November 17, 2022

गोदावरी

गोदावरी हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा, म्हणजे निखिल महाजनचा चित्रपट आहे. आणि त्यासाठी त्याला hats off! गोदावरीमधल्या प्रत्येक सीनमधली प्रत्येक फ्रेम बोलते. ती सीनला एखाद्या पात्राप्रमाणे हातभार लावते. In fact, फ्रेम आधी येते, कॅनव्हाससारखी आणि त्यावर मग सीन चीतराला जातो. चित्रपटातलं प्रत्येक मिनिट काळजीपूर्वक पाहिलं, तर चित्रपटातले silent momentsही आपल्याला बरंच काही सांगतात...

संथ वाहत असलेल्या पाण्यात थोडा तळ दिसत आहे, बरीचशी घाण दिसत आहे आणि त्यातूनच एक फुलं भरलेला, दिवा सोडलेला द्रोण वहात येतो. तो थोडा वेळ वाहत येतो आणि थांबतो बरोब्बर निशीच्या पायापाशी. निशी तो द्रोण हातात घेतो, खिशातून सिगारेट काढतो आणि त्या द्रोणातल्या दिव्यावर ती शिलगावतो! आपण हादरतो. गोदावरी सुरू होतो. अशी प्रत्येक फ्रेम. काहीतरी सांगणारी. विचारात पाडणारी.



मला सगळ्यात आवडलेल्या या काही फ्रेम्स –
१)आजोबांना अग्नी दिल्यावर आजवर तिटकारा वाटत आलेल्या पाण्यात निशी उतरतो आणि तेव्हाच मागे रावण दहन होतं!
२) निशी दैहिक कार्य उरकत असताना त्याच्या आयुष्याचा निर्णय सांगणारा येणारा डॉक्टरांचा फोन.
३) तरुण मुलगा काही महिन्यांचा सोबती आहे हे समजल्यानंतर काहीच प्रतिक्रिया न देणारे बाबा ग्रंथालयात पोचल्यावर, म्हणजे त्यांच्या safe placeमध्ये बसल्यावर मात्र चुळबुळत बसतात, अस्वस्थ होतात.
४) ’इतकं दाबून ठेवू नये कोणी’ असं आईनं म्हणल्याबरोब्बर वल्ही मारत खालचं पाणी वर आणत नाव पुढे नेणारा नावाडी.
५) आजोबांचं दहन होत असताना अगदी मागे, दिसेल न दिसेल असा उभा असलेला फुगेवाला.
६) फुगेवाल्याच्या लालचुटुक फुग्यांच्या पार्श्वभूमीवर निशीने त्याला कडकडून मारलेली मिठी आणि दोघांचंही कोसळणं…

एकही संवाद नसूनही केवढं सांगतो दिग्दर्शक! सरिता-कासव ज्या पायऱ्यांवर बसलेले असतात, तिथे दोन साड्या वाळत घातल्या आहेत, त्याही इतक्या सुंदर आहेत!

आणि संवाद! मोजके पण चटका लावणारे. एकही शब्द जास्त नाही, की कमी नाही.
परंपरेनं आपल्याला कचाट्यात पकडलेलं आहे याचा त्रागा सतत करणारा निशी आणि परंपरा नाकारून सहजपणे त्यातून बाहेर पडून नि:संग झालेले त्याचे बाबा! एकच सीन आहे बाप-लेकामध्ये, पण बाबांच्या संवादाने खाडकन भानावर येतो निशी… आणि आपणही.

अभिनयाबद्दल तर काही बोलायलाच नको. सगळेच पट्टीचे, नावाजलेले. निखिलने चेहऱ्यांना बोलतं केलं आहे त्यांच्या. विक्रम गोखलेंच्या चेहऱ्यावरचं हरवलेपण, त्यांचा कातर आवाज आणि त्यातलं कारूण्य, गौतमीचं वरवर खंबीर असणं पण आतून कोलमडणं, आईची तडफड… कमाल! कमाल!! एका सीनपुरता आलेला सिद्धार्थ मेननही छाप सोडून जातो.

हा सिनेमा कदाचित थेटरमध्ये टिकणार नाही. हरकत नाही. तो ओटीटीवर येईलच. कारण हा सिनेमा एकट्यानं अनुभवण्यासारखा आहे. तेव्हा मात्र नक्की पहा, एकदा नव्हे, अनेकदा पहा. शक्य असेल तर मोबाईलवर नको, किमान लॅपटॉप किंवा बेस्ट म्हणजे टिव्हीला जोडून पहा. आपल्याला प्रत्येकाला एक निमित्त हवं असतं, स्वत:च्या आत डोकावून पाहण्याचं. ’गोदावरी’ हे ते perfect निमित्त आहे.

एक नदी जन्माला येते. खळखळत्या प्रवाहातून तिचा प्रवास सुरू होतो.. प्रदूषण, घाण, कचरा, दगड यातून मार्ग काढत नदी प्रवास करतेच. वाटेत मातीला समृद्ध करते, अनेक जीव पिकवते, जगवते, कित्येक पापं पचवते. अखेर ती सागरला मिळणार आहे, का मध्येच कोरडी पडणार आहे, कोणी प्रयत्न करून तिला वाचवणार आहे, तिचा खळखळाट परत मिळवून देणार आहे का ती तशीच विझत जाणार आहे…तिला माहित नसतं… ती फक्त वाहते…

खळखळ खळखळ गोदा निघालीस तू
पुढल्या या गावा
पैलतीरानंतरही तुझा नाद यावा…

आपणही नदीसारखं होण्याचा प्रयत्न करायचा!
***


2 comments:

मिलिंद कोलटकर said...

आपला परिचय आवडला. म्हणूनच मुद्दामहून माझा अनुभव सांगतोय.
गेल्या आठवड्यात पहिलाच शो 'शाहू', कोल्हापूर ला ९||च्या शो ला पाहिला. हा एकमेव आणि दिवसभरातला शेवटचा शो होता. जेमतेम ५-७ जणच होते. शो रद्द व्हायची पाळी आली होती. पण उशिरा का होईना दाखवला.
नायक ( जितेंद्र जोशी) सतत धुम्रपान करत असल्यानं धु०विरोधी शासन जाहिरात अटळ.
पोष्टर वरलं फक्त काही क्षण येत.
बाकी चित्रपट आवडला. बंदिस्त कथानक. चित्रिकरण सर्वोत्तम!
धार्मिक लोकांनी जरा जपूनच पाहावा.
जाता, जाता, 'गोदावरी' फक्त नाशकातलीच सामोरी येते. अन ती ही 'हरिश्चंद्र घाट' प्रकारची. अपवाद म्हणून काही इतर ठिकाण आहेत, नाही असं नाही. पण ते अपवादच. बाकी चित्रपट मस्तच असला तरी कठीण आहे. समजायला. पुन्हा कधीतरी फ्रेम-बाय-फ्रेम पाहावा लागेल. 'दिठी' सारखा. पिक्चर नव्हे, पडद्यावरचं काव्य पाहतोय असं वाटलं. लांबीही फार नाही. जेमतेम तास दीडतासांचा असावा. दहाला सुरु होऊन चालत बाराला घरी पोहोचलो होतो.
आवडला.
धन्यवाद.

poonam said...

मिलिंद जी, सर्वप्रथम तपशीलात प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.
हो, हा सिनेमा थेटरमध्ये चालेल असा नाहीये, कारण अंतर्मुख होऊन पाहण्याचा सिनेमा आहे हा. पण मोठ्या पडद्याचा फार सुंदर प्रभाव पडतो. इथे दिग्दर्शकाला भव्य फ्रेम्स घेण्याचा केवढा स्कोप होता... पार त्र्यंबकेशवर ते गोदावरीचे भव्य पात्र, नाशिकचे डोंगर वगैरे. पण ते मुद्दाम टाळून त्याने जाणीवपूर्वक गावातल्या साध्या, कोणतंच ग्लॅमर नसलेल्या घाटावरचे चित्रण केलं आहे, हेच मला फार भावलं. त्याच वरवर सुंदर नसलेल्या फ्रेम्सच किती बोलतात!
समजायला कठिण आहे- एकदम योग्य बोललात. त्यामुळेच ओटीटीवर येईल तेव्हा अनेकदा बघावा असा हा चित्रपट आहे, प्रत्येक वेळेला तो काहीतरी नवीन देईल असे वाटते.