संध्याकाळची अस्वस्थ करणारी दिवेलागणीची वेळ झाली होती. घरात, बाहेर सगळीकडे मरगळ पसरलेली होती. ’दिवे लावायला पाहिजेत’, निनादच्या मनात आलं. पण त्याच्याच्याने उठवेना. शरीरावर बधीरत्व आलं होतं, अंग गार पडलं होतं. कधीच हलू नये, हा क्षण इथेच गोठावा... सगळं काही पटकन संपून जावं... मी, बाबा, हे घर, हे आयुष्य... डोळे बंद केलेत ते उघडूच नयेत कधी... निनादची विचित्र तंद्री लागली होती. काहीही न करण्याची , सुन्नपणाची , विनाशाची कल्पना आकर्षक वाटत होती. सगळं काही संपलंच तर अस्वस्थता नको, हतबलता नको, हरलेपणाचं फीलिंग नको, रडायला नको, दु:ख नको, काही काही नको... निनाद तरंगत राहिला...
इतक्यात खालून जोरजोरात हसण्याचे आवाज आले आणि पाठोपाठ त्याहीपेक्षा जोरात, नव्हे कर्कश्य आवाजात पंजाबी-हिंदी गाणी अक्षरश: केकाटायला लागली. तंद्री अवस्थेत असलेला निनाद दचकून भानावर आला. पटकन उठून त्याने खिडकीतून खाली डोकावून पाहिलं. अपेक्षेप्रमाणेच सीन होता. शेखर अंकलच्या लॉनवर पार्टी सुरू झाली होती. प्रचंड मोठे, झगझगीत दिवे लावले होते, मोठी म्युझिक सिस्टिम आणि जमायला लागलेले लोक. सोहाचा आवाज सर्वात जास्त येत होता. थकून निनादने खिडकीलाच डोकं टेकवलं. ’शिट! आजच यांना पार्टी करायचीये? ६.२०. म्हणजे अजून चार-पाच तास तरी धिंगाणा चालणार... गॉऽऽऽऽऽड.’ खिडकीवरच त्याने चार-पाच वेळा डोकं आपटलं.
’बाबा!’ चटकन त्याने खिडकीच्या काचा पूर्ण बंद केल्या, वर पडदेही ओढले. आवाजावर काहीच फरक पडला नाही. पळत पळत तो बेडरूममध्ये गेला. अगदी हळू दरवाजा उघडून तो आत डोकावला. बाबा ग्लानीतच होते. त्यांच्याही खोलीत अंधारून आलं होतं. खालचा आवाज इथेही येत होताच, तितकाच कर्कश्य. चटकन मास्क चढवत, हाताला सॅनिटायझर लावत तो बाबांच्या शेजारी उभा राहून त्यांना बघत राहिला. बाबांचा श्वास अगदी धीम्या लयीत सुरू होता. दोन मिनिटं तो अगदी स्तब्ध उभा राहिला. हळूच त्याने बाबांच्या बोटात ऑक्सीमीटर चढवला. ९०. ’नॉट बॅड, बट नॉट गुड टू. बाबा, लवकर बरे व्हा हो! आय वॉन्ट ९८. आज, आत्ता, लगेच.’ बाबांकडे बघताना त्याच्या घशात दाटून आलं.
इतक्यात बाबा कण्हले. किंचित खोकलेही. “निनाद...”
“ओ बाबा? इथेच आहे मी...” त्यांचा हात हातात घेत निनाद म्हणाला.
“काय चाललंय रे? कसला इतका आवाज?”
“खाली पार्टी सुरु झालीये बाबा. त्यांना काय पडलंय कोण जगतंय, कोण मेलंय, कोण आजारी आहे, कोणाला त्रास होतोय... ते आपले मस्त मजेत आहेत.”
“असूदे. त्यांना करूदे पार्टी. तू अपसेट होऊ नकोस. ही वेळ भांडणं करायची नाही.” बाबा किंचित धसकून म्हणाले.
“पण हा काय बेअकलीपणा आहे? सिव्हिक सेन्स वगैरे यांच्या गावीही नसतो का? अरे, किमान आजूबाजूला काय चालू आहे याचं तरी भान ठेवा. सोसायटीत राहतात कशाला हे लोक? प्रायव्हेट बंगल्यातच राहायचं ना... रोज करा पार्ट्या मग...” निनादचा संताप संताप व्हायला लागला. आवाज खरोखर ऐकवत नव्हता. एरवीही त्याला पंजाबी पॉप आवडायचं नाही. आत्ता तर चीडच येत होती.
“निनाद, किती वाजले रे? केवढा अंधार आहे घरात. जरा दिवे लाव.” बाबांनी चतुराईने त्याचं लक्ष वळवायचा प्रयत्न केला.
निनादलाही वास्तवाचं भान आलं.
“अं, हो. सॉरी बाबा. लावतो. पावणेसात झालेत. तुम्ही आराम करा. तुम्हाला काही हवंय का? बाबा, अजूनही आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.”
“मला मोबाईल आणि हेडफोन्स दे. जरा रामरक्षा ऐकत पडतो. आणि माझी काळजी करू नकोस. दोन दिवसात एकदम बरा होणारे मी, ओके? माझ्या जवळ बसू नको जास्त. जा... डबा येईल तोवर तूही पड जरा, विश्रांती घे. तुझी एकट्याचीच केवढी धावपळ होतेय. नेमका मी अडकलो असा, आणि एकटा पडलास राजा तू... सॉरी...”
“बाबा, सॉरी नका न म्हणू...” निनादने मोठ्या कष्टाने हुंदका दाबला.
त्याने बाबांना मोबाईल दिला आणि खोलीतला नाईट लॅम्प लावून त्याने स्वत:मागे दार ओढलं.
***
आवाज. आवाज. आवाज. कानठळ्या बसवणारा आवाज आणि माणसांचा कोलाहल.
निनादने न राहवून खाली डोकावून पाहिलं. आज फुगे, स्टेज असाही सरंजाम होता. ओह! वाढदिवस होता बहुतेक सोहाचा. ती आणि सोसायटीतलीच काही मुलं-मुली त्याला जमा झालेली दिसली खाली.
शेखर अंकल आणि त्यांची सगळी फॅमिली एरवीही अतिशय त्रासदायक होती. त्यांचा गार्डन फ्लॅट होता, त्याचा पुरेपूर फायदा ते घ्यायचे. ’मेरा गार्डन है, मैं कुछ भी करू, ज्यादा पैसे दिए है’ असा ऍटिट्यूड. आपण एका हाउसिंग सोसायटीत राहतो, लोकांचाही विचार आपल्याला करायला हवा वगैरे गोष्टींना तर ते भीकच घालत नसत. सतत पाहुणे बोलवायचे, कचरा नीट ठेवायचा नाही, आवाज करायचे, मोठमोठ्याने बोलायचं, वाहनं कशीही लावायची, कोणाला जुमानायचं नाही... द फॅमिली वॉज अ न्युसन्स. मध्यमवर्गीय माणूस सहसा वाकड्यात जात नाही, सतत टोकत नाही, दुर्लक्ष करतो. याचा पुरेपूर गैरफायदा शेखर अंकलचं कुटुंब घ्यायचं.
निनादचाही तसा त्यांच्याशी थेट संबंध नव्हता. पण दुर्दैव असं, की ते त्यांच्याच वर तिसऱ्या मजल्यावर रहात होते. एरवी तो त्यांच्या फंदात पडलाही नसता, पण आज शांततेची गरज असताना ही भणभण सहन होत नव्हती. इतक्यात त्याच्या मोबाईलचा स्क्रीन उजळला. त्याने नुसताच तो हातात घेतला. या आवाजात बोलणं शक्यच नव्हतं आणि इच्छाही नव्हती कोणाशीच काही बोलायची. १७ मिस्ड कॉल्स होते, २४ मेसेजेस. मावशी, आत्या, शेजारचे वेलणकर, सुजीतदादा... शिट! काय तेच तेच बोलायचं यांच्याशी? ’बाबा बरे आहेत, मी बरा आहे, डबा येईल, जेवून घेतो, औषध देतो, काही लागलं तर सांगतो, हो, हो, हो, हो!’
’अरे तुमची काळजी वाटते म्हणून सांगतात ना!’ अचानक आईच बोलली असं वाटलं त्याला.
स्वत:ला सावरत त्याने मेसेजेस पाहिले, तेच होते. सगळ्यांना एकच उत्तर दिलं- ’बाबा आणि मी ठीक आहोत. बाबांना उद्या व्हिडिओ कॉल लावून देतो.’ फोन सायलेन्टवर टाकून, लॉक करून त्याने सेंटर टेबलवर ठेवून दिला आणि सोफ्यावर पसरला. खोली पूर्ण अंधारात बुडाली होती. आख्खं घरच अंधारलं होतं. आईला हे अजिबात सहन झालं नसतं. संध्याकाळ झाली की ती घरभर दिवे लावायची, देवापुढे निरांजन लावायची, तिची ती ठरलेली स्तोत्र म्हणायची. यात कधी खंड पडलेला निनादने पाहिलाच नव्हता. बाहेरून घरी आलं, की आधी दिवे. आणि आता सगळं घरच अंधारात बुडालेलं. माणसंही.
आई. अजूनही खरंच वाटत नव्हतं. कुठूनतरी घरात शिरलेला तो कोव्हिडचा व्हायरस, त्याने आई-बाबांवर केलेला हल्ला केला. बाबा घरातच क्वारंटाईन्ड. क्रिटिकल, पण स्टेबल. आईला लागलेली धाप, नेहेमीचे डॉक्टर बिझी, नेहेमीचं हॉस्पिटल फुल्ल, लांब कोव्हिड सेंटरमध्ये तिला भरती केलेलं, कोणीही ओळखीचं नाही, काहीही धड सांगितलेलं नाही, बघताबघता तिला झालेला न्यूमोनिआ आणि ७ दिवसांत खेळ खल्लास! निनाद, त्याचे मित्र, भाऊ, आत्या, मावशी जमेल तिथे धावपळ करतायेत... कशाचाही उपयोग झाला नाही. विशीच्या अननुभवी मुलाला माणूस मेलं की पुढे काय करतात हेही माहित नव्हतं. बाबांना कसं सांगायचं? सांगायचं का? तेही कोलॅप्स झाले तर? घाबरून गेला होता निनाद. पण मावशीचे मिस्टर, आत्याचे मिस्टर, सुजितदादा यांनी निभावून नेलं. म्हणजे नेमकं काय केलं हेही विचारायचं धाडस निनादला झालं नव्हतं अजून. आईचं अंत्यदर्शन कोणालाच झालं नाही. हॉस्पिटलने प्रोटोकॉलनुसार सगळं केलं असेल असा दिलासा होता फक्त आणि आई नक्की गेली आहे याचा पुरावा दर्शवणारं एक डेथ सर्टिफिकेटही मिळालं. आईचं काय झालं असेल? अस्थीबिस्थी असतात असं ऐकलं होतं. कोव्हिड पेशन्ट्सच्या मिळतात का? त्या आपल्याच माणसाच्या असतात कशावरून? नकोच ते. निनादने सगळंच नाकारलं होतं. आईचे कपडे घेऊन आला परत फक्त. बाबांना सांगताना त्याचे पाय लटपटत होते. पण बाबांनी धीराने घेतलं. बाबांना मिठी मारावीशी वाटत होती, खूप रडावंसं वाटत होतं. ’मरूदे तो कोव्हिड’, असं म्हणत तो पुढेही झाला होता, पण बाबा एकदम चटका लागल्यासारखे मागे झाले. “नको निनाद, तुला रिस्क आहे. सॉरी बाळा, प्लीज ऐक”, हतबल होऊन ते म्हणाले, मग पाऊलच अडकलं. दोघं दोन खोल्यात बसून होते दोन-तीन दिवस. आपापल्या परीनं रडत होते, सोसत होते, रूटीनली आवरत होते आणि परत एकटे पडत होते. हलकट कोव्हिडमुळे घरी कोणी येऊ शकत नव्हतं. गेले काही दिवस तो फोनवर इतका बोलला होता, की आता कोणाशीच बोलायची इच्छाही नव्हती. भण्ण शांतता भरून राहिली सगळीकडे. थकवणारी शांतता. आणि तिला फाडून खाणारे ते खालून येणारे आवाज.
आई गेल्याची बातमी वेलणकर काकांनी बिल्डिंग व्हॉट्सॅप ग्रुपवर कळवली तेव्हा मेसेजेसचा पूर आला. तो ग्रुपवर नव्हता, पण बाबा होते आणि बाबांचा फोनही त्याच्याचकडे होता, म्हणून कळलं. म्हणून कळलं, की आई सोसायटीत किती लोकप्रिय होती, आवडती होती, किती जणींची मैत्रीण होती, किती जणांना तिने मदत केली होती, किती जणांना वाईट वाटलं होतं, हळहळ वाटली होती वगैरे वगैरे. तेवढ्यापुरतंच असतं ना सगळं? आज पाचवा दिवस होता. पण झाल्या आज पार्ट्या सुरू! निनादचं तोंड कडू झालं.
“चुकतोय्स हां तू निनाद. आपलं दु:ख आपल्यापुरतं. लोकांनी आपल्यासाठी का रडावं?” परत आईचा आवाज!
कोव्हिडचा संसर्ग, आपल्याच पाहुण्यांमध्ये तो पसरण्याची भीती, किमान थोडी सेन्सेटिव्हिटी, आदर या मुद्द्यांवर आईशी वाद घातला असता त्याने. आधी अनेकदा घातलेही होते. आता? आता कोणाशी भांडायचं? हट्ट करायचे?? हक्काने त्रास द्यायचा???
अनेक दिवस हट्टाने दाबलेले हुंदक्यांना अचानक वाट मिळाली. निनाद हमसून हमसून रडायला लागला. आईच्या जाण्याचा धक्का, बाबांची काळजी, टेन्शन, अचानक खांद्यावर पडलेली जबाबदारी, इतरांच्या वागण्याची चीड, जगावरचा संताप सगळं सगळं अश्रूंवाटे बाहेर पडायला लागलं. आई गेलीच होती. आई नव्हती. नसणार होती. खूप वाईट होते गेले काही दिवस. आणि पुढचे अगणित दिवस आईशिवाय कसे निभवायचे होते? खूप खूप रडला तो एकदाचा. पहिला भर ओसरला. तो निग्रहाने उठला. त्याने फोन पाहिला. मागचच्या त्याच्या मेसेजेसना उत्तरं आली होती, डबेवाला बाहेर डबा ठेवून गेला होता. बाबांनाही एकदा बघायला हवं होतं.
***
बाबांच्या हातात त्याने जेवणाचं ताट दिलं आणि खोलीच्या दारातच उभा राहिला. दर वेळी उभा राहायचा तसाच, हट्टाने.
पण दर वेळेसारखं “तू थांबू नकोस, जेवून घे, काही लागलं तर सांगेन मी”, असं बाबा म्हणाले नाहीत. उलट ते म्हणाले, “फारच आवाज येतोय ना रे आज?”
निनादने बाबांकडे रोखून पाहिलं. बिचारे, किती थकले होते. ते रडले तरी होते का? किती गिल्ट वाटत असेल त्यांनाही. न बोलता कसं सहन करत होते ते हे सगळं? कसे जगणार होते तेही आता यापुढे? निनादला भडभडून आलं. त्यांच्या खोलीचं दार लावून तो बाहेर आला आणि त्याने तडक सोसायटीचे सेक्रेटरी कुडकर यांना फोन केला.
“काका, ऐकायला येतंय का? मी निनाद कुलकर्णी... ऐकू येत नाहीये ना? त्यासाठीच फोन केलाय मी... खालून येतोय हा आवाज. खूप जोरात स्पीकर लावलेत. त्यांना सांगता येईल का प्लीज? काका, तुम्हाला माहित आहे ना आमच्या घरी... आं? हो, आय नो, त्यांच्या गार्डनमध्येच चाललंय, पण आवाज खूप जास्त आहे हो! तुम्हाला नाही का त्रास होते? आवाजाने डोकं फुटेल आता आमचं. हो. माझी कम्प्लेन्ट आहे असं समजा. पण हे आवाज बंद करा... ओके, कमी तरी करा. मी येऊ का तुमच्याबरोबर? बाबांचा तरी विचार करा काका, जरा माणुसकी दाखवा प्लीज! ओके, थॅंक यू.” त्याला आणखीही खूप काही बोलायचं होतं, दयेची भीक मागायची होती, शिव्या घालायच्या होत्या, त्यांच्या गुळमुळीत बोलण्याचा खरमरीत समाचार घ्यायचा होता. पण तो फक्त धुमसत राहिला.
मग, त्याच्या पायातलं त्राण संपलं. तो मटकन खाली बसला.
आईने काय केलं असतं अशा वेळी? तिनं बहुतेक शिखाआंटीलाच फोन केला असता. कुडकरांनाही केला असता. आणि मग दारं खिडक्या लावून शांतपणे आपली कामं केली असती. नंतर तिला त्या आवाजाचा त्रासच झाला नसता! ’आपल्या हातात आहे, तेवढं आपण करावं. आपल्या मनासारखंच होईल याचा हट्ट धरू नये.’ बारावीच्या रिझल्टवेळी टेन्शन आलं होतं तेव्हा असंच काहीतरी म्हणाली होती. आजी सिरियस होती, तेव्हाही. ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध वाचायची आणि काय काय सांगायची. तेव्हा ते सगळंच अनफेअर आणि हम्बगही वाटायचं. आत्ताही वाटतंय. अपेक्षा काय ठेवू नये? काहीही! आईसाठी इतकी धावपळ केली, ती काय ती जावी म्हणून? ती बरी व्हावी याचा हट्ट धरायला नको होता का? बाबांना त्रास होऊ नये यासाठी खालचे किंचाळणारे आवाज बंद व्हावेत यासाठी हालचाल करायची ना, की नाही? का नुसतं बावळटसारखं सहन करत बसायचं? लोक सोकावतात ना मग!
खालचा आवाज तसूभरही कमी झाला नव्हता.
निनादने थांबायचं ठरवलं. ’माझी सहनशक्ती किती आहे याची परिक्षाच घेतो आता.’ तो मुद्दामच खालच्या गाण्यांच्या तालावर घरात येरझाऱ्या घालायला लागला. पंधरा पावलात हॉल, पॅसेज, त्याची खोली अशी एक चक्कर होत होती. मध्येच बाबांच्या रूममध्ये डोकावत होता. गरगरगर- डोकं विचार करत होतं, पावलं चालत होती. किती-किती, कसकसले, कोणकोणते विचार डोक्यात वावटळीसारखे भिरभिरत होते. सगळ्यात आधी आला राग... कोविडचा, व्यवस्थेचा, प्रशासनाचा, डॉक्टरांचा, समाजाचा, शेखर अंकलसारख्या बेफिकीर लोकांचा... न संपणारा राग! आणि त्यानंतर वाटायला लागली हतबलता... आपण काहीच करू शकत नाही, म्हणून! समजा, आत्ता या क्षणी खाली गेलो आणि बोंबाबोंब केली तर काय होईल? त्या केकाटणाऱ्या आवाजात आपला आवाज कोणाला ऐकू जाईल? शेखर अंकल ओळखतील तरी का आपल्याला? आपण कळवळून बोलत असताना ते आपल्याकडे झूमधल्या प्राण्याकडे बघतात तसं बघतील फक्त! मैं, मेरा घर, मेरी पार्टी, मेरी बेटी, उसके फ्रेन्ड्ज, हमारे दोस्त यात तो कुठे बसतच नव्हता! “मां गुजर गयी? ओहो, सॉरी हां, आओ एक बीअर पीलो”, असंही म्हणायला ते कमी करणार नाहीत! मग हा वांझोटा राग घेऊन काय करायचं? कुठे जायचं?
निनाद आणखी जोरात चालायला लागला. आणि थोड्या वेळाने दमला बिचारा. त्याने सोफ्यावर अंग टाकलं आणि छताकडे बघत बसला. बाबांच्या खोलीतला मिणमिणता दिवा सोडला, तर बाकी घरात अजूनही काळोख होता. मनातल्या विचारांची गती कमी झाली होती, आता सुसंगत विचार सुरू झाले.
बास आता ही तडफड. रात्री दहानंतर हे असंच चालू राहिलं, तर तीन फोन करायचे- पहिला, परत एकदा कुडकरांना, दुसरा शेखर अंकलनाच आणि या दोन्हींचा उपयोग झाला नाही, तर पोलिसांना. काही ना काही होईलच.
आईचा मोबाईल टीपॉयवर होता. आज, दहा-पंधरा दिवसांनी तो हातात घेण्याचं धैर्य त्याला झालं. डिस्चार्ज झाला होता तो. त्याने तो चार्जिंगला लावला. त्याचा लख्ख प्रकाश खोलीत झळाळला. सहज त्याने होम स्क्रीन पाहिला. ’Prarthana’ नावाचा एक फोल्डर होता, तो त्याने उघडला. त्यात बऱ्याच ऑडिओ फाईल्स होत्या. आई रोज संध्याकाळी हेच ऐकत देवापाशी दिवा लावायची बहुतेक.
ते आठवून त्याच्या आत काहीतरी हललं, काहीतरी अनामिक जाणीव झाली. त्याने भराभर सगळ्या घरातले दिवे लावले. देवघरातलासुद्धा (आयुष्यात पहिल्यांदाच!). कित्येक दिवसांपूर्वीची सुकलेली फुलं तिथे देवांवर आणि तसबिरींवर होती. त्याने ती फुलं काढली. उदबत्ती लावली. चंदनाचा मंद सुवास दरवळायला लागला. काही वेळ तो देवांकडे फक्त टक लावून बघत उभा राहिला. बाहेर आला. आईचा फोन १५% चार्ज झाला होता. त्याने फोन हातात घेतला, हेडफोन्स लावले. प्रार्थनेचा फोल्डर उघडला, रॅन्डमली एक फाईलवर प्ले दाबलं आणि डोळे मिटून बसला...
’अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
परमदीनदयाळा नीरसी मोह माया
अचपळ मन माझे नावरे नावरिता
तुजविण शीण होतो धाव रे धाव आता’
करुणाष्टकं ऐकताऐकता निनादच्या डोळ्यांतून अश्रू पाझरायला लागले.
खालचे आवाज आता बंद झाले होते का, का त्याला ऐकू येत नव्हते?
***
(ही कथा मेनका दिवाळी अंक, २०२१मध्ये प्रकाशित झालेली आहे.)
2 comments:
निशब्द झालोय
माझ्यासाठी बहूमूल्य कमेन्ट आहे ही Anonymous! Thanks so much!
Post a Comment