February 13, 2024

अनेक क्षण सांभाळण्याचे…

 आजची पोस्ट खास mid-life मध्ये पोचलेल्या विवाहित जोडप्यांसाठी… खूपच अटी झाल्या ना! विवाहित, जोडपे आणि शिवाय मध्यमवयीन, म्हणजे साधारण ४५ ते ५५ वय असलेल्या नवरा-बायकोंसाठी ही खास पोस्ट.

लग्नाची पहिली वीस वर्ष कशीही जातात. सुरूवातीचे संसार मांडायचे दिवस, नव्या नवलाईचे दिवस, नोकरीचे बस्तान बसवण्याचे दिवस, मुलांचा जन्म, त्यांचे संगोपन, करियरमध्ये खुणावणारी नवी क्षितिजे, स्वत:चे घर, गाडी, प्रॉपर्टी, इस्टेट… कराल तितके कमीच. हे दिवस वादळी असतात, पण एकमेकांचा हात धरण्यावाचून पर्यायच नसतो. हळूहळू धावपळ कमी होते, आयुष्य जरासे संथ होते, किनारा नेमका कुठे आहे, तो कधी गाठायचा आहे याचा अंदाज येतो. लग्नाला वीसेक वर्ष झाली, की एकमेकांकडे खऱ्या अर्थाने बघायला वेळ मिळतो.

हीच ती सगळ्यात डेंजरस mid-life crisis ची वेळ. एकमेकांशी एव्हाना पूर्ण ओळख झालेली असते. स्वभाव, सवयी, आवडी, नावडी… नात्यातलं नवल संपलेलं असतं. Nothing surprises much. इथूनच drifting apart ला सुरूवात होण्याची शक्यता असते.  

आजकाल parallel आयुष्य किती सहजपणे जगता येतात… प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, त्यावर personal entertainment चे अनेक पर्याय असतात. प्रत्येकाचे स्वतंत्र मित्रवर्तुळ असते, प्रत्येकाच्या आपापल्या आवडीनिवडी असतात. नवरा-बायकोला तर एकमेकांना काय आवडत नाही- ही यादी पाठ असते. साहजिकच, उदा. नवऱ्याला ट्रेकिंग आवडत असेल, तर त्याचे-त्याचे ट्रेकिंग ग्रुप होतात, बायकोला नाटक-सिनेमा-साहित्याची आवड असेल तर तिचे तसे ग्रुप्स होतात. सहजपणे एकमेकांवाचून काहीही न अडता, आनंदी आयुष्य जगता येतेच. आणि यात चुकीचेही काही नाही. न आवडणाऱ्या ठिकाणी, केवळ जोडीदार आहे म्हणून ओढून नेणे म्हणजे छळ करण्यासारखेच आहे. त्यामुळे आपल्या आनंदासाठी आपल्या जागा शोधणे पूर्णपणे justifiable असावेच. So far so good.

पण सोम ते शुक्र करियर आणि शनि-रवि आवडीचं काम/ छंद यामुळे हळूहळू Family time गरजेचाच रहात नाही. लग्नाची ही पायरी आली, की लग्न टिकवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. मुद्दाम एकमेकांसाठी वेळ काढावा लागतो. तुमच्या शून्य आवडी जमत असल्या, तरी काही ना काही common ground असतंच. तुम्ही संसार केलाय, एकमेकांवर प्रेम केलंय, मुलांना जन्म दिलाय. You owe this much to the relationship. ’तू आनंदात आहेस, मी आनंदात आहे. एखादा क्रायसिस, मुलांचे काही, आई-वडिलांचे काही आले तर एकत्र येऊ, नाहीतर वेगळं वेगळं छान चाललंय आपलं’ ही स्टेज फार झटकन येऊ शकते. नेमके हेच क्षण असतात… सांभाळायचे.

हे नाही केलं, तर लगेच ते लग्न घटस्फोटापर्यंत पोचेल असं नाही, लगेच प्रत्येक जोडीदार विवाहबाह्य संबंध जोडेल असंही नाही. पण नात्यात एकत्र असूनही एकटेपणा येतो, जो सगळ्यात जास्त दु:खदायक असतो. एकाच घरात रहात असूनही, वेळ असूनही एकमेकांशी बोलायला विषयच नाहीयेत, ही स्थिती कोणत्याही लग्नात असू नये. ’मी तुझ्याशी का लग्न केलं’ असा प्रश्न मनात वा उघडपणे अनेकदा आपण विचारलेलाही असतो. पण केलं आहे, निभावायचं आहे. मनाविरुद्ध नाही, मनापासून. मग त्यासाठी प्रयत्नही करायलाच हवेत.

एकमेकांना खूश करायच्या, एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणायच्या कित्येक बारिकसारिक गोष्टी असतात नवरा-बायकोंमध्ये. काळाच्या ओघात फक्त ते मागे पडलेलं असतं. त्यावरची धूळ स्वच्छ करायची गरज असते, बस्स.

असं म्हणतात, की Life begins at forty. त्याच धरतीवर मी म्हणते. Marriage begins after twenty!

Cheers!

#PCWrites #ValentinesDay

0 comments: