January 16, 2023

 वाळवी


वाळवीच्या ट्रेलरमधून हे स्पष्ट होतं, की यात एका खुनाचा प्लॅन आहे. अर्थातच, चित्रपटाची संपूर्ण कथाही या खुनाच्या प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि त्या दरम्यान होण्याऱ्या गोंधळाबद्दल आहे.

पण, कोणाचाही खून करणं ही फार गंभीर घटना असते. एखाद्याचा जीव जाणं यात पॅथॉस आहे. आणि याच दुःखद घटनेवर आधारित संपूर्ण चित्रपट उभा राहतो. हे वरचं बांधकाम मनोरंजनात्मक आहे, टाइमपास आहे, त्यात काहीच्या काही दाखवलेलं आहे- एक प्रेक्षक म्हणून ते बघताना आपण भरपूर हसतो. ’अरे काय चाल्लंय हे’ असंदेखील म्हणतो. त्या अर्थानी हा एक डार्क ह्युमर आहे. पण हा डार्क ह्युमअप्रिशिएट करताना त्याचा आधार कोणाचा तरी जीव जाण्यावर बेतलेला आहे, हे लक्षात घेऊनच या चित्रपटाचा आस्वाद घेता यायला हवा. तर वाळवीतलं गांभीर्य आणि विरोधाभास आपल्यापर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोचेल. त्यामुळे हा चित्रपट लहान मुलांसाठी किंवा मॅच्युरिटी कमी असलेल्या मोठ्या लोकांसाठी देखील नाही असं मला वाटतं. हसताहसता कारुण्यरस निर्माण करणाऱ्या या काही कलाकृती असतात. हा त्यापैकी एक सिनेमा आहे.

स्वप्नील, शिवानी, सुबोधच्या अभिनयाबद्दल सगळे बोलत आहेतच, पण अनीता दातेचं काम सगळ्यात सरस वाटलं मला. अनेक शेड्ज आणि बारकावे आहेत तिच्या भूमिकेत आणि ते तिने जबरदस्त साकार केले आहेत. (त्याच बरोबरीने, नम्रता संभेराव टाईपकास्ट होत आहे का, असंही वाटलं.)

 

 

आणखी एक निरिक्षण मला नोंदवायचंच आहे :) कारण परेश मोकाशी दिग्दर्शक म्हणून किती आणि केवढा विचार करतात हे त्यातून ठळकपणे दिसलं – स्वप्नील रात्री घरी येतो, तेव्हा टीव्ही सुरू असतो, पंखा सुरू असतो आणि टीव्हीच्या बरोब्बर समोर असलेली जी सोफ्याची खुर्ची आहे, केवळ त्याच खुर्चीवर एखादी व्यक्ती बसल्याच्या खुणा सुरकुत्यांद्वारे दिसतात, बाकी सोफा एकदम स्मूथ आहे! अनिताचं म्हणजेच अवनीचं एकटेपण दर्शवणारी किती साधी, पण सखोल गोष्ट आहे ही! त्या सुरकुत्या दाखवल्याबद्दल परेश मोकाशी यांना वेगळा सलाम!

बाकी चित्रपट अफलातून आहेच. सगळ्यांचे रिव्यूज़ उत्तम आहे. शेवट मस्त आहे. हा सिनेमा पाहताना त्याचा बेस लक्षात घेतला तर सिनेमा जास्त चांगल्यारीतीने पोचेल.

वाळवीचे किडे जेव्हा डोळ्याला दिसतात तेव्हाच खरंतर धोक्याची जाणीव व्हायला हवी - वाळवी आहे याचाच अर्थ काहीतरी पोखरलं जात आहे. अनेकदा आपल्या मनातही मेंदू पोखरणारे विचार येतात, जे आपल्याला जाणीव करून देतात, की इतके निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत आहेत, याचा अर्थ काहीतरी चुकत आहे. त्याचं गांभीर्य ओळखून वेळीच उपचार करायला हवा, नाही केला,  तर अनर्थ होऊ शकतो! वाळवीकडे दुर्लक्ष करू नका, ती (तो) नीट पहाच!

 

 

0 comments: