April 2, 2024

हे आणि ते

 हे म्हणजे बालपणातले मित्र/ मैत्रिणी/ शाळासोबती/ शेजारी/ लांबचे भाऊ/ बहिणी इ. फेसबुक आणि व्हॉट्सॅप घरोघरी पोचल्यानंतर कमीतकमी वीस-पंचवीस वर्ष ज्यांच्याशी काहीही संपर्क नाही, त्यांना भेटण्याचे सामाजिक प्रेशरच आले जणू!  त्या भेटींचे प्रोग्रेशन कसं होतं, बघा हं-

१)    पहिली भेट अगदी मस्त होते. शिक्षण, कुटुंब, आई-बाबा-भाऊ-बहिण कुठे. कसे आहेत, मुलं किती, नोकरी, स्थायिक कुठे (मोस्टली परदेशातच) – इतक्या चौकशा असतात, की पहिल्या भेटीत वेळच पुरत नाही. जितकी डोकी अधिक, तितक्या चौकशा अधिक! मोबाईल नंबरची देवाणघेवाण, ताबडतोब एफबी, इन्स्टावर एकमेकांना ऍड, फोटो अपलोड… सारे साग्रसंगीत होते. पाचेक तासांनी ती भेट संपते.

२)    दुसरी भेट यानंतर काही महिन्यांनी होते. तेव्हा शाळा/ नातेवाइक/ बालपण जिथे गेलं तो वाडा/ इमारत/ कॉलनी- थोडक्यात एकत्र होतो, तेव्हाच्या जागा, तेव्हाची माणसे, तेव्हाचा ’काळ’ याबद्दल अगदी रंगून जाऊन आठवणी उगाळल्या जातात. तेव्हाचे शिक्षक/ विक्षिप्त व्यक्ती/ सवंगडी यांच्याबद्दलही चर्चा होते. ’आता भरपूर पैसे आहेत, तरी ती मजा नाही’ टाईप उसासे टाकत तीनेक तासांनी ती भेट संपते.

३)    तिसरी भेट यानंतर आणखी कोणी सोबती भेटायला आला, तरच होते. त्याच्याशी परत नव्याने वरचे मुद्दे बोलले जातात. पण आधी भेटलेल्यांना त्यात काही नवं नसतं. तरी काहीतरी विषय उकरत कसेबसे दीड-दोन तास निभावले जातात.

४)    चौथ्या भेटीत मात्र सगळा उत्साह संपलेला असतो. नॉस्टॅलजिया उगाळून झालेला असतो. तुम्ही किंवा समोरचा गणितज्ञ, अभिनेता, सरकारी उच्चपदस्थ नसतो. ’नवीन काय चाललंय’ या प्रश्नाला ’चाललंय नेहमीचंच’ असं उत्तर येतं. नॉस्टॅलजियाचा भूत-आधार संपल्यावर ना तुम्हाला, ना त्याला तुमच्या वर्तमानात वा तुमच्या भविष्यात रस असतो. विषय संपतात. परत भेटू कधीतरी, असे गुळमुळीत वादे केले जातात. भेट संपते.

**

ते म्हणजे तुमचे सध्याचे मित्र/ सहकारी/ शेजारी/ मुलांमुळे ओळख झालेले समवयस्क पालक इ.

१)    ऑफिसमध्ये काही प्रोजेक्टमुळे/ एकाच वेळी जॉइन झाले वगैरे कारणांमुळे तुमची ओळख होते. काम एकत्र होतं, चहा-कॉफी-डबा-कार पूल होतो. ऑफिसातलं राजकारण, काम, मॅनेजरला शिव्या सारं काही यथास्थित होतं. कुटुंबाच्या माहितीची जुजबी देवाणघेवाण होते. मुलांचा केजी/ दहावी/ बारावी प्रवेश असेल, तरच जरा अधिकचे प्रश्न विचारले जातात, अन्यथा फार खोलात कोणीच शिरत नाही.

२)    मुलांचे पालक म्हणून बिल्डिंगमध्ये/ शाळेत/ क्लासला भेटी होतात. मुलांमुळे एकमेकांच्या घरीही क्वचित येणे-जाणे होते. खूपच पटले तर एकत्र ट्रिपाही होतात. मग मुलं मोठी होतात. त्यांचीच मैत्री संपते. पालकांची राहिली, तर राहते. यात स्त्री-पार्टीचं कॉन्ट्रिब्युशन अधिक असतं. त्यांचं एकमेकींशी जमलं, तर ओळख टिकते. त्यांना वेळ नसेल/ रस नसेल/ पटत नसेल तर पुढे ’हाय/ एकदा भेटू न/ एकदा घरी या न/ हा दिसला नाही गं’ वगैरे संवाद होतात, संपतात. दारं बंद होतात.

३)    या ’ते’ लोकांना एकमेकांच्या भूतकाळात काहीही रस नसतो. तुम्ही या आधी कुठे रहात होता/ तुमचं बालपण कसं/ कुठे गेलं/ तुम्हाला भाऊ-बहिण कोण, बाबा काय करायचे काहीही माहित नसतं, करूनही घ्यायचं नसतं. आजच्यापुरता संबंध, काम असेल तेवढा संबंध. काम संपलं, संबंध संपला. राम राम साई सुट्ट्यो. परत गरज भासली, तर एकत्र येऊ, गप्पा मारू. छान वेळ घालवू, बस.

हे ते होत नाहीत,

ते हे होत नाहीत,

ह्यांनी ते व्हावं असं वाटतं, पण त्यांना व्हायचं नसतं,

त्यांनी हे व्हावं असं त्यांना वाटलं, तरी आपल्याला तसं वाटत नसतं.

आपण एकदा ह्यांना जवळ करतो, एकदा त्यांना.

आपण एकदा ह्यांना लांब ठेवतो, एकदा त्यांना

आपण ह्यांचे असतो आणि त्यांचेही असतो.

आपण ह्यांचे नसतो आणि त्यांचेही नसतो.

आपणच हे असतो आणि आपणच ते ही असतो.

असं निरर्थक आणि तरीही अर्थपूर्ण असतं हे(ते) जगणं!

***   

 

0 comments: