December 4, 2022

शेर की तरह दहाड!

 

सध्या मी वयाच्या त्या टप्प्यावर आहे जिथे असंख्य शारीरिक आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासांनी मी ग्रस्त आहे. रोजची सकाळ एक नवीन दुखणं घेऊन येते. रोजचा व्यायाम, काम, आहार पाळला तरी काही ना काही तक्रार असतेच. गांजून जायला होतं. पीडा असताना रोजच हसरं कसं राहायचं? रोजच सकारात्मक कसं राहायचं? शक्य तितकं नॉर्मल कसं वागायचं? थकायला होतं! 
 
पण! पण, यातूनच तर नवीन आव्हान मिळतं ☺️ काहीतरी accomplish करायची आस लागते. शारीरिक, मानसिक कस लागतो आणि काहीतरी हाती आलं की अपार समाधानही मिळतं. आज तसा दिवस आहे ☺️☺️
 
डिसेंबर महिन्याचा पहिला रविवार म्हणजे Pune Marathon चा रविवार. माझ्या मुलाला व्यायामाची अतिशय आवड आहे. मीही त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन थोडा फार व्यायाम करते. योगासने, चालणे, प्राणायाम हे मला माझ्या टप्प्यातले वाटतात. पण माझ्या मुलाने मला त्या साच्यातून बाहेर काढलं. त्याने मला पळायची प्रेरणा दिली. त्याच्या साथीने मी २०१९ मध्ये ३.५ , तर २०२० मध्ये ५ किलोमीटर पळले. पण २०२१ च्या मध्यापासून आत्ता या वर्षीच्या दिवाळीपर्यंत व्यायामात मुळीच सातत्य नव्हतं. मग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ठरवलं की ५ किमी पळायचंच. थोडं चालू, थोडं पळू. पण तो मुहूर्त चुकवायचा नाही. आणि आज जवळपास शून्य सराव असूनही ते साध्य झालं. मी आज ५ किमी run पूर्ण केला, ४० मिनिटात 😇😇 (माझ्याबरोबर माझं inspiration होतंच, माझा मुलगा १० किमी पळला.)
 
आता कोणी हसेल, म्हणेल, ५ किमी म्हणजे काहीच नाही. लोक हिमालय चढतात, ४२ किमी full marathon पळतात. त्यासमोर हे काय? उगाच कशाचंही काय कौतुक!! मला कल्पना आहे, ५ किमी म्हणजे काहीच नाही. पण प्रत्येकाची लढाई वेगळी ☺️ माझ्यासाठी ही सुरुवात आहे, शेवट नाही. पण सुरूवात होणं महत्त्वाचं, आनंद आहे तो त्याचाच.
 
चल उठ जा, चाल उठ जा
कर गम के सागर पार
तू मार दे ठोकर फिक्रोंको
और शेर की तरह दहाड!
Yo! 😊

0 comments: