December 12, 2022

शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि काही मोबाईल निरिक्षणे!

वाह! मथळा कसा झकास जमून आलाय. हा लेख एका विचारवंताने लिहिलाय असं समजून तुम्ही तो गांभीर्याने तरी वाचाल, नाहीतर कोणीतरी मस्त टीपी केलाय म्हणून खिल्ली उडवत वाचाल. म्या पामराने तो दोन्ही पद्धतीने लिहायचा प्रयत्न केलाय. मी खिल्ली उडवणारी विचारवंत आहे, असं म्हणा ना! 😉
 
तर, मुख्य विषय असा, की आता पुण्यात शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचा मौसम सुरू झाला आहे. तसं, पुणं हे सांस्कृतिक केंद्र वगैरे असल्याने वर्षभर कोणत्या ना कोणत्या मैफिली सुरू असतातच, पण साधारण दिवाळीनंतर ते फेब्रुवारीपर्यंत मैफिली बंद सभागृहातून भव्य मैदानावर येतात. मी गेली अनेक वर्ष या मैफिलींना उपस्थित राहते. आणि तिथे बसून फक्त ऐकायचं किंवा पहायचं काम असल्याने, दुसरं काम म्हणून निरिक्षण करते! 😆😁 आधी देखणे तरुण तरुणी, त्यांचे नवीन फॅशनचे कपडे, त्यांचं आपसांतलं गुलुगुलू बोलणं, रुबाबदार आजी आजोबा, आज्यांच्या भारी साड्या आणि शाली, आजोबांचे मफलर आणि स्वेटर आणि गरम कपड्यांत गुंडाळलेली गोंडस लहान मुलं दिसत. गेल्या काही वर्षांपासून हे सगळे दिसतातच, पण मैफिलीला बसताक्षणी या सगळ्यांच्या हातात मोबाईल फोनही असतो असं माझं निरिक्षण आहे 😢 त्याच निरिक्षणांचा हा गोषवारा. वयानुसार श्रेणीकरण केले आहे.
 
१) कॉलेजवयीन तरुण तरुणी-
मला वाटतं, आंघोळ करताना मोबाईल ओला होऊन बंद पडेल- केवळ हीच भीती असल्याने ती पाच-सात मिनिटं सोडली, तर सर्व काळ या मुलांच्या हातात मोबाईल असतो. अर्थातच मैफिलीत ते स्थानापन्न झाले, की पहिल्यांदा फोनच हातात येतो. एकेक ग्रुप सेल्फी होतो. मग आवडीनुसार एकटे-दुकटे फोटो काढतात. दरम्यान यातलेच काही लोकेशन पिन देऊन, एकमेकांना टॅग करून पब्लिकमध्ये कॉलर ताठ करून घेतात, इन्स्टावर स्टोर्या, रिळं पडतात आणि मग कुठे यांना मैफिलीचं भान येतं. ’कोणाचं गाणं आहे?’ कानोसा घेतला जातो. मग कलाकाराची माहिती शोधण्यासाठी परत एकदा फोन. मग तो कोणता राग गात आहे त्याचा तपास. त्या रागातली पॉप्यूलर गाणी शोधून स्वत:ला अपडेट केलं जातं. मध्ये अर्थातच स्टोरी व्ह्यूज, इतर स्टोर्या बघणं अनिवार्य असतंच. मग कोणीतरी चॅटवर सांगतं की आणखी एक ग्रूप/ काही जण पण आले आहेत आणि त्यांच्या इथे बसायला जागा आहे. किंवा मग कोणातरी एका सुंदरीला भूक लागते. मग तिच्याकडे लक्ष देणारे काही तत्पर तरूण आणि नाईलाजाने तिच्याबरोबर असलेली एक मैत्रीण असे सगळे मंडप सोडतात. परत येत नाहीत. बाहेरच्याच स्टॉल्सवर उभं राहून ते ’क्लासिकल म्युझिक’ ऐकतात, धन्य होतात, इन्स्टा व्ह्यूजचे वाढते आकडे पाहून आणखी धन्य होतात आणि मग ’गेलो होतो’ इतकं घरच्यांना सांगण्यापुरतं पुण्य जमा झालं की सगळेच्या सगळे कल्टी मारतात. उद्या पुन्हा हेच होतं, आणि परवाही. वीकेंड सक्सेसफुल. यात मूळ संगीत ऐकणं जरा लांबच राहतं, but that’s ok.
 
२) सिनियर सिटिझन्स- वय ६० ते ७०.
अ] आजोबा – या श्रेणीतले आजोबा फक्त वयाने साठीच्या पुढचे असतात. बाकी, ते शरीराने अतिशय चपळ आणि टुणटुणीत असतात. त्यांना गाण्यापेक्षा जास्त इंटरेस्ट असतो तो खाण्यात. वेगवेगळ्या स्टॉल्सवरचे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्यासाठीच ते गाण्याला आलेले असतात. हे लोक सहसा कंपू करून येतात. कमीतकमी ४-५ मित्र आणि त्यांच्या बायका. एखादी मोक्याची जागा अडवून बसतात. आणि इकडे मंचावर बुवांनी षड्ज लावला, की तिकडे यांचे पाय स्टॉलकडे वळतात. आधी एक-दोघे जातात. मग फोन करून बाकीच्यांना बोलावतात. सगळ्यांचे आवाज खणखणीत. कोणत्या स्टॉलवर काय आहे याची बातमी शेजारी बसलेल्यांनाही लागते. मग लोकांनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकले, की ते थोडेसे वरमतात आणि सगळे पुरुष बाहेर जातात. मग मध्येच कोणालातरी आपल्या पत्नीची आठवण येते. मग तिला फोन. पत्नीच्या विशाल बॅगेतून तिने फोन काढेपर्यंत तिकडे बुवांची एक आलापी होते. ती ’नको, अरे/अहो नको मला काही’ अशी फोनवर स्व:ची एक तान घेते, तरी दहा मिनिटांनी तिच्यासाठी एखादी खास डीश पॅक होऊन मंडपात आणली जाते.
 
आ] आजी – या ४-५ जणी एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी असतात आणि शक्यतो शांतपणे बसून यांना मैफिल ऐकायची असते. त्यांची एकमेकींमध्ये खुसफुस सुरू असते, पण त्यातल्या एकीचा फोन मात्र सतत बिझी असतो. ती व्यावसायिक असते किंवा सोशल फिगर. त्यामुळे तिलाही सोशल मीडिया अपडेट्स, नवीन प्रमोशन्स, मैफिलीचे निमित्त साधून करायची असलेली सोशल कनेक्शन्स याकरता सतत फोन लागतो. शिवाय नवरोजी आग्रह करकरून खायला बोलावत असतात किंवा आणत असतात ते वेगळंच.
 
हा आख्खा ग्रूप ’अरे तो तेव्हाचा जसराजचा राग दुर्गा...’, ’काय तो तेव्हा किशोरीबाईंचा आवाज लागला होता’, ’आणि ती राजन-साजनची त्या सभागृहातली मैफिल...’, ’अरे माझ्या मुलाकडे यु एस ला गेले होते शिव-हरी... काय तो माहोल’ अशा टाईपचे उसासे सोडण्यातही माहीर असतात. समोर कोण गात आहे याच्याची अगदी कमी घेणे-देणे, असलेच तर उणीवा काढणे ही वैशिष्ट्य आढळतात. यूट्युबवर भलत्याच मैफिलीचे व्हिडिओ बघणे, परदेशातल्या मुलांशी संवाद साधणे असे कार्यक्रम चालू मैफिलीतच सुरू असतात.
 
३) सिनियर सिटिझन्स- वय ७०च्या पुढे
ही सगळ्यात गोड श्रेणी 😍 अंगात स्वेटर, शाली घालून डोळ्याला चष्मा लावून, एकमेकांचा हात धरून हळूहळू हे आजीआजोबा अगदी वेळेवर स्थानापन्न होतात. हातपाय चालत आहेत तोवर शक्य तितकं शास्त्रीय संगीत त्यांना प्रत्यक्ष ऐकायचं आणि अनुभवायचं असतं. मैफिलीबद्दल ते अतिशय सीरियस असतात. खाण्यापिण्याचेही त्यांना फारसं आकर्षण नसतं. सहसा आजींच्या मोठ्या पिशवीमध्ये खजूर, केळे, संत्रे, केक, उपमा असे त्यांना चावता येतील असे पदार्थ असतात. या लोकांना फारसे फोनही येत नाहीत. पण जेव्हा आपल्याला कोणीही फोन करणार नाही अशी अपेक्षा असते, तेव्हाच नेमके खूप फोन येतात असं यांच्याबाबतीत हमखास घडतं. इस्त्रीवाला. सोसायटी घुले. पद्मिनी. शंकर प्लंबर. महेश साने. असे अनेक random फोन त्यांना अचानक एकापाठोपाठ एक येतात. ’पटकन फोन घेऊन बाहेर जाऊन बोलून येतो’ अशी त्यांची शारीरिक अवस्थाही नसते. त्यामुळे, बसल्याजागीच जोरजोरात ’हां, मी जरा बाहेर आहे. नंतर फोन करतो’ असं किमान चार-पाच वेळा तरी एका मैफिलीत होतं. बाकी त्यांचा तसा काही त्रास नसतो.
 
४) तरूण पालक, मुलांसह. मुलांचं वय- शून्य ते ११-१२ वर्ष
ही एक अत्यंत तापदायक श्रेणी आहे. हो. अगदी स्पष्टच सांगते. कारण हे लोक केवळ आपल्या हौसेखातर, आणि लोकांना दाखवण्यासाठी त्यांच्या अजाण मुलांना मैफिलीत अक्षरश: ओढून आणतात. त्यांचा जामानिमा बघण्यासारखा असतो. प्रचंड मोठ्या सामानाने भरलेल्या पिशव्या नवरा-बायको दोघांकडेही असतात. शून्य ते ३ वर्ष वयाचं मूल असेल, तर पहिल्यांदा एक मऊ ब्लँकेट अंथरलं जातं. छोटंसं बाळ असेल तर त्यासाठी आणखीन दुपटी घालून एक बिछाना तयार केला जातो. २-३ वर्षाचं जागं मूल असेल, तर ताबडतोब बाहेर निघतात त्याची अॅक्टिविटी बुक्स, ड्रॉइंग बुक्स, आणि अर्थातच मोबाईल फोन. दर १५ मिनिटांनी ते मूल काहीतरी वेगळी मागणी करतं- मला वेगळा गेम दे, मला खायला दे, मला झोप आली आहे, मला खेळायचं आहे, कंटाळा आला, घरी जाऊ.
 
साधारण ४-५ ते ११-१२ वर्षाची म्हणजे, समज असलेली मुलं असतील तर त्यांनाही शास्त्रीय संगीत ऐकण्यामध्ये, पाहण्यामध्ये काहीही रस नसतो. वेळ असते संध्याकाळची, म्हणजे त्यांच्या खेळाची. या अमाप गर्दीमध्ये त्यांना क्लोज सर्किट टीव्हीवर जे गाणं दिसतं आणि ऐकू येतं ते त्यांना मुळीच धरून ठेवत नाही. त्यांना ताबडतोब कंटाळा आलेला असतो. त्यामुळे साहजिकच त्यांच्या हातातही मोबाइल असतो.
 
हे तरूण पालक मुलांना धरून का आणतात माहितेय? कारण मुलांच्या कानावर शास्त्रीय संगीत पडायला पाहिजे! अहो, पण संपूर्ण वर्षात फक्त एक दिवस ते कानावर पडून मुलांना त्याची गोडी लागणार आहे का? 🙄 त्याच्यासाठी तुम्ही वर्षभर काय प्रयत्न केले? मुलांची इच्छा आहे का? अजाण बालकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मैफिलींना आणून तुम्ही काय साध्य करता? यात मुलांना दोष नाहीचे. त्यांच्या वयाचा दोष आहे. हजारात एखाद-दुसरं मूल असेल ज्याला एका जागी बसून शांतपणे शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं. नाहीतर इथे येऊनही त्यांच्या हातात मोबाईल असतातच. आणि तुमचंही लक्ष मैफिलीत कुठे असतं? मूल नक्की काय करते आहे याच्याकडे तुमचं सगळं लक्ष. यात तुम्ही इतर लोकांना किती डिस्टर्ब करता याची तुम्हाला कल्पनाच नसते. मग कशासाठी हा अट्टहास?
 
अर्थातच सगळेच जण असे असतात, असंही नाही 😀 १०००० लोक उपस्थित असतील तर किमान निम्मे तरी कलाकाराला प्रत्यक्ष ऐकायला आलेले असतातच. त्यांचे मोबाईल बंद असतात, किंवा अगदी आवश्यक तेव्हाच बाहेर निघतात. मुळात शाळेच्या गॅदरिंगपासून अशा मैफिलींमध्ये सहभागी होणाऱ्या थोर कलावंतापर्यंत- कोणीही आपल्यासमोर काहीतरी सादर करत आहे म्हणल्यावर आपण ते गांभीर्याने ऐकलं आणि पाहिलं पाहिजेच. तेव्हाही तुम्हाला मोबाईल फोन लांब ठेवता येत नसेल तर निश्चित तुमचेच चुकत आहे. ’बुवा तुम्ही गा. मी इकडे मोबाईलवर फुटबॉल बघतो’ असा attitude असेल, तर तो दु:खद आहे. You don’t know what you are missing!
 
आता लोकांवर पुरेशी टीका केल्यावर, मी मैफिलींना का जाते ते सांगते. मला शास्त्रीय संगीत ऐकायला अतिशय आवडतं. मला हळूहळू उलगडणारे राग, गायक-गायिकांची ते पेश करायची पद्धत, वाद्यसंगीताची नादनिर्मिती खूप भावते. बसल्या जागी तुम्हाला समाधीस्थितीत नेण्याचं सामर्थ्य आहे शास्त्रीय संगीतात. आणि मोठी मैफिल असते, आसपास आपल्यासारखे समानधर्मी जेव्हा असतात, जेव्हा आपल्यासकट अनेकांच्या तोंडातून ’वाह’ निघतो, रोमांच उठतो, उत्स्फूर्त दाद दिली जाते, तेव्हाची camaraderie काही आगळीच असते ❤️ मला झालाय इतकाच आनंद सगळ्यांना झालाय ही भावना किती सुंदर आहे! 😇 शास्त्रीय संगीत एकट्यानेही ऐकता येतं आणि समूहानेही. म्हणूनच तर इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं आयोजन होतं. मग अशाहीवेळी आपण मोबाईलशरणच होणार असू, तर त्यापेक्षा करंटेपणा दुसरा कोणता असेल?
 
मित्रहो, अनेक महोत्सव, अनेक मैफिली आता होतील. मोबाईलच्या व्यसनातून मुक्ती मिळवण्याची हीच ती वेळ आहे. कृपया विचार करा आणि कृतीही.
(अरे, शेवट वैचारिकच झाला की! खिल्ली उडवू नका हं प्लीज! 😛)
***

2 comments:

इंद्रधनु said...

वाह, काय चपखल निरीक्षण आहे :)
>>कारण मुलांच्या कानावर शास्त्रीय संगीत पडायला पाहिजे! अहो, पण संपूर्ण वर्षात फक्त एक दिवस ते कानावर पडून मुलांना त्याची गोडी लागणार आहे का?
अगदी अगदी!

poonam said...

हेहे, धन्यवाद इंद्रधनू :)