअर वाटायला लागली. ’ती नकोच सादर करायला’चा विचार प्रबळ झाला.

पण त्या ऐवजी करायचं काय? गाणं! मला खूप प्रकारची गाणी पाठ होती आणि ती मी वेळोवेळी गायचेही. पण आयत्यावेळी भजन किंवा भावगीत न आठवता का कोण जाणे, नेमकं “सदैव सैनिका”च आठवलं आणि पहिली ओळ गाताच कळलं, की आज आपण माती खाल्लेली आहे. कोणी हुर्यो उडवली नाही, पण मुलांचे बोअर झालेले चेहरे आणि नंतर न पडलेल्या टाळ्या खूप काही बोलून गेले.

परवा १५ ऑगस्टला सगळीकडे स्फूर्तीगीतं वाजत होती, तेव्हा अचानक हा किस्सा आठवला. आणि मग आठवले मोठं झाल्यानंतरचे अनेक प्रसंग… आयत्यावेळी कारण नसताना गेलेला कॉन्फिडन्स आणि त्यामुळे सुसंगत बोलता न येणं, तयारी असूनही फम्बल होणं, जीभ अडखळणं आणि या सगळ्याचं पर्यवसान म्हणजे अनेक सुटलेल्या संधी, गमावलेली कामं इत्यादी.

आणि मग दिसलं दुसरं टोकही- लोकांना स्वत:बद्दल असलेला नको इतका कॉन्फिडन्स, जगाबद्दल असलेला इग्नोरन्स, स्वत:च्या मर्यादांची नसलेली जाणीव आणि तरी पुढेपुढे करणं…

मग वाटतं, अधूनमधून अशी नो-कॉन्फिडन्सची फेज आलेली बरी! झटकन पाय जमिनीवर येतात आणि पुढच्या वेळेसाठी मी सावध, सजग आणि तयार होते. कौतुक आणि टाळ्या नाहीत, पण ’सदैव सैनिका…’ने ही शिकवण तरी त्या दिवशी नक्की दिली.

#ललितलेखन

0 comments: