“रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है”चा अनुवाद “Don’t teach you father how to make babies” असा कोणीतरी केलेला काल रात्री वाचला आणि तेव्हापासून माझे डोळे जे विस्फारलेले आहेत, ते अजूनही तसेच आहेत 
असा का अनुवाद केलाय? हे कोणते “भाव” पकडले आहेत? हे मला अजूनही कळलेलं नाहीये!
बर, जरा कॉन्टेक्स्ट देते.



हे (ऍमॅझॉन प्राइमवरच्या) “धूम धाम” नावाच्या सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमधले एक वाक्य आहे. ते त्या शेवटच्या पंधरा मिनिटात कमीतकमी पंधरा-वीस वेळा म्हणलं जातं. सिनेमा हिंदी आहे, त्यामुळे माझं इंग्रजी सब-टायटल्सकडे लक्षच नव्हतं. पण सारखं सारखं स्क्रीनवर “बेबीज” दिसायला लागलं आणि बाळसदृश तर पडद्यावर काही दिसत नव्हतं, म्हणून नीट पाहिलं, तर हे!!! 



हे नवऱ्याला सांगितलं, तर तो फार सिरियसली माझ्याकडे बघत म्हणाला, “असा वाक्प्रचार खरंच आहे इंग्लिशमध्ये!” हाच तो माझे डोळे विस्फारण्याचा क्षण!
आईशप्पथ सांगते, मला नव्हतं माहित. आणि जरी माहित असतं, तरी “रिश्ते में…” च्या अनुवादासाठी मी तो नसता वापरला! आधीच सिनेमा इतका पांचट आहे, त्यात याची भर नसती घातली मी! 




हां, btw, सिनेमा खरोखर अतिशय आचरट आहे. यमीचा सिनेमा (Yami Gautam) म्हणून आमच्या “ह्यांनी” लगेचच पाहिला आणि मला “तूही बघ” म्हणून आग्रह केला. (यांनी आग्रह केला, म्हणल्यावरच मला कळायला हवं होतं, की हा सिनेमा आपण पहायचा नाहीये! पण नाही. अजूनही भाबडी आशा आड येते!
)

सिनेमात यमीने का ही ही केलेलं आहे. यमी सतत डोळे मोठमोठे करते, शिव्या देते, हाणामारी करते… निव्वळ आचरट. हां, अधूनमधून सुंदरही दिसते, ते मान्य करायलाच हवं
प्रतीक गांधी मात्र माझ्यासाठी एकदम सर्प्राइज. छान शोभला आहे. स्क्रीन प्रेझेन्स मस्त वाटला त्याचा 
सिनेमाचं “वेगळेपण” म्हणजे, हीरोचे अंगप्रदर्शन आहे!
यावरूनच सिनेमाची पातळी लक्षात यावी. (शिवाय, “साठे” आणि “भिडे” नावाचे पोलिस घेतलेत, पण त्यांची पात्र वठवणाऱ्यांना मराठी येत नाही, ’बिडे’ म्हणतो तो सतत
)





पण तरी सिनेमा दोन तास आचरट मनोरंजन करतो, फार पातळी सोडत नाही. समाधान मानून घ्यायचा हाच एक निकष उरला आहे सध्या!
हां, सबटायटल्स देखील मनोरंजन करतात, हाही एक प्लस पॉइंट! 


खरोखर करायला काहीही नसेल, ओटीटीवरच्या इंटेन्स ड्रामामधून ब्रेक हवा असेल, तर बघायला हरकत नाही. आग्रह मात्र नाही हं! 

0 comments:
Post a Comment