September 7, 2023

मुद्रितशोधकाचे काम नेमके काय असते?

अर्थातच, मुद्रणातल्या व्याकरणाच्या चुका दुरुस्त करणे, हे मुद्रितशोधकाचे काम असते. बरोबर. पण, हे झाले ९९ टक्के काम! उरलेले १ टक्का काम काय असते, किंवा काय असले पाहिजे, यावर मी आज लिहिले आहे.

मी स्वत: काही लेखांचे/ मासिकांचे/ पुस्तकांचे मुद्रितशोधन केलेले आहे, आणि माझ्या सगळ्या पुस्तकांचे मुद्रितशोधन अर्थातच दुसऱ्या कोणी मुद्रितशोधकाने केलेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आलेल्या अनुभवांतून आणि विचारातून हे प्रकर्षाने लिहावेसे वाटले. आणखीही एक कारण आहे. मी अनेक स्त्रियांच्या “घरबसल्या काम हवे आहे” पद्धतीच्या पोस्ट वाचल्या आहेत, माझ्याकडेही काही महिलांनी “मलाही काहीतरी काम सांग ना” अशी मागणी केलेली आहे. त्या सगळ्या मागण्या, “मी बसल्या बसल्या प्रूफ रीडिंग नक्की करू शकते. माझे मराठी छान आहे,” अशा स्वरूपाच्या होत्या. त्यांनाही थोडेफार मार्गदर्शन मिळावे, मुद्रितशोधकाचे काम नेमके काय असते, हे समजावे, यासाठी हा लेखनप्रपंच.
 
तर, अर्थातच या कामात ९९ टक्के भाग हा मुद्रणाच्या चुका शोधून त्या शुद्ध, म्हणजेच दुरुस्त करणे हाच असतो. यात वादच नाही. प्रमाण शब्द, त्यांचा वापर, व्याकरणाचे नियम त्यासाठी अनेक शब्दकोश उपलब्ध आहेत- पुस्तकही आहेत आणि ऑनलाईनही आहेत. त्यामुळे, त्यांचा संदर्भासाठी उपयोग करून ऱ्हस्व, दीर्घ, कर्ता-कर्म-क्रीयापद, अनेकवचने, विरामचिन्हे, व्याकरणशुद्धी हे ९९ टक्के काम प्रत्येक मुद्रितशोधकाला करता येईलच /येतेच/ यायलाच हवे. म्हणजे ही झाली पाहिली आणि थेट शेवटून दुसरी पायरीदेखील! पण, शेवटची पायरी म्हणजे तो पुढचा १ टक्काच आहे, जो फार कमी मुद्रितशोधकांना सर करता येतो.
 
त्या १ टक्क्यात काय अपेक्षित असते? एक लक्षात घ्या, की मुद्रितशोधक हा पुस्तकाचा पहिला वाचक असतो. लेखकाचा जीव त्याच्या लेखनात अडकलेला असतो. त्यामुळे त्याला त्रयस्थ वाचकाची नितांत गरज असते. संपादक लेखन वाचतात, ते संपादकीय दृष्टीने. त्यांची भूमिका फक्त ’वाचका’ची नसते. इतर कोणालाही लेखनाचा खर्डा वाचायला दिला- मित्र, नातेवाईक इ. तर तेही लेखकाशी ’संबंधित’ व्यक्ती असल्याने लेखनाबाबत पूर्णपणे त्रयस्थ पद्धतीने मत व्यक्त करू शकत नाहीत. (सहसा, केले तर फक्त भरपूर कौतुकच करतात किंवा अस्थानी टीका! 😛) पण, लेखकाचे ’प्रथम खर्डे’ वाचणे हा मुद्रितशोधकाचा व्यवसायच असल्याने, त्याने अशा प्रकारचे लेखन अनेकदा वाचलेले असते. त्यामुळे त्याची नजर त्रयस्थ असूनही अनुभवीदेखील असते. म्हणजेच दुधात साखर असावी, अशी 😊 पण दुर्दैवाने याचा उपयोग मुद्रितशोधक करताना दिसत नाहीत. ते एक तर फक्त शुद्धलेखन तपासणी करतात किंवा भूमिका सोडून ’संपादक’ खुर्चीत जाऊन बसतात.
 
मुद्रितशोधकाने उलट कसे असायला हवे- तर value addition करणाऱ्या व्यक्तीसारखे. मुद्रण दोष तर त्यांनी दूर करावेच, पण त्या आधी त्यांनी लेखकाच्या, लेखनाच्या अंतरंगात शिरायला हवे. लेखकाला काय म्हणायचे आहे, मांडायचे आहे, पोचवायचे आहे हे त्यांना समजायला हवे. लेखनाचा प्रकार काय आहे, लेखकाची शैली काय आहे, वाचक कोण असेल याचा अंदाज त्यांना यायला हवा आणि मग त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घ्यायला हवे. उदा. ’त्याला गदागदा हसताना पाहिले, की मला मजा वाटायची’ हे वाक्य दिसताक्षणी, ’हसणे काय गदागदा असते का? तो शब्द ’मोठमोठ्याने’ असायला हवा, कसं लिहितात हे’- असे खेदाने म्हणत त्या ’गदागदा’वर काट मारण्याआधी, क्षणभर, लेखकाने हा शब्द का योजला असेल बरं?- असा विचार केला तर? तर, त्याचे उत्तर पुढच्या लेखनातच सापडेल किंवा लेखकाच्या शैलीत सापडेल. कदाचित तो शब्द चुकलाही असेल, पण तो मुद्दामच तसा असण्याची शक्यताही आहे ना? 🙂
 
माझ्या मते, हे इतके छोटे प्रश्न मुद्रितशोधकाला पडायला हवेत! पण ’लेखकाला असेच म्हणायचे असेल’, ही शक्यताच अनेकदा मुद्रितशोधक जमेस धरत नाहीत. सरळसोटपणे, ’हे असे नसतेच. हसणे या क्रियेचे हे विशेषण नसतेच. आम्ही कधीही वाचलेले नाही’, असे नियम थोड्या वेगळ्या वाटेने जाणाऱ्या वाक्यांना ते लावतात. विशेषत: ललित लेख, कथा, कादंबऱ्या अशा भावनांना महत्त्व असलेल्या लेखनाला काटेकोर नियम लावता येत नाहीत, शैलीला कोणत्याही कुंपणात बसवता येत नाही. प्रत्येक लेखन एकाच प्रकारचे, एकसुरी, एका मापाचे असणे कसे शक्य आहे? तसे असूनही नये, नाही का? (आणि, इथे मी फक्त प्रमाण भाषेबद्दलच लिहित आहे. बोली भाषा आणि तिचे व्याकरण हा वेगळाच विषय आहे!)
 
मुद्रितशोधकाने अशा प्रकारे काट मारली की इथे लेखकाची अवस्था वाईट होते 🥴😅 ’आपले लेखन आवडेल ना?’ या विवंचनेत तो असतोच. त्यात, त्याने विचारपूर्वक किंवा शैली म्हणून काही मुद्दाम योजलेल्या शब्दांवर किंवा वाक्प्रचारांवरही जेव्हा काट मारली जाते, तेव्हा त्याला स्वत:च्या कुवतीबद्दलच प्रश्न पडायला लागतात! 😔
 
मुद्रितशोधक जेव्हा स्वत: सजग वाचक असतो, तेव्हा तो खरोखर लेखकाला सुंदर, उपयुक्त सूचना देऊ शकतो. कुठे मजकूर अर्धवट किंवा तुटक वाटत आहे, कुठे विसंगती आहे, कुठे आणखी खुलवता येईल, कुठे काटछाट करता येईल- याबद्दल वाचकाच्या नजरेतून मुद्रितशोधक value addition नक्की करू शकतात. पण इथे लेखकावर कुरघोडी करण्याचा आवीर्भाव त्यांचा असू नये. लेखकाने त्याच्या प्रतिभेने काहीतरी निर्माण केलेले असते, त्यामुळे त्याला योग्य तो आदर आणि सन्मान द्यायलाच हवा. लेखकाला त्याच्या कल्पनाशक्तीचे आणि लेखनाचे क्रेडिट देऊन, सौंदर्यवृद्धीच्या सुचवण्या मात्र जरूर कराव्यात. मी स्वत: जेव्हा मुद्रितशोधन केले आहे, तेव्हा असा प्रयत्न नक्की केला आहे. पण अशा वेळी ’लेखक प्रथम’ हे पक्के ध्यानात असायला हवे. ’मी सूचना केली, म्हणजे त्याने ती स्वीकारलीच पाहिजे’, असा दृष्टीकोन असेल, तर तुम्ही साधे मुद्रितशोधकच रहाल!
 
मुद्रितशोधकाचे काम अत्यंत किचकट असते. प्रत्येक चूक शोधा, ती दुरुस्त करा आणि वर लेखन आणखी चांगले व्हावे म्हणून (कोणतीही अपेक्षा न ठेवता) लेखकाला सूचनाही करा! मला कल्पना आहे, की जरा ज्यादाच्याच अपेक्षा आहेत या! 😅😀 पण १०० पैकी १०० मिळवायचे, तर एवढे कष्ट घ्यावे लागतातच! 😛
 
या कामात १०० पैकी ९९ किंवा १०० अशा दोनच श्रेणी आहेत! ९९ जवळपास सगळ्यांना मिळतातच! १०० मिळवणारे फार कमी! पण तीही जमात अस्तित्वात आहे बरं! माझ्या वाट्याला बहुतांश ९९ मार्क मिळवलेले मुद्रितशोधक आलेले आहेत. पण एक आहेत, ज्यांना निर्विवाद १०० पैकी १०० मिळाले. खरंतर, त्यांच्यामुळेच मला हा दृष्टीकोन मिळाला. त्यांच्याबद्दल असे जाता-जाता लिहिणे योग्य होणार नाही, पुढच्या लेखात लिहिते! ’मुद्रितशोधकाने value addition करायचा प्रयत्न करावा’, हे मी लिहिलेय ना, त्याचेच मूर्तीमंत उदाहरण आहे ते 😊
 
मुद्रितशोधकाचे काम केवळ चुका दुरुस्त करणे नसते. आणि, ते कामही इतके सोपे, सहज, बसल्याजागी करता येण्यासारखे नसते. कोणत्याही कामाला आवश्यक असते तशी बैठक, गांभीर्य आणि सजगपणा याही कामात आवश्यक असतो, असे आवर्जून नमूद करते. केवळ शाळेत भाषा विषयात चांगले मार्क असणे, किंवा भाषेत पदवी मिळवणे पुरेसे नाही, साहित्यिक दृष्टीकोन किंवा किमान थोडी समज तरी या कामासाठी आवश्यक आहे. आणि हो, तुम्ही चांगले वाचक असणे तर अतीआवश्यक आहे 😀
 
लेखकाचे भले चिंतणारे मुद्रितशोधक कमी असतात. तुम्ही तसे झालात, तर लेखक-मुद्रितशोधक अशी झकास जय-वीरू जोडी जमू शकते, आणि त्यात कोणालाही, कसलाही ’त्याग’ करावा लागत नाही! 😜 It will always be a ’ये दोस्ती हम नही तोडेंगे…’ जोडी. जय अनेक आहेत, वीरू मात्र संख्येने कमी आहेत. तुम्ही जरूर प्रयत्न करू शकता. या क्षेत्राला गुणी मुद्रितशोधकांची खरंच गरज आहे!
 
***

0 comments: