May 4, 2023

भावना संपत चालल्या आहेत का?

काल एक माफीनामा वाचला- फुटबॉलचा सामना हरल्यामुळे त्या संघाच्या कप्तानाने संघाची माफी मागितली होती. संयत शब्दांत व्यवस्थित माफी मागून, या पुढे चांगले खेळूया असे त्यात लिहिले होते. या माफीनाम्यात काहीच चूक नव्हती. पण, हा माफीनामाच मुळात चुकलेला होता. कारण, तो चक्क chatgpt ने लिहिलेला होता! चुकीचे वर्तन किंवा पश्चात्तापाची भावनाही माणसाला आता स्वत:च्या शब्दांत मांडता येत नाहीये, त्यासाठीही त्याला कृत्रिम बुद्धीमत्तेचा आधार घ्यावा लागतोय!? आणि कृत्रिम बुद्धीमत्त्या यथोचित शब्दांत तो निर्माणही करत आहे. पार गंभीर परिस्थितीने वेढलो गेलो आहोत आपण.  

आपल्या भावना संपत चालल्या आहेत का?

सॉरी म्हणताना / माफी मागताना कृत्याची शरम वाटते (वाटायला हवी), त्यामुळे आपला आवाज थरथरतो, डोळे भरून येतात, कान लाल होतात, तोंडातून शब्द कसाबसा फुटतो. या सगळ्या कल्लोळावर मात करून माफी मागितली जाते, म्हणूनच ती खरी असते, मनापासून मागितलेली असते. वरच्या उदाहरणात, त्या कप्तानाला हे सगळं वाटलं असेल, असं गृहित धरलं, तर तो फक्त ’sorry team’ म्हणाला असता तरी पुरलं असतं ना? त्यासाठी त्याला संगणकाचा आधार का घ्यावासा वाटला असेल? तर, यावर काही म्हणतात, की ’योग्य शब्द सापडत नाहीत’. पण, Thank you, sorry, love you हे शब्द, वास्तविक नुसते शब्द नसतात. मनाच्या तळापासून ज्या सच्च्या भावना निर्माण होतात, त्यांचं ते फक्त शब्दरूप असतं. माफी, प्रेम, जिव्हाळा या भावना प्रकट करताना कोणते शब्द ’योग्य’ असतात? त्यांचा काही स्वतंत्रस शब्दकोश आहे का? नाही ना? भावना सच्ची असेल, तर इथे शब्द दुय्यम असतात! म्हणूनच त्यांचं प्रकटीकरण करताना किमान शब्द तरी तुमचे स्वत:चे हवेत, जे असतील तसे, ते काव्यात्मक किंवा ’योग्य’ असायची गरज नाही, ते सच्चे हवेत, बस.  

पण या सखोल भावनांची तीव्रताच कमी व्हायला लागलेली आहे. कशाचंच फारसं काही वाटेनासं झालं आहे. म्हणूनच, माफी मागण्याचं कामही आऊटसोर्स करावंसं वाटतं, प्रेम शब्दांनी नाही तर इमोटिकॉन्सनेच दर्शवलं तरी पुरतं आणि कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे नेमकं काय करणं हेच समजत नाही.

भावनिक बुद्ध्यांकामुळे इतर प्राणीमात्रांपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळ्या असलेल्या माणूस नावाच्या प्राण्याची अधोगती आता निश्चित सुरू झाली आहे. इतर प्राण्यांपासून माणसाला वेगळं करणारा भावनांक अजूनतरी कृत्रिम बुद्धीमत्तेत ’फीड’ केलेला नाही. लवकरच तेही होईल… अगदी पुढच्या दोन-तीन वर्षांत. मग माणसाला माणसाचीच गरज उरणार नाही, कारण माणूस त्याच्या भावना संगणकापाशीच उघड करेल, संगणकही त्याला आवडेल असाच प्रतिसाद देईल आणि फक्त माणसा-माणसांतच असलेले ’भावनिक लोचे’ संपतील. हे चित्र आपल्याला आवडतं की हादरवून टाकतं, यावर आपलं अस्तित्व अवलंबून आहे.

सध्या, इतकंच!

0 comments: