सहचर शोधताना आपण कौटुंबिक, शैक्षणिक, शारीरिक आणि अगदी ग्रहांचीदेखील compatibility बघतो. पण बौद्धिक आणि भावनिक compatibility बघतो का? कदाचित जी प्रेमलग्न होतात, त्यात ती जोडपी बौद्धिक समपातळीवर आकर्षित झालेली असू शकतात, पण ते प्रमाण किती कमी असेल! आणि, इतर सर्व गुणमीलनाच्या बरोबरीने, किंबहुना थोडी जास्तच ही बौद्धिक आणि भावनिक पातळी जुळणं किती किती महत्त्वाचं असतं, नाही?
डॉ. मंगला नारळीकर, सुनीताबाई, सुधा मूर्ती या स्त्रिया स्वत: कमालीच्या कर्तृत्ववान. योगायोगाने त्यांना ध्येयवेडे, बुद्धीमान, प्रचंड काम करणारे, झटणारे सहचर मिळाले. अगदी भगवान बनाए जोडीची ही उदाहरणे. आपले पती किती महत्त्वाचे, मोलाचे काम करत आहेत हे समजण्याची त्यांची बौद्धिक कुवत होती. ते काम किती कष्टसाध्य आहे, त्यात कोणते खाचखळगे आहेत, त्रास आहेत हे त्यांना कळत होते. त्या स्वत:देखील त्यांच्या पतीच्याच क्षेत्रात होत्या, हा योगायोग. पण मुळात त्यांची बौद्धिक पातळी तेवढी होतीच. त्यामुळे त्यांच्या पतींचे जीवन थोडेसे अधिक सुखकर झाले असेल, नाही? आणि त्यांचे स्वत:चेही! कारण जेव्हा त्या त्यांचे मन मोकळे करत असतील, तेव्हा ते बुद्धीमत्तेच्या पातळीवर समजून घेणारा सहचर त्यांनाही मिळाला होताच की!
जोडीदाराच्या कार्यक्षेत्राचा आवाका काय आहे, त्यात किती आव्हाने आहेत, जोडीदाराचे उद्दिष्ट काय आहे, त्यात तो कुठे कमी पडतोय, धडपडतोय, त्याच्या मनात काय चालले आहे- जे जाणून घेणे, त्यात इंटरेस्ट दाखवणे, त्यात लगेच मार्ग वगैरे जरी दाखवता आला नाही, तरी किमान त्याचे ऐकून घेणे आणि त्याचे सल समजून घेणे- हेच तर असते साहचर्य! आणि ते लिंगसापेक्ष असते. बहुतांश पत्नी हे करत असल्या, तरी समजूतदार पतींचे प्रमाणही काही कमी नाही. साधी, सामान्य नोकरदार स्त्री असूदे किंवा गृहिणीदेखील- तिला काम करताना काय काय त्रास होत असेल, याची थोडी जाणीव ठेवून तिची विचारपूस करणारा नवरा तिला मिळाला, तर ती किती आश्वस्त होते! करियरवर लक्ष केंद्रित करणाऱ्यांणा असे समपातळीवरचे सहचर मिळाले, तर खरोखर ते किती मोठी झेप घेऊ शकतात.
माणूस जगात कितीही कर्तबगार, हुशार, लोकप्रिय असला, तरी रात्री पाठ टेकायला तो घरीच येतो. त्याचे कर्तृत्व, हुशारी आणि लोकप्रियता बाहेरच राहते, घरात येतो तो थकलेला माणूस. अशा वेळी त्याचा सहचर त्याला समजून घेण्याची क्षमता असलेला असेल तर… तर तो दोन पळ तरी निश्चिंत होत असेल, नाही? संसार होत राहतो, घर, गाडी, मुलं, शिक्षण, आजारपणं, नातेवाइक, अपेक्षा सारसारं होत राहतं, पण जर बौद्धिक आणि भावनिक साहचर्य असेल तर परस्परजीवन उजळून जातं! प्रेमाला झळाळी येते. असं साहचर्य असेल, तर you have your best confidant at home! बाहेर कुठे जायची गरजच नाही. म्हणजे भांडण, वाद, मतभेद होत नसतीलच असे नाहीच. पण असे साहचर्य असेल, तर नाते त्याहीपलीकडे जाते. घरी येण्याची ओढ लागते. संवाद साधला नाही, तर अपुरे वाटते. यशाचा कहाण्या ऐकायला अनेक असतात, ज्याच्यापाशी अपयश आणि भीती बोलू शकू असे मोजके असतात, आणि त्यात तो आपला सहचर असेल, तर खरोखर, one must thank their stars, because this is really rare.
जुन्या पिढीत ऐकून घेण्याची क्षमता असावी बहुतेक. म्हणूनच अतिशय कर्तबगार लोकही प्रेमळ, संसारी, घरात रमणारे होते. अपवाद अर्थात असतीलच. कर्तृत्ववान लोकांच्या जीवन संघर्षातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात, त्यात हा कौटुंबिक पैलू थोडा दुर्लक्षित असतो. पण कॅमेऱ्यामागे लोक असतात म्हणूनच कॅमेऱ्यापुढच्या लोकांना स्टारडम मिळते. आज हे प्रकर्षाने जाणवले, इतकंच.
#PCWrites #random
0 comments:
Post a Comment