May 18, 2024

बघाल तर वाचाल

 


“लंपन”चा ट्रेलर पाहिला का? प्रकाश नारायण संतांचा हा मानसपुत्र, सगळ्यांचा लाडका मुलगा ओटीटीवर येतोय, मालिकारूपात. कसा वाटला तुम्हाला हा लंपू? "बघितल्यावर" मला खुद्द लंपन आवडला, पण सुमी, आजी, आजोबा आणि बाबा “माझ्या” मनातल्या सुमी, आजी, आजोबा आणि बाबांप्रमाणे मुळीच वाटले नाहीत आणि त्यामुळे फार रुचलेही नाहीत 😔 कदाचित, त्यांची कामं पाहिल्यावर पुढे ते आवडतील. पण फर्स्ट इम्प्रेशन म्हणतात, ते अनुकूल नाही पडले बुवा! 🤷
 

 
 
पण कोणत्याही अतिशय लोकप्रिय, सर्वांना आवडलेल्या पुस्तकाचं रूपांतर प्रत्यक्षात होतं, तेव्हा हे असंच वाटतं, नाही? वाचताना प्रत्येक जण आपापल्या मनाप्रमाणे एक छबी, प्रतिमा तयार करतो आणि बहुतांश वेळा, ती पडद्यावरच्या प्रतिमेपेक्षा वेगळीच असते! ’मला जसं वाटलं होतं, तसंच, तंतोतंत!’ असं नाहीच दिसत 🙃
शेरलॉक होम्सच्या तर किती आवृत्त्या आल्या, व्हर्जिन रिव्हर, जॅक रीचर, असंख्य सुपरहीरो, डिटेक्टिव, इन्स्पेक्टर यांचे सिनेमे/ मालिका आल्या. अनेक आदरणीय, खऱ्या व्यक्तीमत्त्वांवर सिनेमे केले गेले, अजूनही केले जात आहेत… पण ’पुस्तकापेक्षा रूपांतर सरस झालंय’ अशी उदाहरणे विरळाच! 🤨
 

 
 
’हॅरी पॉटर’मध्ये काम करणारे सगळेच प्रौढ हे इंग्रजी नाट्यभूमीवरचे, दिग्गज कलाकार होते. हॅरी आणि सगळीच लहान मुलं मात्र पूर्णपणे नवखी होती. पण काय परफेक्ट बसली ती त्यात्या भूमिकेच्या कोंदणात! हॅरी, रॉन, हर्मायनी याच काय, तर फ्रेड आणि जॉर्ज, लुना, नेव्हिल, ड्रेको हेही परफेक्ट. पण त्याची गंमत म्हणजे, पात्र अगदी पुस्तकाप्रमाणे होती, तरी खुद्द सिनेमे मात्र पुस्तकांच्या पासंगालाही पुरले नाहीत! 😅 स्पेशल इफेक्ट्स, प्रचंड बजेट, सर्वोत्तम तंत्रज्ञ हाताशी असूनही पुस्तकांचा जबरदस्त आवाका या दृश्य माध्यमाला कवेत घेता आला नाही! 🙄
 

 
 
 
थोडक्यात, हे आहे तर ते नाही, ते आहे तर हे नाही! 😆
 
पुस्तकाचं दृक-श्राव्य रूपांतर नवीन रसिकांपर्यंत पोचण्यासाठी गरजेचं असेलही. त्यात माध्यमांतराचं खूप मोठं आव्हान आणि अर्थातच गंमतीही आहेत, पण ते रूपांतर कधीच स्वतंत्रपणे पाहिलं जात नाही, मूळ अपेक्षांचं ओझंही त्या कलाकृतीवर येतंच. शिवाय, पुस्तक आणि वाचकाचं इन्टिमेट नातं तयार होतं. पुस्तकातली गोष्ट वाचक त्याच्या एक्स्क्लुजिव नजरेनं पाहतो, कल्पना करतो. ते त्याचं एकट्याचं, पर्सनल चित्र असतं. ते असं सार्वत्रिक, सगळ्यांबरोबर तो नाही वाटून घेऊ शकत!
 
मग कमालीच्या लोकप्रिय, लोकांच्या हृदयात स्थान कमावलेल्या पुस्तकांचे सिनेमे किंवा मालिका होऊच नयेत की काय? उलट मला तर वाटतं, याव्यात! भरपूर याव्यात, कारण त्यामुळे मूळ पुस्तकाविषयी उत्कंठा वाढते आणि त्यांची मागणी वाढते!😀😀 त्या निमित्ताने लोक परत पुस्तकांकडे वळतात. ’वाचाल तर वाचाल’ आता जुनं झालं, ’बघाल तर वाचाल’ ही नवीन म्हण प्रचलित करायला हरकत नाही. मला खात्री आहे, अनेक जणांनी आता “वनवास” परत कपाटातून काढलंही असेल! 😉
 
तुमचं काय मत? तुम्हाला कोणतं रूपांतर पुस्तकापेक्षा अधिक चांगलं वाटलंय?

0 comments: