July 24, 2023

ह्यात ते आणि त्यात हे!

(विसू- विषय: पाककौशल्य 😁 शीर्षकाने दिशाभूल झाली असेल, तर पुढे भ्रमनिरास होऊ नये म्हणून विषय आधीच सांगितलेला आहे. पुढे वाचायचं का नाही, ते तुम्ही ठरवा आता! 😛 )

रविवारी सकाळी नाश्ता काय करायचा हा एक गहन प्रश्न असतो. काल अचानक ह्यांनी “काकडीचे घावन”ची फर्माईश केली. खूऽऽऽऽऽप वर्षांत केली नव्हती, म्हणून मीही होकार दिला. पण खूऽऽऽऽऽप वर्षांत केली नसल्यामुळे, पीठ किती घ्यावे याचा अंदाज आला नाही. ’कमी नको पडायला’ या नेहेमीच्या सवयीमुळे खूऽऽऽऽऽप पीठ झाले! 🤪 पोटभर घावनं खाऊनही अर्ध पातेलं पीठ उरलं 😟 मग काल त्याचं काहीच केलं नाही.
 
रविवारलाच कशाला दोष द्या, रोजच नाश्त्याला काय करायचं हा प्रॉब्लेम असतोच. पण आज नव्हता! 😉 आज अर्ध पातेलं भरून पीठ होतं ना! 😝 काढलं आणि त्यात आणखी रवा, थोडे ओट्स आणि आणखी गूळ घालून त्याचे आप्पे केले! वाढवत नेल्यामुळे तेही पीठ खूप झालं! 😒 आता त्याचं काय करू? 🤔
काल कोफ्ता करीचा उरलेला दुधीभोपळा होता. म्हणलं, तिखट हांडवो असतो त्यात दुधी असतो. आपण गोड हांडवो करू की. फार तर त्याला ’खांडवो’ म्हणू! हाकानाका! 😝 किसला दुध्या, घातला पिठात. (परत थोडं पीठ वाढवायला लागलं, तो भाग वेगळा.) घातलं स्टीम कूकरमध्ये आणि वाफवलं! कशाला वाईट लागतंय? 😄
 
हे असलं काही केलं की मला कमाल आनंद होतो! म्हणजे स्वत:च्या चातुर्याचं आणि कौशल्याचं कौतुक वाटतं फार! जाम गंमत वाटते, खुदुखुदु हसायलाही येतं 😇
घरच्यांना हे प्रयोग आवडत नाहीत. त्यांना चवच नाही मेली, आणि माझं कौतुकही नाही! 😞 आता, सारखी सारखी घेवड्यात मटकी काय घालायची, म्हणून मक्याचे दाणे घातले, तर बिघडलं कुठे? किंवा दोडका कमी पडल्यावर घातला त्यात बटाटा आणि "दोडका- बटाटा" ऐवजी ती "बटाट्यात-दोडका" भाजी झाली, तरी मी म्हणते, बिघडलं काय? मसाले आणि माझ्या हातची चव! छानच लागतं सगळं, असं मी ठासून सांगते त्यांना. ते उगच नाकं मुरडतात 🙃
दोडक्यावरून आठवलं, पुढल्या वेळी दोडका-दुधी भाजी करावी. दोन्हीच्या एकसारख्या फोडी केल्या की झालं. आतून दोघे एकसारखेच तर असतात! हां. बरं सुचलं 😂
 
असं ह्या पदार्थात ते आणि त्या भाजीत हे घालायला ऐन वेळी सुचलं की मला एकदम accomplished की कायसं वाटतं. बाईपण भारी देवा, असेल नसेल, पण, मी पण भारी देवा आणि माझी पाक-creativity तर त्याहून भारी देवा! 😅😁

2 comments:

Anonymous said...

झकास.. अजून येऊ द्या अश्या भन्नाट पाकृ

poonam said...

haha, sure :D