April 10, 2025

GI Tag

 

उन्हाळा सुरू झाला, की सगळ्यांनाच आंब्यांचे वेध लागतात. ’देवगड हापूस’, ’रत्नागिरी हापूस’ असे विशेषण लावून वाट्टेल त्या आंब्यांची विक्री होते आणि ग्राहकांची फसवणूक होते. म्हणूनच आंबा उत्पादकांनी मिळून त्यांच्या मूळ कोकण हापूससाठी भारतीय पेटंट कायद्याखाली “जी आय” टॅग घेतला आहे. तर हा जीआय टॅग म्हणजे नेमका काय असतो? 
 

 
कल्पना करा, की तुम्ही एका लग्नाला गेला आहात, जिथे नव-या मुलाने ’कोल्हापुरी चप्पल’ घातली आहे, नव-या मुलीने’पोचमपल्ली इलकल’ नेसली आहे, तर जेवायला ’बंगाली रसगुल्ले’ आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की यातलं प्रत्येक विशेषण म्हणजे गावाचं नाव आहे. एखाद्या गावाचा पदार्थ, वस्तू किंवा कापड इतकं प्रसिद्ध होतं, की तीच त्या गावाची ओळख होते. हीच गोष्ट पिकांनाही लागू आहे. एखाद्या गावाची हवा एखाद्या वाणाला इतकी पोषक असते, की तिथे सर्वोत्कृष्ट प्रतीचा वाण निर्माण होतो. हे असं असतं स्थानमहात्म्य! 
 
असं समजा, की साताऱ्यात तुमच्या घराच्या बागेत आंब्याचं झाड आहे, त्याचं कलम हापूसचंच आहे. पण तरीही तुमच्या बागेतल्या ’सातारच्या हापूस’ची चव आणि खुद्द रत्नागिरीत पिकलेल्या हापूस आंब्याची चव यात फरक असतोच. कशामुळे? कारण रत्नागिरीची हवा! तिथली दमट, उष्ण हवा, समुद्राची आर्द्रता, समुद्रावरचं वारं या सगळ्याचा हापूसच्या झाडावर, फळावर परिणाम होत असतो. त्यामुळे फळाची चव एकमेवाद्वितीय असते. 
 
तर, कापड, वस्तू किंवा फळं-फुलं-धान्य अशा ’शेतीजन्य वस्तू’, ज्यांमध्ये भौगोलिक स्थानाच्या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असतो, त्यांना बौद्धिक संपदा कायद्यांन्वये, म्हणजेच Intellectual Property Rights अन्वये संरक्षण मिळतं. GI ज्या कायद्यान्वये दिला जातो, त्याचं नाव आहे भौगोलिक निर्देशक कायदा, म्हणजेच जॉग्रफिकल इंडिकेशन ऑफ गुड्ज (रजिस्ट्रेशन ऍन्ड प्रोटेक्शन) ऍक्ट, १९९९. 
 
जीआय (GI) ऍक्ट, १९९९ :-
या कायद्यात भौगोलिक स्थलनिर्देशनाची व्याख्या दिली आहे. कोणत्या उत्पादनाला भौगोलिक निर्देशन मिळू शकतं?-
- तर, कोणतीही शेतीजन्य (पीक/ फळ/ बियाण इत्यादी), नैसर्गिक किंवा उत्पादित वस्तू, जिची निर्मिती देशाच्या एका विशिष्ट भौगिलिक स्थानावर होते आणि त्या वस्तूच्या वैशिष्ट्यांचा थेट संबंध त्यांच्या निर्मितीच्या स्थानाशी लावता येऊ शकतो अशा वस्तूंना “जीआय टॅग” मिळू शकतो.
- ज्या वस्तू मानवनिर्मित (मॅन्यूफॅक्चर्ड) आहेत, त्यांना हा टॅग प्राप्त करून घ्यायचा असेल, तर त्यांच्या निर्मिती चक्रापैकी किमान एक प्रक्रिया तरी त्या विशिष्ट भौगोलिक स्थानावर होणं आवश्यक आहे. 
 
आता एक शंका उपस्थित होऊ शकते, की शेतीजन्य अथवा नैसर्गिक वस्तूंचा थेट संबंध त्या-त्या भौगोलिक स्थानाशी असतो हे मान्य; पण ज्या वस्तू मानवनिर्मित आहेत, त्यांना जीआय टॅगची काय आवश्यकता? त्यांची निर्मिती तर कुठेही होऊ शकते. त्यासाठी विशिष्ट भौगोलिक स्थानच पाहिजे, असं कुठे आहे? तर याचं उत्तर असं आहे, की काही गावांमध्ये पिढ्यानुपिढ्या काही उत्पादनांची निर्मिती होत आलेली असते. ही उत्पादनं म्हणजे त्यांचा सांस्कृतिक वारसा असतो. या उत्पादनांची निर्मितीप्रक्रिया कुठेही लिखित स्वरूपात उपलब्ध नसते, तर एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हे ज्ञान झिरपत गेलेलं असतं. केवळ यंत्र बसवली की ते उत्पादन कुठेही तयार होऊ शकत नाही, कारण त्या प्रक्रियेत काही खुबी, काही विशिष्ट पद्धती असतात ज्या त्या-त्या स्थानिक लोकांनाच माहित असतात. याला म्हणतात “ट्रॅडिशनल नॉलेज”. शिवाय, त्या उत्पादनांसाठी पोषक आणि आवश्यक असलेला कच्चा माल त्याच भौगोलिक स्थानावर सहजी उपलब्ध असतो. म्हणून परंपरागत मानवनिर्मित वस्तूंनाही जीआय टॅग मिळतो.
उदाहरणं-
• शेतीजन्य वस्तू- नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष, काश्मिरचं केशर
• नैसर्गिक वस्तू- स्कॉटलंडची “स्कॉच” व्हिस्की- या व्हिस्कीची निर्मिती करताना स्कॉटलंडमधल्या झऱ्यांचं शुद्ध पाणी वापरलं जातं आणि म्हणून तिची चव ही एकमेवाद्वितिय असते. अर्थात, “पाणी” आणि पाण्याची चव हा या व्हिस्कीमधला सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक आहे. अन्य कुठलंही पाणी वापरलं, तर “स्कॉच”ची चव बिघडते असा स्कॉटलंडचा दावा आहे. त्यामुळे जगात इतरत्र कुठेही निर्माण झालेल्या व्हिस्कीला “स्कॉच” म्हणता येऊ शकत नाही. तो टॅग फक्त आणि फक्त स्कॉटलंडच्याच व्हिस्कीला प्राप्त झालेला आहे.
• उत्पादित वस्तू- सोलापुरी चादर, मध्य प्रदेशची चंदेरी साडी, बिहारची मधुबनी चित्रकला
जीआय टॅगमुळे काय साध्य होतं? तर, त्यामुळे फक्त त्या उत्पादनालाच ते भौगोलिक वैशिष्ट्य जोडलं जाऊ शकतं. इतर कोणीही ते वापरू शकत नाही. अर्थातच, त्यामुळे चहाच्या आधी कोणी ’दार्जिलिंग’ शब्द वापरला असेल, तर डोळे झाकून तो अस्सल दार्जिलिंग चहाच आहे याबद्दल आपण आश्वस्त होऊ शकतो. 
 
जीआय टॅगमुळे किती फायदे होतात पहा :-
१) त्या त्या भौगोलिक स्थानाचे महात्म्य वाढतं.
२) दर्जात तडजोड होत नाही.
३) अव्वल दर्जाच्या उत्पादनामुळे लाखो ग्राहक संतुष्ट होतात.
४) त्यांच्या प्रशंसेमुळे आणखी ग्राहक जोडले जातात.
५) मागणी वाढल्यामुळे अधिकाधिक लोक उत्पादन साखळीत सामील होतात, त्यामुळे त्या भौगोलिक स्थानाचा विकास होतो.
६) परंपरागत उत्पादनं असतील, तर स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.
७) यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण यांच्यामुळे लोप पावत चाललेली सांस्कृतिक देवाणघेवाण जिवंत राहते.
जीआय टॅग मिळवायचा कसा?
ही एक बौद्धिक संपदा आहे आणि इतर सर्व बौद्धिक संपदांप्रमाणेच याच्याही अर्जाची एक प्रक्रिया आहे. मुख्य कार्यालय चेन्नई इथे आहे. चेन्नईस्थित पेटंट निबंधक यांच्याकडे देशातल्या जीआय प्रक्रियेची जबाबदारी आहे. 
 
अर्ज कोणी करावा-
जीआय टॅग कोण्या एका व्यक्तीला मिळत नाही, तर त्या भौगोलिक स्थानावर ते उत्पादन घेणाऱ्या सर्व उत्पादकांना मिळून हा टॅग मिळतो. त्यासाठी, आधी सर्व उत्पादकांची एकजूट होणं आवश्यक असते. मग त्यांनी सर्वांनी मिळून अर्ज करावा लागतो. त्यामुळे, बचतगट, सहकारी संस्था स्थापन करून अर्ज करता येऊ शकतो. निबंधकाला तुमच्या उत्पादनाचं भौगोलिक महत्त्व / मूळ/ कूळ पटवून देणं हीच सगळ्यात महत्त्वाची कसोटी असते. त्यामुळे त्या भागातले जितके जास्त लोक अर्जप्रक्रियेत सामील होतील, तितकी अर्जाला बळकटी मिळते. 
 
निबंधक पायरी पायरीने सर्व छाननी करतात आणि सर्व काही व्यवस्थित असेल, तर ते अर्जदाराच्या नावे एक प्रमाणपत्र जारी करतात. त्यात जीआय क्रमांक, जीआयचं नाव आणि अर्जदाराचे नाव लिहिलेलं असतं. 
 
हे प्रमाणपत्र म्हणजे उत्पादकांचं हत्यार असतं. कोणी प्रमाणित जीआयचा गैरवापर करून आपल्याकडचा कमअस्सल माल खपवायला प्रयत्न केला, तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. 
 
एक महत्त्वाचा मुद्दा - पेजीआयद्वारे मिळणारे हक्क मात्र अ-हस्तांतरणीय असतात. कारण, जीआय कोण्या एका व्यक्तीचा नसतो, तर तो त्या विशिष्ट स्थानाचा, किंबहुना त्या स्थानाच्या भौगोलिक परंपरेचा सन्मान असतो. त्यामुळे ही ’संपदा’ असली, तरीही ती कोणत्याही प्रकाराने दुसऱ्याच्या नावे केली जाऊ शकत नाही.
 
जीआय प्रमाणपत्र एका वेळी दहा वर्षांसाठी मिळतं. दहा वर्षांनंतर नूतनीकरणाचा अर्ज करून आणखी दहा वर्षांकरता टॅग मिळू शकतो. पण नूतनीकरण्याच्या वेळेला निबंधकाकडून परत एकदा छाननी होते. मधल्या दहा वर्षात जीआय टॅगचा यथायोग्य वापर केला गेला आहे की नाही, उत्पादन सुरू आहे की नाही, त्यातून भौगोलिक स्थानाचा विकास झाला आहे का नाही हेही तपासलं जातं. यात काही त्रुटी आढळल्या, तर जीआय रद्ददेखील होऊ शकतो. त्यामुळे जीआयचा मान राखणं, त्याची जपणूक करणं आणि विकास करणं हे केवळ उत्पादकांच्या हातात असतं.
 
जीआयचे महत्त्व आणि गरज तुम्हाला कळली असेल, अशी आशा करते. त्यामुळे, या वर्षी आंबे घेताना अस्सल, जीआय टॅग असलेले हापूस आंबेच विकत घ्या हं!
***

0 comments: