July 14, 2023

"लोकशाहीचे वास्तव" - मी अनुवाद केलेले नवीन पुस्तक

स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत हा एक लोकशाही असलेला देश आहे, असे आपण शिकलो आहोत. लोकांनी, लोकांसाठी... वगैरे वगैरे असलेली लोकशाहीची संज्ञा तर आपल्याला चौथीपासूनच पाठ असते. पण भारतात खरंच लोकशाही आहे का? 
 
लोकशाही व्यवस्थित चालावी यासाठी काही सरकारी यंत्रणा अस्तित्वात आल्या, त्यांना पुरेसे अधिकार आणि कर्तव्य देण्यात आली आणि ती पार पाडण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. या यंत्रणांनी लोकाभिमुख काम करणे अपेक्षित होते. पण वास्तव हे आहे, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही प्रारंभीची वर्ष सोडली तर या यंत्रणा सरकारच्या हातातल्या बाहुल्या झाल्या. या यंत्रणा कोणत्या? तर मुख्यत्वे पोलिस दल, सर्व गुप्तचर संस्था आणि सर्व वित्तीय संस्था (उदा. आयकर, ED वगैरे). 'जो सत्तेत आहे, त्याला खूश केलं की आपण मजेत असतो, जनता वगैरे दुय्यम आहे', हे सत्य त्यांना चटकन उमजलं आणि सुरू झाला लोकशाहीचा ऱ्हास. तो आजतागायत सुरूच आहे.
 
सत्ताधीशांनी या यंत्रणांचा अनिर्बंध वापर स्वत:च्या लघुदृष्टी हेतूंसाठी केला. देशहित वगैरे व्यापक विचार कोणीही केला नाही. या पापात प्रत्येक सो कॉल्ड लोकनियुक्त सरकार सहभागी आहे. त्यापैकी, मुंबई लोकल ट्रेन स्फोट, २६/११ चा मुंबई हल्ला, श्रीलंकेत शांतीसेना पाठवण्याचा निर्णय आणि काश्मीरमध्ये पोसला गेलेला दहशतवाद आणि अशा अनेक देश घटना घेऊन लोकशाही यंत्रणा कशा वापरल्या गेल्या यांचे विश्लेषण या पुस्तकात केलेले आहे.


 
 
मूळ पुस्तकाचं नाव आहे , "The Silent Coup". Coup चा अर्थ आहे बंड. सगळ्याच लोकशाही यंत्रणा अतिशय धूर्तपणे गप्प बसून लोकशाहीचा गळा आवळत आहेत असं पुस्कातून सूचित करायचं आहे, म्हणून हे नाव. जोजी जोसेफ हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. पुस्तकात लिहिलेल्या अनेक घटनांचे ते स्वतः साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांचे त्या घटनांचे विश्लेषण अधिकच महत्त्वाचे ठरते.
 
हा अनुवाद करणं हा माझ्यासाठी अत्यंत वेगळा अनुभव होता. हा विषय गंभीर आहे, यातले सत्य डोळे उघडणारं आहे आणि अतिशय ज्येष्ठ पत्रकाराचे हे कथन आहे, त्यामुळे जबाबदारी दुप्पट होती. पण आव्हान म्हणून हा अनुवाद स्वीकारला आणि तो चांगला उतरला आहे, अशी प्रतिक्रिया संपादक आणि प्रकाशकांकडून आलेली आहे 😊 एक समाधानाची भावना आहे, आणि एक महत्त्वाचे पुस्तक आपल्या हातून अनुवादित झाले, म्हणून आनंदही आहे. 
 
हे पुस्तक आता amazon वर उपलब्ध झाले आहे. हे पुस्तक खरेतर जानेवारीत प्रकाशित झाले होते, पण तेव्हा मर्यादित प्रती प्रकाशित झाल्या होत्या. आता भरपूर प्रती उपलब्ध झालेल्या आहेत 😁
इंग्रजी पुस्तकाचे नाव आहे, "The Silent Coup". तुम्ही या नावाने Amazon वर शोधले, तर तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्ही पुस्तके दिसतील.
हे पुस्तक वाचा, तुमचे वाचून झाले की वाचनप्रेमी मित्र, नातेवाईक यांना वाचायला द्या. ग्रंथालयात त्याची मागणी करा, नसेल तर त्यांना आणायला सांगा 😊
तुम्हाला आवडत असेल तर इंग्रजी वाचा, पण अनुवाद वाचलात, तर मला प्रतिक्रिया जरूर कळवा
 
आपण आपल्या लोकशाहीकडे, आपल्या यंत्रणांकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे, प्रश्न विचारणं आवश्यक आहे. ही यंत्रणा मजबूत करणं हेही आपल्याच हाती आहे. कोण्या एकट्याची नव्हे, तर ही जबाबदारी आपण सर्वांची आहे. तरच, 'लोकांसाठी, लोकांनी चालवलेले सरकार' या संज्ञेला काही अर्थ उरेल.

0 comments: