June 6, 2024

उघड स्वगत

 

लहानपणी एक कथा वाचली होती. एका अट्टल गुन्हेगाराला फाशी देण्याआधी त्याची शेवटची इच्छा विचारतात, तेव्हा तो आईला भेटायची इच्छा दर्शवतो आणि ती भेटायला आल्यावर तिचा कान चावून म्हणतो, “मी चोऱ्या करायला लागलो तेव्हाच तू मला थांबवलं असतंस, तर आज मला फासावर जाण्याची वेळ आली नसती.” हे असे चोर फक्त गोष्टीतच असतात का? हे पोर्शे प्रकरण माझ्या सगळ्याच भाबड्या कल्पनांना सुरुंग लावतंय

😓

“आजोबा” म्हणलं की डोळ्यासमोर करारी, सचोटीनं आयुष्य जगलेली, टक्केटोणपे सहन करूनही प्रेमळ वागणारी व्यक्ती उभी राहते. या प्रकरणातले तथाकथित आजोबांचे तर अंडरवर्ल्डशीच संबंध होते! त्यांनी ड्रायव्हरला धमकावलं. बापाने नेते म्हणू नका, पोलिस म्हणू नका, सरकारी डॉक्टर म्हणू नका… सगळ्यांना धमकावून कामाला लावलं आणि आता आईनेच रक्त बदललं! अरे त्या मुलाला इतकं पाठीशी घालण्याऐवजी त्याच्या हातात दारूचा ग्लास, पैशाच्या थप्प्या, “तू कर रे काहीपण”वाला माज दिला नसता तर? दोन तरुणांचा जीव घेतलाय त्याने! याबद्दल यांच्यापैकी कोणाला काही वाटतंय का? व्यवस्थेला वाटतंय का? रावणाच्या घराण्यातही एक बिभीषण होता. राक्षसाघरीही नैतिकता असते, बोच असते, अपराधीपणाची हलकीशी जाणीव असते. या सगळ्या खरोखर फक्त गोष्टीतल्या गोष्टी उरल्या आहेत ☹️
 
आणि हे झालं एक उदाहरण फक्त, हे काही एकमेव उदाहरण नाहीये. त्या वयाच्या मुलामुलींचं हेच चालू आहे की. त्यांनी कोणाचा जीव घेतला नसेल, पण बापाचे पैसे उडवणं, अपरात्रीपर्यंत बाहेर राहणं, सर्रास कोणत्या ना कोणत्या प्रकारची नशा करणं यात कोण कमी आहे? उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय… पैसे उडवण्याची ऐपत कमी-जास्त होते. सवयी त्याच.
 
जबाबदारीचं सुटलेलं किंवा नसलेलं भान याचा फार मोठा फटका या मुलांना आणि पर्यायानं पूर्ण समाजाला लवकरच बसणार आहे, किंवा या अशा प्रकरणांमुळे ऑलरेडी बसायला लागलेला आहे 😢 हे आता शेजारच्या घरात नाही, आपल्याच घरातही चालू झालेलं आहे, कारण नैतिकता शिकवणारी आणि आचरणात आणणारी, आदर्श म्हणता येईल अशी माणसं घरात तरी कुठे आहेत? सगळेच पालक ’माझ्या मुलांना काहीही कमी पडू देणार नाही’, म्हणत मुलांना लाडावून ठेवतात, स्वत: दारू पीतात, पार्ट्या करतात, व्यसनं ग्लोरिफाय करतात, लाचखोरीसारखे गुन्हे ’नॉर्मलाइज’ करतात, समानता अशी, की घरातल्या स्त्रियाही यात मागे नाहीत. आया मुलग्यांना आणि बाप मुलींना बेसुमार लाडावून ठेवतात. साधं वेळेचं बंधन कोणी पाळत नाही, सिग्नल पाळत नाही, सहज खोटं बोलतात, परीक्षेत कॉपी करतात, सामाजिक संकेत पाळत नाही, शिष्टाचार नाही. उलट "असं करू नका" म्हणणाऱ्यालाच वेड्यात काढलं जातं, तोच अतार्किक आहे असं लेबल त्याच्या माथ्यावर मारलं जातं 😐
 
या गुन्ह्यातला आरोपी स्वभावाने कसा आहे माहित नाही, आपल्या अविचारामुळे आपण दोन जीव घेतले याचे गांभीर्य त्याला कळतं का, माहित नाही. त्याला काय दिसतंय? त्याला वाचवण्यासाठी सगळी व्यवस्था मॅनेज केली जातेय, आख्खं घर आपल्याला वाचवायला धावतंय. त्यामुळे त्याला खरोखर आपल्या वर्तनाचा पश्चाताप होईल, तो स्वत:लाच शिक्षा करून घेईल, सुधारेल याचे चान्सेस किती आहेत? खरं सांगायचं, तर नाहीतच. पण चुकून झाला, आणि त्याने आजोबा, बाप आणि आईचे कान चावले, तर त्याची त्यात काय चूक असेल? त्यांनी त्याच काय संगोपन केलं, काय संस्कार केले?
 
मुद्दा असा आहे, की तरुण मुलं असलेल्या किती आई-वडिलांनी यातून धडा घेतला आहे? मुला/मुलीला दोन शब्द सुनावता येतील इतका त्यांचा नैतिक पाया मजबूत आहे का? मुलांना शिस्त लावणे, पैसा जपून वापरायला शिकवणे, वेळेचे बंधन घालणे, “नाही” म्हणणे, जबाबदारीचे भान राखणे हे पालक शिकवताना कचरतात का? का कचरतात? कारण ते स्वतः यातलं काहीही पाळत नाहीत, म्हणून? ही पालकांची जबाबदारी नसते? पालकत्व म्हणजे केवळ जन्म देणे नाहीच, तर पाल्याला एक उत्तम, सुसंस्कारी, जबाबदार नागरिक बनवणे म्हणजे पालकत्व. स्वतः उत्तम पालक आहोत का याचा धांडोळा प्रत्येक आईबापाने घेणं अनिवार्य झालं आहे, असं नाही वाटत? (जे पालक, जी मुलं जबाबदार आहेत, अर्थातच त्यांना हे काहीच लागू नाही.)
 
असो. व्यर्थ आशावाद आहे हा असंही वाटतं. गोष्टी कधीच हाताबाहेर गेलेल्या आहेत 😭 नैतिकता लोप पावलेली आहे. ऱ्हास सुरू झाला आहे. त्याच्या वेगानं तो आपल्याला गिळेलच. त्या आधी शक्य तितकं बोलत, सांगत आणि अखेर सहनशक्ती असेतो सहन करत रहायचं, बस्स.
******

0 comments: