#PCWrites आजच्या वर्तमानपत्रात बातमी आली आहे- एम एस धोनीने “कॅप्टन कूल” या त्याच्या विशेषणावर “ट्रेडमार्क” मिळावा असा अर्ज केला आहे. Personality Trade Mark हा ट्रेडमार्कचा एक नवीन प्रकार आहे.
त्याआधी ट्रेडमार्क म्हणजे काय, ते समजून घ्या. ट्रेडमार्क, म्हणजे मराठीत नाममुद्रा, अर्थात सोप्या इंग्रजीत, logo. हजारो लोगो आपल्या आसपास आपण रोज बघतो. पार्ले-जी, ब्रुक बॉंड चहा, आयफोन, किया मोटर्स…इ. प्रत्येक नामवंत सेवा किंवा उत्पादन यांची एक मालक कंपनी असते आणि तिच्या अनेक सेवा किंवा उत्पादने असतात. मुख्य कंपनीचा लोगो एक असतो आणि प्रत्येक सेवेचा वेगवेगळा. उदा. फेसबुक, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम प्रत्येकाचा आपापला लोगो आहे आणि त्यांची मालक कंपनी ’मेटा’ हिचाही स्वतंत्र लोगो आहे. याला कायद्याच्या भाषेत ट्रेडमार्क म्हणतात. ती कंपनीची आणि पर्यायाने त्या उत्पादन/सेवेच्या गुणवत्तेची ओळख असते.
मग, Personality Trade Mark म्हणजे काय? अनेक सेलेब्रिटी याच कंपनीच्या विविध उत्पादने आणि सेवांची जाहिरात करतात, म्हणजेच ते त्यांचे ’Brand Ambassador” होतात. त्यांनी आपल्या उत्पादनाची जाहिरात करावी यासाठी त्या कंपन्या रग्गड पैसेही मोजतात. का? कारण त्यांना खात्री असते, की या सेलिब्रिटीने आपले उत्पादन endorse केल्यामुळे आपल्या उत्पादनाचा खप वाढेल. जनता अनुकरणप्रिय असते. उदा. विराट कोहली MRF Tyre ची जाहिरात करतो. ’हे टायर्स माझ्यासारखेच मजबूत आणि भरवशाच्या लायक आहेत’ तत्सम काहीतरी तो बोलतो. आता आपला ’हीरो’ म्हणतोय, की हे टायर चांगले आहेत, तर आपणही आपल्या चारचाकीला हेच टायर बसवू, असा विचार लोक करतात! आणखी एखादी हीरोइन एखादा साबण, शॅम्प, लोशन वापरते आणि ’तुम्हाला माझ्यासारखं सुंदर दिसायचं असेल, तर हे वापरा’ म्हणते. मग असंख्य तरुणी ते उत्पादन वापरतात. असा हा परस्पर फायद्याचा मामला असतो. सेलेब्रिटीला पैसे मिळतात, कंपनीच्या उत्पादनाचा खप वाढतो आणि तिलाही पैसे मिळतात.
पण फेक बातम्या, फेक अकाउंट्स असतात, तशीच फेक उत्पादनेही असतात. म्हणजेच, established brand ची भ्रष्ट नक्कल करायची आणि ती मूळ उत्पादनासारखी दिसेल अशी तयार करून लोकांना विकून त्यांची फसवणूक करायची. आजकाल AI tools मुळे फोटोंचे morphing, superimposing अतिशय बेमालूमपणे करता येते. शंकाही येत नाही, की हे ओरिजिनल नाहीये. म्हणून तर सेलेब्रिटींचे फोटो खुशाल कोणत्याही लोकल उत्पादनावर चिकटवून त्यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. यात सेलेब्रिटीला पैसे मिळत नाहीत, त्याची परवानगी घेतलेली नसते, खुशाल त्याच्या नावावर उत्पादन खपवले जाते आणि लोकही फसतात! आपल्या नावाचा असा परवानगीविना आणि मोबदल्याविना गैरवापर केला जाऊ नये, यासाठी आता हे सेलिब्रिटी जागरूक झाले आहेत. अमिताभ बच्चनचा आवाज किंवा चेहरा वापरून असंख्य उत्पादने आणि सेवा खपवली गेली आहेत. आता बच्चनने त्यावर अर्ज करून बंदी आणली आहे. त्याचप्रमाणे, अनिल कपूरचा ’झकास’, जॅकी श्रॉफचा ’भिडू’ यांवरही बंदी आहे.
धोनीचेही हेच म्हणणे आहे. मैदानावर, कसोटीच्या क्षणी थंड डोक्याने विचार करणे ही त्याची खासियत आहे. म्हणूनच, तो ’कॅप्टन कूल’ या नावाने प्रसिद्ध आहे. आता एखाद्या कंपनीने एखादे कोल्डड्रिंक तयार केले. ते कुठे केले आहे, कोणती रसायने वापरली आहेत, पाणी कोणते वापरले आहे, पेयाचा दर्जा काय आहे याची काहीही विश्वासार्ह माहिती नाही. आणि, तिने थेट धोनीचे चित्र आणि “कॅप्टन कूलही हेच ड्रिंक पितो, तुम्हीही प्या” अशी जाहिरात केली तर काय काय होऊ शकतं पहा :-
धोनीचे वेडगळ फॅन्स केवळ ती जाहिरात पाहून ते ड्रिंक पिऊ शकतात.
ड्रिंक चांगल्या दर्जाचं नसल्यामुळे ते पिऊन त्यांची तब्येत ढासळू शकते.
त्यांना इस्पितळात भरती व्हायला लागू शकतं. औषधे घ्यायला लागू शकतात.
आणि, ’ह्यॅ, धोनी नाय आपला… त्याच्यामुळे मेलो असतो मी’ म्हणून धोनीची निष्कारण बदनामी होऊ शकते!
बिचाऱ्या धोनीला कल्पनाही नाही, की आपल्या नावाचा असा परस्पर गैरवापर झाला आहे, लोकांचा जीव धोक्यात आला आहे आणि आपले फॅन्सही कमी झाले आहेत! हे होऊ नये, विनापरवानगी कोणीही आपल्या व्यक्तीविशेषाचा गैरवापर करू नये, म्हणून धोनीने या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. जो योग्यच आहे.
Btw, Prada ने कोल्हापुरी चप्पलच्या डिझाइनची चोरी करून आपल्या कोल्हापुरी चपलेला मिळालेल्या Geographical Indication (GI) चा भंग केला, म्हणून तिच्यावर कारवाई झाली, हे तुम्ही वाचलं असेलच.
तर, वर उल्लेख केलेले ट्रेड मार्क, कॉपीराईट, जीआय हे सगळे बौद्धिक संपदा कायद्यांखाली येतात. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा. विशेषत: कृत्रिम प्रज्ञेच्या वापराचा सुळसुळाट झाल्यामुळे मूळ, ओरिजिनल निर्मिती कमीच होत आहे, पण जी आहे, तीही सुरक्षित रहात नाहीये. त्यामुळे सर्वांनीच डोळे उघडे ठेवून हे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यायला हवी.
काही शंका असतील, तर विचारा.
0 comments:
Post a Comment