October 13, 2022

मज फूलही रुतावे...

माणूस मुळात कटू नसतो, तो हळूहळू होत जातो... त्याला अनुभव असे विचित्र येतात की कटूता निर्माण होणं स्वाभाविक असतं. काय कारण असतं असे अनुभव येण्याचं? तसे अनुभव मग प्रत्येकालाच का नाही येत? या प्रश्नाला काही उत्तर नाही. कोणी म्हणतं नशीब, कोणी म्हणतं योगायोग, तर कोणी म्हणतं कर्म! मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे!

कारण काहीही असो. घडायचं ते घडतं.
 
जसं की,
एक मोठा समानधर्मी लोकांचा कार्यक्रम असतो, पण त्यात एकाही समानधर्मीला त्याला सामावून घ्यावंसं वाटत नाही,
त्याच्याशी आपणहून येऊन कोणीही बोलत नाही,
तो आपणहून जाऊन बोलला तरी उपाचारपुरतं बोलून त्याच्या समोरून सगळे सटकतात,
लांबून हसून मग त्याच्याकडे पाठच करतात,
त्याच्याकडे फोन देऊन "आमचा" फोटो काढतोस का असं गोड आवाजात विचारतात,
कार्यक्रमाचे फोटो पोस्ट करताना नेमका त्याचाच फोटो पोस्ट केला जात नाही,
त्याच्या चांगल्या कामाबद्दल माहित असूनही मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष करतात, कौतुक तर लांबचीच गोष्ट, दखलही घेत नाहीत
त्यानं परिवारासाठी किंवा कोणासाठीही चांगल्या मनानं केलेली कृतीही अनावश्यक किंवा बिनगरजेची आहे असं वाटतं...
 
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चीरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे!
 
ही यादी लांबतच जाते. त्याचा झगडा त्याच्या जवळच्या लोकांना माहीत असतो, पण त्यांच्या दृष्टीने तो क्षुल्लक असतो किंवा त्याची आच त्यांच्यापर्यंत पोचत नाही. शिवाय, स्वतःचे हितसंबंध, प्रतिमा याची काळजी त्यांना जास्त असते. त्यामुळे कोणाकडूनही उघड पाठिंबा मिळत नाही, inclusion होत नाही, सहानुभूती देखील नाही. उलट त्याचे दोषच परत परत त्याला दाखवून दिले देतात... तुझे vibes negative आहेत, तुझ्याकडे tact नाही, तू फार स्पष्ट बोलतोस, किंवा मग जग हे असंच असतं वगैरे वगैरे... ही यादीही लांबत जाते.
 
काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणे ही विपरीत होत आहे
 
मग माणसाला प्रश्न पडायला लागतात, self doubt च्या वावटळीत तो भिरभिरत राहतो. दुखावला जातो आणि दुखावून घेत राहतो. What more should I do, so that I am accepted??? माझ्यात असतील दोष, पण तुमच्यातही असतील ना? तुमच्यात जसे गुण असतील तसे माझ्यातही आहेत. मग तुम्हाला सगळे हवेहवेसे, फक्त मी का नकोसा, असं का? 
 
मग कोणी म्हणतं नशीब, कोणी म्हणतं योगायोग, तर कोणी म्हणतं कर्म! 
 
माणूस एकटा पडत नाही, पाडला जातो. कोणालाच एकटं राहायला आवडत नाही. गप्पा मारायची, आपलं काही शेअर करण्याची, दुसऱ्याचं ऐकायची, पाहायची, त्याबद्दल बोलायची इच्छा, उर्मी प्रत्येकालाच असते. पण तरीही एकटेपण अपरिहार्यपणे येतं, कारण you just don't fit, no matter what you do. त्याला मुळातून, तो आहे तसं स्वीकारणारं कोणी नसतं. 
 
हा स्नेह वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळूनी मी रिक्तहस्त आहे! 
 
आणि मग माणूस कटू होतो.
आणि तो तसा एकदाचा करून टाकला की मग लोक म्हणतात, तो एकलकोंडा आहे, शिष्ट आहे, माणूसघाणा आहे.
***

0 comments: