May 28, 2024

#AptitudeTest किंवा #कलचाचणी

 

दहावी पास झालेल्या मुलांची #ॲप्टिट्यूडटेस्ट, म्हणजेच कल चाचणी करून घेतली आहे का? सहसा दहावीचे वर्ष संपताना ती शाळांमध्येच केली जाते पण काही शाळांमध्ये झाली नसेल, तर कुठेही प्रवेश घेण्याआधी तातडीने आधी पाल्याची ही कल चाचणी करून घ्या.
 
#AptitudeTest किंवा #कलचाचणी म्हणजे काय?
ही चाचणी केल्यानंतर तुमच्या पाल्याला, 'तू फिजिक्समध्ये पीएचडी कर', 'तू चार्टर्ड अकाउंटंट हो', 'तू आर्किटेक्चरची डिग्री घे' असे थेट सांगितले जात नाही. तसे या चाचणीतून अपेक्षितही नाहीये. त्यामुळे त्यातून तुमच्या पाल्यासाठी कोणतेही रेडीमेड उत्तर मिळत नाही, याची कल्पना पालक आणि पाल्य यांना आहे ना? 😀
 
"कल चाचणी" हे नावच पुरेसे स्पष्ट आहे. यातून तुमच्या पाल्याच्या मेंदूचा कल कुणीकडे आहे याचे संकेत मिळतात. म्हणजे त्याच्या मेंदूचा कल हा गणिते सोडवणे, कोडी सोडवणे यांच्याकडे आहे, का त्याला विश्लेषण करायला अधिक आवडते, का त्याच्या भाषाविषयक कल अधिक चांगला आहे? अशा पद्धतीचे साधारण ठोकताळे या चाचणीतून मिळतात. प्रत्येकाचा मेंदू, त्याची आकलनक्षमता वेगवेगळी असते, हे तर आपण मान्य करतो. मग करियरची, भविष्याची वाट निवडताना आपला मेंदू, म्हणजे डोकं कशात "चालतं" आणि कशात नाही हे माहीत असणे गरजेचेच असते! या चाचणीतून मिळालेली उत्तरे, आणि आपण आपल्या पाल्याची ओळखत असलेली शैक्षणिक क्षमता यांची सांगड घालून मग त्याचा पुढचा रस्ता निवडणे अधिक सुकर, सोपे आणि गुंतागुंत-विरहित जाते.
 
उदा. पाल्याला आता दहावीला इंग्रजीमध्ये १०० पैकी ९४ गुण मिळालेले आहेत. पण त्याचा भाषेकडे किती ओढा आहे? तो पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त किती वाचन करतो? हे ९४ मार्क घोकंपट्टी करून, साचेबद्ध प्रश्नपत्रिका सोडवून मिळालेले आहेत, का खरोखर त्याची कल्पनाशक्ती उत्तम आहे? शब्दसंपदा भरपूर आहे? एखादी कल्पना तो स्वतःची स्वतः मांडू शकतो का? विचार करू शकतो का? याचे उत्तर जर हो असेल, आणि कलचाचणीमध्येही पाल्याचा भाषेकडे त्याचा जास्त ओढा आहे असे आले, तर या दोन्हीची सांगड घालून मग पाल्याला भाषेचा अभ्यास करण्यासाठी पुढचे शिक्षण घेता येईल.
 
उलट हे ९४ मार्क जर केवळ पाठांतरामुळे मिळालेले असतील तर ते फसवे आहेत हे पाल्याने स्वतः आणि त्याच्या पालकांनीही ओळखायला हवे. अशाच पद्धतीने गणितात मिळालेले मार्क, विज्ञान, इतिहास, भूगोलात मिळालेले मार्क आणि कल चाचणीतून दिसणारा कल या दोन्हींची सांगड घालून मग पुढचा रस्ता निवडावा.
महत्त्वाचे म्हणजे, पाल्याचा कल कुठे "कमी" आहे, हेही या चाचणीतून स्पष्ट होते. उदा. व्यावहारिक ज्ञान कमी आहे, आकडेमोड फारशी चांगली नाही, इ. त्यामुळे कोणत्या बाबतीत सुधारणा करायला वाव आहे, कोणत्या गोष्टी त्याला नाहीच जमणार, याचाही अंदाज येतो.
 
Technical courses, diploma सोडले, तर सध्यातरी दहावीनंतर ढोबळमानाने आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स हे तीनच पर्याय आहेत. महत्त्वाचे म्हणजे, पुढे काय करायचे आहे हे ठरवण्यासाठी बारावीपर्यंत आणखी दोन वर्ष मिळतात. बहुतांश विद्यार्थ्यांचे दहावीनंतर पुढे नेमके काय करायचे आहे याचे चित्र धूसर असते. कल चाचणीमुळे त्यांच्या मेंदूचे आकलन साधारण कोणत्या दिशेला आहे हे समजते.
 
ज्या मुलांचे सगळे ठरलेले आहे, पुढचा रस्ता स्पष्ट आहे, त्यांनीही confirmation साठी ही चाचणी करून घ्यायला हरकत नाही.
 
* कल चाचणी कुठून करून घ्यावी?
कोणत्याही फॅन्सी नावांना, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटसना बळी पडू नका. सगळे करतात म्हणून, खूप पैसे मोजून पाल्याचे ब्रेन मॅपिंग, फिंगरप्रिंट टेस्टिंग असे करण्याची काहीही गरज नाही. सरकारमान्य शैक्षणिक संस्था, एमकेसीएल, नावाजलेली काउन्सलिंग सेंटर यांच्या aptitude test असतात. त्या विचारपूर्वक तयार केलेल्या असतात. तिथेच अनेकदा counselling म्हणजेच समुपदेशनही केले जाते, चाचणीचा अर्थ समजावून सांगितला जातो आणि पुढचे पर्यायही सुचवले जातात.
 
अनेक मुलं झेपत नसलेले महागडे अभ्यासक्रम सुरू करून नंतर तो अर्धवट सोडतात. आपल्याला काय झेपेल आणि काय नाही, हे आधीच समजणे इष्ट नाही का? एखादी गोष्ट नाही जमत हे मान्य करण्यात काहीच कमीपणा नसतो. उलट, मर्यादा समजली की सामर्थ्यही समजते! 😊
 
ही चाचणी म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ नसते. मुलांचे वय आणि समज वाढते, चांगली संगत मिळाली तर एखाद्या गोष्टीत आवड निर्माण होते. त्याप्रमाणे त्यांचा कलही बदलू शकतो, करिअरमध्ये बदल होऊ शकतात. पण एक संकेत म्हणून, एक दिशादर्शक म्हणून, एक सुरूवात म्हणून या कलचाचण्या सुयोग्य काम करतात. आणि, "दहावी पास" हीच त्यांची योग्य वेळ आहे. पालकांना मुलाबद्दल आणि पाल्याला स्वतःबद्दल काही नव्या गोष्टीही कळतात यातून 😁

"मला अमूक गोष्ट छान येते", "मला हे आवडतं" असं अनेक मुलांना वाटतं, त्यांच्या आई-वडिलांनाही वाटतं ;) ते त्यांना खरंच छान येतं का आणि आवडतं का हे कल चाचणी नक्की सांगू शकते. म्हणून सर्वांना आवर्जून सांगणं, की दहावी पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यची कल चाचणी करून घ्याच. एक मार्गदर्शिका म्हणून तरी तिचा नक्की उपयोग होतो.  
 
टीप: मी कोणत्याही Aptitude Test Centre शी संबंधित नाही. माझी स्वत:ची कल चाचणी माझ्या वडिलांनी करून घेतली होती, मी माझ्या मुलाची केली होती. आम्हाला उत्तम परिणाम दिसले, उपयोग झाला, म्हणून सर्वांना हे सांगायचा प्रयत्न करत आहे, बस 🙏🏻

0 comments: