October 31, 2022

सुंदर अक्षर

मी सहावीत होते तेव्हा मला "सुंदर हस्ताक्षर स्पर्धे"त पहिलं बक्षीस मिळालं होतं! 😁 माझं अक्षर पहिल्यापासून नीटनेटकं आहे. माझंच का, माझ्या शाळेत, माझ्या वर्गात जनरली सगळ्याच मुलींचं अक्षर नीटनेटकं आणि सुंदर असायचं. मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होत आम्हाला लहानपणापासून कर्सिव्ह लिपी शिकवली होती. कर्सिव्ह लिपीला स्वतःचीच एक ग्रेस, स्टाईल असल्यामुळे आणि मुलींच्या हातात एक नैसर्गिक वळण असल्यामुळे सहसा सगळ्या मुलींची अक्षरं तशी चांगलीच असायची. आम्ही एकमेकींच्या अक्षरांची, एखाद्या फटकाऱ्याची पद्धत कॉपीही करायचो. एकदा अशीच i, j वरती टिंब देण्याऐवजी गोल काढायची टूम निघाली होती. पानभर अनेक गोल दिसायचे! 😄 त्यानंतर वहीच्या रेघेवर नाही तर दोन रेघांच्या मध्ये लिहायची एक फॅशन आली होती. ते फार मस्त दिसायचं, असं माझं मत होतं. तसं लिहिल्यानंतर आमच्या काही टीचर्स आम्हाला रागावल्याही होत्या 😅 पण आम्ही काही जणी तसंच लिहीत राहिलो 😁 बरं अक्षर आणि उंची यामुळे वर्गात अनेकदा बोर्डावर लिहायचं काम मला दिलं जायचं.

 
त्यावेळी आम्ही सगळ्याजणी शाई पेनानेच लिहायचो, camel royal blue ink ने. पण काहीजणी काळ्या शाईने लिहायच्या आणि पांढऱ्या कागदावर ते अक्षर फार सुंदर दिसायचं. सगळ्याच मुलींची अक्षर सुंदर होती असं नाही, पण सगळ्याच मुलांची अक्षर मात्र वाईटच होती 😂😂 (माझ्या दोन आत्तेभावांची अक्षरं मात्र छान होती.) माझ्या वर्गात सगळ्यात सुंदर अक्षर होतं अनघा नावाच्या मुलीचं. वादातीत सुंदर! ती पुढे डॉक्टर झाली. त्यामुळे, 'डॉक्टरांचं अक्षर वाईट असतं' या वाक्याला अनघाचा सणसणीत अपवाद होता 😄 (कॉलेजमध्ये अनु भेटली. तिचं अक्षर तर छापील कर्सिव्ह अक्षरासारखं सुरेख होतं, अजूनही आहे!) नववीत असताना आमचं स्कूल मॅगझिन असायचं. सगळे students लेख द्यायचे, पण uniformity साठी आणि छान दिसावं म्हणून सगळे लेख परत दोन-तीन जण उतरवून काढायचे. आमच्या वेळी अर्थातच त्यापैकी खूपसं लेखन काम अनघाने आणि थोडं काम मी केलं होतं. पण तेव्हाही रात्री जागून, शाळेत पिरियड बुडवून वगैरे मजेत काम केलं होतं. लिहायची इतकी सवय होती, की कंटाळा यायचा नाही
📝
माझ्या घराच्या अगदी जवळ टिळक स्मारक आणि भरत नाट्य मंदिर ही दोन नाट्यगृह होती. तिथे हाताने लिहिलेल्या नाटकांच्या जाहिराती असायच्या, अजूनही असतात 😊 ब्राऊन पाटी आणि पांढरा, पिवळा आणि निळा या तीन खडूंनीच फार सुंदर अक्षरांमध्ये नाटकांच्या जाहिराती असायच्या. त्यातही, वेगवेगळ्या नाटकांच्या जाहिराती वेगवेगळ्या अक्षरात लिहायचे ते! त्याला सुलेखन किंवा कालिग्राफी म्हणतात हे मला फार नंतर कळलं.
 
कॉलेजमध्ये असताना आम्ही बेहेरे क्लासला जायचो. बेहेरे सरांचं board वरचं अक्षरही देखणं होतं. त्यांनी तसं ते मुद्दाम develop केलं होतं. 
 
पुढे कॉलेज, ऑफिस इथे अक्षराचं महत्त्व कमी होत गेलं. मग आयुष्यात कॉम्प्युटर्स आले, मोबाईल आले. लेखन संपलंच. आता माझं लेखन तर फक्त याद्या करण्यापुरतं उरलं आहे! 😔😐 (Ironically, मी "लेखिका" झाले, पण माझं एकही "लेखन" मी हाताने केलेलं नाही, सारं काही स्क्रीनवर!🥲)
 
परवा दिवाळीत एका देवळात गेलो होतो, तिथे या दोन बोर्डांनी लक्ष वेधून घेतलं. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं वर्णन करणाऱ्या सुंदर ओव्या त्यावर लिहिलेल्या होत्या ❣️ दिवाळीच्या सणाचं वर्णन करणाऱ्या या ओव्या मी पहिल्यांदाच वाचल्या. त्या ओव्या कोणी लिहिल्या आहेत, कोणत्या ग्रंथातल्या आहेत हे मला माहित नाही. विसरून जाऊ नयेत म्हणून मुद्दाम इथे लिहून ठेवते आहे-
 
आली आली गं दिवाळी । मनाची गं खुलवी कळी ।
हर्षोल्लास अंतर्यामी । काया विलसी नव्हाळी ॥
 
गाय गरीब माऊली । तिच्या कृपेची सावली ।
बळीराजाची कामधेनू । वसूबारस पूजियेली ॥
 
पिकं वाऱ्यावर डोलती । कणसाकणसामध्ये मोती ।
पडवी भरली कण्यांनी । धनतेरसाच्या हाती ॥
 
राडारोडा शेणमाती । खत उपजावू गं माती ।
नरकाची गं घाण । भूमाता पोटी घेती ॥
 
ढवळा पवळा खिल्लारी जोडी । धनधान्याचा गाडा ओढी ।
घामाच्या गं धारांमधुनी । लक्ष्मी पाऊले जोडी ॥
 
आला आला गं पाडवा । धनी माझा उभा आडवा।
बाईल ओवाळी त्याला । लाभो आयुष्य कुंकवा ॥  

बीजेचीही महती थोर । भावाबहिणींचं प्रेम न्यारं ।
घाली ओवाळणी बंधूराया । लखलाभ होवो संसार ॥

तुळस अंगणी लाविली । तिची मंजिरी बहरली ।
जगन्नियंत्याशी गाठ । तुळशीविवाहा बांधली ॥

नवी दिशा नवं वारं । जग झालं छोटं फार ।
कृषीसंस्कृतीविण फोल । होईल संसार असार ॥
 
दिवाळीचा हाच होरा । ऋतूचक्र दावी माया ।
कृषीजीवनी ताळमेळ । देव-धर्म-विधी कार्या ॥
 
अतिशय देखण्या, मोत्यासारख्या अक्षरांत या ओव्या लिहिल्या होत्या. अनेक देवळात ही अशी सुंदर अक्षरं वाचायला मिळतात. फळ्यांवर एकसारख्या सुरेख अक्षरांत लिहिणं अजिबातच सोपं नसतं. कोण असतात हे भक्त? त्यांनाच ही दैवी देणगी कशी काय मिळालेली असते? त्यांची आणि देवाची भेट व्हावी यासाठीची ही दैवी योजना असते का? असो. ते अक्षर पाहिलं आणि माझ्या अक्षर दुनियेत शिरले! 😊
 
मधूनच कधीतरी, पण नेमाने मला हाताने लिहिण्याची हुक्की येते. वह्या, पेनं घेऊन सुरूवातही होते. पण जेव्हा एक पान लिहितानाही हात दुखायला लागतो तेव्हा बेत आपसूक बारगळतो! 😅 आता ते मोत्यासारखं अक्षर पाहून परत हुक्की आली आहे, पाहूया किती दिवस उत्साह टिकतो ते! 😄

0 comments: