August 18, 2022

एक ही ख्वाब कई बार...

प्रेमात पडलं आणि मनासारखा जोडीदार मिळाला की मग सुरू होतं स्वप्नरंजन! कधी एकट्याने, तर कधी जोडीदाराबरोबर, कधी रात्री झोपेत, किंवा कधी चक्क दिवसाउजेडी ! स्वप्नांना सीमाच नसल्यामुळे आपल्या त्या वेळच्या मनस्थितीनुसार , परिस्थितीनुसार , ऐपतीनुसार प्रत्येकालाच स्वप्न पडत असतात. गुलजार साहेब हे काय रसायन आहे हे आपल्याला माहित आहेच. शालीन, तरल रोमान्स आणि त्यातही थोडा नटखटपणा ही त्यांची वैशिट्य. "किनारा" चित्रपटातलं ’एक ही ख्वाब देखा है कोई बार मैने’ हे नायकाने पाहिलेल्या त्याच्या स्वप्नाबद्दलचं गाणं गुलजारांच्या सगळ्याऽऽऽ वैशिष्ट्यांसह अवतरतं! 🥰

धृवपदाची ओळ ही इतकीच आहे. मग, त्याने अनेकदा पाहिलेल्या स्वप्नाबद्दल लगोलग नायक सांगायला लागतो आणि म्हणतो, ’तूने साडी में उरस ली है चाबियां मेरे घर की’!! पहिल्या कडव्यातल्या पहिल्याच वाक्यात आपली विकेट जाते! ☺️ काय कमाल कल्पना आहे पहा! एकाच वाक्याचे केवढे सोपे आणि तरीही गहन अर्थ आहेत! प्रेयसीकडे त्याच्या घराच्या किल्ल्या आहेत- म्हणजेच त्याच्यावरचं तिचं स्वामित्व त्याने खुशीने मान्य केलं आहे... स्वत:सकट संपूर्ण घराला त्याने तिच्या स्वाधीन केलेले आहे! बरं, तिनेही किल्ल्या नुसत्याच घेऊन पर्समध्ये नाही ठेवलेल्या... तिने ’उरस’ली है चाबियां! ’उरसना’ म्हणजे खेळणे, चेंडू जसा आपण एका हातातून दुसऱ्या हातात वर-खाली करत खेळतो, तशा ती त्याच्या घराच्या किल्ल्यांशी खेळ खेळत आहे... याचाच अर्थ, तिनेही त्याच्यावरचा आणि त्याचा घरावरचा स्वत:चा हक्क मान्य केलेला आहे, अगदी सहजगत्या! हेच तर स्वप्न प्रेमी जीव पहात असतात ना- एका घरात एकत्र राहायचं! या साध्या ओळीचा इतका multi layered अर्थ आहे महाराजा... कारण ते आहेत गुलजार! अशीच प्रत्येक ओळ वेधक आहे, सोप्या समजणाऱ्या भाषेत लिहिलेली, पण त्यातूनही खूप काही सांगणारी... याच गाण्यातल्या माझ्या आणखी एका आवडत्या ओळीबद्दल सांगते...
’...और बिस्तर से कई बार जगाया है तुझको’. सहसा जेव्हा पुरुष स्वप्न बघतो, तेव्हा ’तो’ लोळत असतो आणि त्याची प्रेयसी त्याच्याजवळ येऊन, गोड बोलत, लाजत त्याला उठवते. मग तो तिलाच जवळ ओढतो, मग त्यांचे प्रणयाराधन वै वै 😛 हे क्लिशे दृश्य गुलजार किती सहजतेने रिव्हर्स करतात! इथे, तो 'तिच्या आधी' उठला आहे, तो तिला खूप उशीरापर्यंत झोपायची मुभा देतोय आणि मग तिला जागं करतोय.. एकदा नाही, अनेकदा घडतंय हे त्यांच्यात! बाईने उशीरापर्यंत लोळत राहणं, म्हणजे किती भयंकर पाप समजलं जातं, अजूनही, हे माहित आहे ना? त्या पार्श्वभूमीवर, १९७६मध्ये काय कमालीचं रोमॅंटिक आणि forward आहे हे! Again, so much in so little! Salute boss.
गाण्यातलं शेवटचं कडवं म्हणजे परत एक सिक्सर आहे. तो म्हणतो, ’जब तुम्हारा ये ख्वाब देखा था, अपने बिस्तर पे मैं उस वक्त पडा जाग रहा था’. यातली ’जाग रहा था’ हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. जे स्वप्न आपण झोपेत पाहतो, त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. आपण सगळेच अतिशय रॅन्डम स्वप्न पाहतो. पण जागेपणी जी स्वप्न पाहिली जातात ना, त्यांना वास्तवाचं कोंदण असतं. त्यामुळेच, जेव्हा नायक म्हणतो, की आपल्या दोघांच्या साध्या, सोप्या पण प्रेमळ सहजीवनाचं मी स्वप्न पाहतो, जागेपणी पाहतो, आणि तेही ’कई बार’ तेव्हा तो या नात्यात किती खोलवर गुंतलेला आहे, किती committed आहे हेच दिसतं, हो ना? 💘
आणि या गाण्याचं टेकिंग! धरम आणि हेमामधली काय ती केमिस्ट्री! वाह व्वा! 😇Their best, no, bestest duet on screen this is, IMO. हेमाला इतकं आनंदी, इतकं relaxed कधी पाहिलंच नाही. आणि धरमच्या खळ्या, त्याचं गालातल्या गालात हसणं... उफ्फ यू मां! 😍 गाण्यात धरम हेमाला त्यानं, त्या दोघांबद्दल पाहिलेल्या स्वप्नाबद्दल सांगतोय. त्यामुळे म्युझिक आहे, तेव्हा गाणं वास्तवात आणि कडव्यात ’ख्वाब’मध्ये आहे. प्रेमी जीव तेच, स्वप्नही त्यांचंच, पण वास्तव आणि स्वप्नातला काय सूक्ष्म फरक दाखवलाय. अर्थात डायरेक्टरही स्वत: गुलजारच असल्याने त्यांना त्यांच्या कल्पनेप्रमाणे करता आलं असेल हे गाणं.
स्पेशल मेन्शन- अर्थातच भूपिंदर सिंग आणि आरडी. गाण्याचा प्रकार, त्याची सिच्युएशन बघून आरडीने चाल लावली आहे... गाणं नव्हे, गुणगुणणं आहे हे. आणि भूपीचा आवाज धरमला काय चपखल बसला आहे... धरमजींनी काय एक्स्प्रेशन्स दिले आहेत, काय करेक्ट हसले आहेत, जणू की तेच गात आहेत! (समोर हेमा होती, आणि त्यावेळी त्यांचं प्रेम फुलत होतं. हे स्वप्न नायकाचं नसून, स्वत:चंच असल्याचा फील धरमजींना आला असेल का? 😉 )
आणि हेमाच्या त्या फ्लाईंग किसचा किस्साही ऐकला असेलच तुम्ही. भूपीजींनी गाण्यात प्रामुख्यानं असलेली गिटारही अर्थातच वाजवलेली आहे. एका जागी (गाण्यात, ते दोघे ’ख्वाब’मध्ये पत्ते खेळत असताना) गिटारचा आवाज जरा कर्कश्य झाला आहे. ते फार नंतर लक्षात आलं गुलजारांच्या. मग त्यांनी गाण्यात गिटार कणसूर ऐकायला येते त्याच वेळेला हेमाला, स्वत:च्या पत्त्यांकडे बघून, धरमपाजींना चिडवणारा चुंबनाचा आवाज काढायला सांगितला- गिटारच्या आवाजावर overlap होईल असा... दुसरा कोणता नायक असता, तर flying kiss biss द्यायला हेमाजींनी सपशेल नकारच दिला असता, मला वाटतं 🙂 पण बहुतेक धरमजींना ऑनस्क्रीन किस देण्याची संधी त्यांनाही सोडता आली नसावी! 😘😘 (गुलजारांनी इथेही आपला नटखट स्वभाव दाखवलाच ☺️☺️)
गुलजारांबद्दल काय लिहावं! मी कोण लिहिणारी? लिहिणारे ते, आपण फक्त वाचणारे आणि आपल्या वकूबानुसार त्यांचा अर्थ लावणारे. गीतकार म्हणून ते ग्रेटच आहेत. हिंदी मेन स्ट्रीम सिनेमात जे कधीच लिहिलं गेलं नसतं, दाखवलं गेलं नसतं ते त्यांनी दाखवलं, आणलं, लिहिलं. मारधाड, हिंसा यांपेक्षा माणसांवर, नातेसंबंधांवर भाष्य केलं. सुदैवानं त्यांना त्यांच्या मनासारखे चित्रपट करता आले, आणि आपल्याला पाहता आले. पाठ असलेल्या त्यांच्या गाण्यांमधून आजही, मधूनच काहीतरी नवीन सापडतं. खूप आनंद होतो. त्यांच्यामुळे आपल्याला प्रेमाचे किती नवीन आविष्कार समजले, प्रेमातली तरलता समजली, प्रेमाची अभिव्यक्ती कळली. आणखी काय हवं? HBD Gulzar! Love you 💟

3 comments:

Anonymous said...

छान लिहिलंय

शब्द vedh said...

छान लेखन

poonam said...

Anonymous आणि मराठी कथा आणि लेख... प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!