September 14, 2023

एक मुद्रितशोधक, दोन मस्त अनुभव.

वर्ष २०१७. हॅरी पॉटरच्या जादुई विश्वाची निर्माती - ’जे के रोलिंग’ या मी लिहिलेल्या माझ्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचा प्रथम खर्डा तयार झाला. त्या आधी, प्रत्येक टप्प्यावर मी ते संपादकांना दाखवलेले होते आणि त्यांच्या सूचना लक्षात घेऊन पुस्तक लिहिलेले होते. त्यामुळे खर्डा पूर्ण झाल्यावर लगेच मुद्रितशोधनासाठी गेला, आणि लिटरली आठवड्याभरात मला मुद्रितशोधकाच्या सूचनांसह माझे बाड परत मिळाले. अगदी बारिक, किरट्या अक्षरात एका वहीच्या कागदावर मुद्दे लिहिलेले होते. पान क्र., त्यावर झालेली चूक आणि काही प्रश्न असे एकदम तपशीलवार टिपण होते.
 
मी घाबरत घाबरतच वाचायला लागले. पहिलाच प्रश्न होता :
“’ऍ’ हे कोणते अक्षर आहे, आणि त्याचा उच्चार कसा करायचा?” मला जाम हसायला आलं! 😁😁 मला माझ्या मराठी कीबोर्डवर अजूनही अ वर चंद्रकोर देता येत नाही. तसा प्रयत्न केला, की त्याचा ’ऍ’च होतो! मी काय करू? तर, ही जेन्युइन अडचण आता सर्वच प्रकाशकांना माहित आहे, त्यामुळे मजकूर कन्व्हर्ट केल्यानंतर तो ’ऍ’ सगळ्यात आधी दुरुस्त केला जातो. आता हे स्पष्टच होते, की या महाशयांना ही टेक्निकल अडचण माहित नव्हती. या सूचनेत मी करण्यासारखे काहीच नव्हते. पण त्यांच्या प्रश्नाची मात्र मला गंमत वाटली.
 
मग, पुढे एक प्रश्न होता, ’लॉर्ड व्होल्डेमॉर्ट’ हा शब्द चुकल्यासारखा वाटतो. ’व्हॉल्डरमॉन्ट’ असा तो शब्द असावा.’- इथे मात्र मी रागावले. तो शब्द चुकलेला नाहीये. ते नाव आहे. ते तसेच यायला हवे, असे मी स्पष्टपणे सांगितले.
 
आणखी काही किरकोळ सूचना होत्या, ज्या स्वीकारार्ह होत्या. त्यानंतर संपादक आणि मी चर्चा करून पुस्तकात आम्ही आणखी एक प्रकरण वाढवले. आणखी काही अडथळे आले, पण पुस्तक एकदाचे, दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रकाशित झाले. लेखिका म्हणून माझे नाव प्रथम प्रकाशित झाले! याचा आनंदच इतका होता, की मी (ते दोन प्रश्न सोडून) आधीचे सगळे विसरून गेले 😀
 
Next. साल २०१८. ’बूम कंट्री?’ या माझ्या पहिल्यावहिल्या अनुवादित पुस्तकाचा प्रथम खर्डा संपादकांनी नाकारला होता. मी अक्षरश: सगळ्या पुस्तकावर परत हात फिरवला होता. दुसरा खर्डा संपादकांना पसंत पडला. आता मुद्रितशोधन! पुस्तक मोठं होतं. पण त्या मानाने ते काम चटकन पूर्णही झालं! मला फार आश्चर्य वाटलं. संपादकांनी मला मुद्रितशोधकांच्या सूचना विचारार्थ पाठवल्या. त्यात एक फार लक्षवेधक सूचना होती.
 

 
 
’बूम कंट्री’ या पुस्तकात १९४७ ते २०१६ या व्यापक काळात भारतात झालेल्या औद्योगिक क्रांतीचा आढावा घेण्यात आलेला आहे. यात १०० उद्योजकांची मुलाखतवजा मनोगते आहेत. अगदी रतन टाटा, सुनील मित्तलांसारख्या दिग्गज उद्योजकांपासून नवीन स्टार्ट-अप्सच्या तरुण मालकांपर्यंत अनेक जणांशी लेखकाने संवाद साधलेला आहे. त्यात, सगळ्यात शेवटी एक उद्योजक-जोडी येते- स्वप्नील जैन आणि तरुण मेहता. हे दोघे अत्यंत हुशार तरुण एक स्वप्न प्रत्यक्षात साकारण्य़ासाठी धडपडत होते. बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकीचं डिझाइन त्यांनी स्वत: तयार केलेलं होतं आणि आता त्यांना तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं होतं. लेखकाने २०१६ साली ही मुलाखत घेतली होती. अनुवाद २०१८ मध्ये मी केला. तर इथे मुद्रितशोधकाची सूचना होत- ’आता या दुचाकीची प्रगती कुठवर आलेली आहे? भरीव काही झाले असेल, तर अद्ययावत माहिती देता येईल’.
 
मला ही कल्पना अभिनव वाटली. मी खरंच शोध घेतला, तर मधल्या दोन वर्षांत खरोखर त्यांनी स्वप्न पाहिलेल्या दुचाकीचे उत्पादन सुरू झाले होते आणि बंगळुरु इथे वितरणही सुरू झाले होते! म्हणजे, तीनेक वर्षाच्या काळात एक कल्पनेत असलेले उत्पादन प्रत्यक्षात आले होते. आम्ही लगोलग ही माहिती पुस्तकात समाविष्ट केली. ही दुचाकी म्हणजे ’एथर’ची ग्रीन एनर्जी बाईक! 😊 भारतातली पहिली 'इ-बाईक'. आज कदाचित तुमच्याकडे किंवा तुमच्या परिचितांकडे ही दुचाकी असेल. आता हे तंत्रज्ञान पुष्कळ सुधारलं आहे आणि रस्त्यावर अनेक कंपन्यांच्या ग्रीन बाईक्स दिसतातही. पण मला मात्र कोणतीही एथर गाडी दिसली की मला तिच्या जन्मापासून तिच्याबरोबर असल्यासारखं वाटतं! 😇 ही भावना अपूर्व आहे, आणि त्यासाठी मुद्रितशोधकाचे आभार मानावेत तितके कमी आहेत.
 
एरवी मी कोणते उत्पादन, त्याचे काय झाले असा विचारही केला नसता. पण अशा प्रकारे आपण स्वत:लाच किती मर्यादित करून घेतो आणि आपण आपल्या परीने काय भर घालू शकतो, असा विचार मी त्यानंतर करायला लागले. त्यापुढच्या माझ्या प्रत्येक पुस्तकात मी जमले तर माझ्याकडून भर घालायचा नक्की प्रयत्न केला आहे.
 
याचे पूर्ण श्रेय त्या मुद्रितशोधकांचे- माझ्या पहिल्या पुस्तकात (अनवधानाने) दोष काढणारेही हेच आणि माझ्या पहिल्या अनुवादाबाबत मीच साशंक असताना, ’फार जबरदस्त कामे केले आहे तुम्ही’, असे खुले कौतुक करणारेही हेच ते- श्री. अनिल जोशी 😊 त्यानंतर माझी आणि त्यांची दोस्ती झाली. वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ, चिकित्सक, चिकाटीने काम करणारे, स्वच्छ बोलणारे तरी मोठ्या मनाचे श्री. अनिल जोशी- त्यांच्या काटेकोर वाचनामुळे अनेक पुस्तकांचा दर्जा आणखी उंचावला आहे.
 
मला प्रत्येकच मुद्रितशोधकाकडून अपेक्षा आहे, ही अशा प्रकारच्या value addition ची! याने वैयक्तिक ना माझा, ना मुद्रितशोधकाचा; आलेख वर जातो, तो पूर्ण पुस्तकाचा. Trust me, it's worth the effort. आता सांगा, तुम्हीही श्री. जोशींना १०० पैकी १०० द्याल ना? 😊
***

0 comments: