इतक्यातच काही कारणाने दंतवैद्याकडे जावं लागलं तिच्या खुर्चीवर बसून, तिला शरण गेल्यावर आपल्याला करण्यासारखं फारसं काही उरतच नाही. त्यामुळे, डोळे मिटून दंतवैद्यांकडचे जुने प्रसंग आठवायला लागले. माझी associative memory प्रचंड strong आहे. त्यामुळे एका प्रसंगाशी निगडित कोणतेही, एरवी विस्मरणात गेलेले प्रसंग मला आठवायला लागतात. तसंच आत्ताही झालं.
मी लहान असताना माझे पुढचे दात पुढे आलेले होते. त्यामुळे, दुधाचे दात पडून पक्के दात आल्यावर दातांना ’तारा’ बसवायचा निर्णय घेतला गेला.
मी लहान होते, तो काळ बराच जुना आहे. तेव्हा दातांना bracesच लावत असले, तरी त्यांना ’तारा’च म्हणायची पद्धत होती! तेव्हा orthodontist, अर्थात ’तारा लावणारे’ डॉक्टरही मोजकेच होते. त्यापैकी एक डॉ. सावनूर माझ्या घराच्या अगदीच जवळ होते, ते पक्के झाले. त्यांनी दात तपासले आणि दातांना तारा बसवायच्या ठरल्यावर मागे जाणाऱ्या दातांना जागा हवी, म्हणून सुळ्याशेजारचे दोन दात काढून या, असं सांगितलं.
या डॉक्टरांमध्येही कशी व्यवस्था आहे बघा! हे स्पेशालिस्ट डॉक्टर होते, दातांचंच काम करत होते, पण दात काढण्याचं बेसिक काम मात्र त्यांचं नव्हतं. ते काम मात्र साध्या डेंटिस्टचं अडला हरी. गेलो, मी आणि माझे वडिल. दात काढताना ते इंजेक्शन देणार, खूप दुखणार, रक्त येणार, काहीही खाता येणार नाही वगैरे भीती आधीपासूनच वाटत होती. मी त्यांच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी काही कळायच्या आतच मला गालात भुलीचं इंजेक्शन दिलं. आता लोक सहसा इंजेक्शन देण्याआधी घाबरतात की नाही? माझं भलतच! त्यांनी इंजेक्शन दिलं, तेव्हा मला बारिकसं दुखलं, तेव्हा मी रडले नाही. पण भूल चढल्यावर गाल प्रचंड सुजला आहे असं वाटायला लागलं आणि त्यानंतर मी भोकाड पसरलं!
भोकाड म्हणजे भो का ड! मी तशी रडकी नव्हते. धडपडले, रुसले तर रडायचे, पण मुळूमुळू. आत्ता मात्र मी व्यवस्थित भोकाड पसरलं, “खूप दुखतंय”, “मला भीती वाटते”, “मी नाही दात काढणार”, “आपण घरी जाऊ” टाईप proper tantrum मी तिथे सुरू केला! माझे वडील लागले हसायला आणि डॉक्टर तर perplex झाले. उलट, बाळा आता दात काढलेला कळणारही नाही, म्हणूनच इंजेक्शन दिलंय हे ते मला परोपरीने समजावायला लागले, पण माझं रडं थांबेचना
मी खुर्चीवरून उठले आणि वडिलांचा हात धरून ओढायला लागले. शेवटी वडिलांनी कशीबशी समजूत घातली, आणि दोन्ही दात काढले एकदाचे! तेव्हा अर्थातच नाही दुखलं. नंतर दुखलं असेल, तर आठवत नाही. आठवतं ते माझं भोकाड!
असो. त्या जखमा भरल्यावर स्वारी गेली डॉ. सावनूरांकडे. एव्हाना मला ’तिकडे’ out of character जाऊन रडल्याची भयंकर लाज वगैरे वाटलेली होती. त्यामुळे, “तारा लावल्यावरही खूप दुखतं”, “दोन दिवस काहीही खाता येणार नाही” वगैरे सांगितलेलं असलं, तरी ’इकडे’ आपण अजिबात रडायचं नाही, असा मी निर्धार वगैरे केलेला होता. आणि तो मी पाळलाही. (तिथली एकच आठवण वाईट आहे, ती म्हणजे जबड्याचा साचा बनवण्यासाठी तोंडात रबरी काहीतरी भरलेला साचा घालतात. त्यात दात रुतवायचे असतात. अत्यंत घाण वास असतो त्याला. अक्षरश: उलटी होते त्याने!) डॉ. सावनूरांनी अगदी निवांतपणे दोन-चार सिटिंगमध्ये मला तारा बसवल्या.
पहिल्यांदा वडिल बरोबर आले होते. पुढच्या सगळ्या टप्प्यांसाठी आणि त्यानंतर मागे येणारी तार कापण्यासाठीही एकटीच गेले मी. तारांमुळे गाल, ओठ सोलवटायचे, पण कधीच रडले नाही. ते डॉक्टर अगदी गोड होते, soft spoken आणि mild mannered. मी नीट ब्रश केलेलं नसलं, तारेत काही अडकलेलं असलं की त्यांना लगेच कळायचं, ते रागवायचेही, पण अगदी सौम्य. (मला आईच्या दणदणीत ओरडण्याची सवय. मी काय त्यांचं ऐकतेय! ते रागावले की मला हसायलाच यायचं ) मला अजूनही त्यांचा चेहरा नीट आठवतो. May God bless him
त्यानंतर खूप खूप वर्षांनी माझं लग्न ठरलं. बोलताना कधीतरी, लहानपणी दात पुढे होते, तारा लावून मागे घेतले आहेत वगैरे सांगितलं. तर, गंमत म्हणजे माझ्या नवऱ्याचेही दात त्याच्या लहानपणी तारा लावून मागे घेतले होते आणि त्याचे डॉक्टर कोण होते माहितेय? येस. डॉ. सावनूरच! मला या योगायोगाचं प्रचंड आश्चर्य आणि गंमतही वाटली होती! आत्ता लिहितानाही वाटतेय
माझा आणि नवऱ्याचा स्वभाव, मतं, आवडी जुळतात का हा वेगळा मुद्दा आहे. आमचं हास्य मात्र १०० टक्के जुळतं, thanks to Dr. Savnur!
****
0 comments:
Post a Comment