April 20, 2022

नीज माझ्या नंदलाला...


तान्ह्या बाळांना झोपायला अजिबात आवडत नाही! नुकत्याच प्रवेश केलेल्या या जगात इतकं सारं पहायला, ऐकायला, चाटून पहायला (!) असताना तासचे तास झोपणं म्हणजे waste of time असं त्यांना वाटणं अगदीच रास्त आहे.

पण झोपायला तर हवंच! मग बाळाची आई त्याला झोपवण्यासाठी कितीतरी ट्रिक्स वापरते. कोणी कसलं आमीष दाखवते, कोणी रागावते, कोणी डायरेक्ट ऍक्शन घेत त्याला थोपटायला लागते, तर कोणी अंगाई गायला लागते. साधे शब्द, एक संथ, शांत लय आणि त्याबरोबर आईचा आश्वस्त करणारा आवाज... चळवळ करणारं बाळ चटकन शांत होतं आणि हलकेच झोपेच्या आधीन होतं...

अशीच एक सुरेख, शांतावणारी अंगाई म्हणजे ’नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे...’ लताबाईंचा आवाज तर स्वर्गीय आहेच, पण संगीतकार श्रीनिवास खळे आणि गीतकार मंगेश पाडगावकर यांनी काय अद्भुत सुंदर अंगाई तयार केलेली आहे! संगीतकार म्हणून खळेकाका आणि गीतकार, कवी म्हणून मंगेश पाडगावकर यांची स्वतंत्र कारकीर्द फार मोठी आणि यशस्वीदेखील आहे. पण या दोघांनी जेव्हा एकमेकांबरोबर काम केलेलं आहे, तेव्हा काहीतरी विशेष रसायन तयार झालेलं आहे, खास. ’जाहल्या काही चुका’, ’जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा’, ’शुक्रतारा मंद वारा’, ’श्रावणात घननीळा’, ’विसरशील खास मला’ अशी कितीतरी अवीट गोडीची गाणी या द्वयीनं दिलेली आहेत. ’नीज माझ्या नंदलाला’मध्येही या दोघांचा खास ’टच’ दिसतोच.

ही एक ’अंगाई’ आहे याचं पूरेपूर भान ठेवत खळेकाकांनी यात ’मिनिमल’ संगीताचा आणि इन्टरल्यूड्जचा वापर केलेला आहे यातच त्यांचा ब्रिलियन्स दिसतो. अंगाई असल्यामुळे पाडगावकरदेखील स्ट्रेट टू द पॉइंट येतात. किती सोपं धृवपद आहे- नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. बास! प्रत्येक आई बाळाला झोपवताना हेच तर म्हणते ना, ’चला झोपायची वेळ झाली’. हेच पद्यात पाडगावकर किती सुंदर लिहितात- ’नीज’ हा त्यांनी वापरलेला शब्दच किती गोड आहे, त्यात एक आर्जव आहे, मऊपणा आहे.

या ओळीनंतरही फारसं संगीत नाहीच. झोपायची वेळ ’का’ झालेली आहे, हे लताबाई लगेचच गायला लागतात-

शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे...

लताबाईंचा आवाज तारसप्तकात इतका लीलया, इतका तळपता चढायचा, की प्रत्येक संगीतकाराने त्यांना नेहेमीच वरच्या पट्टीतली गाणी दिली आहेत. या गाण्यातही पुढे त्यांनी वरच्या पट्टीत अप्रतिम लकेरी घेतलेल्या आहेतच. पण सहसा त्यांचा खर्जातला सूर ऐकायला मिळत नाही. इथे मात्र ’शांत हे..’ या दोनच शब्दांत त्यांनी जो काही खोलवर सूर मारला आहे की तिथेच आपण शांत व्हायला लागतो! पुढे जेव्हा-
या झर्‍याचा सूर आता मंद झाला रे...

हे शब्द येतात तेव्हा आपली ऑलरेडी तंद्री लागलेली असते. एका क्षणानंतर लक्षात येतं, ’झरा’? हा कोणता झरा बुवा? तर कवीकल्पनेतून खेड्यातलं एखादं टुमदार कौलारू घर, भोवती नारळ-केळीची बाग आणि घरामागूनच वाहणारा झरा... असं चित्र पाडगावकरांनी पाहिलं असेल आणि ते इथे केवळ एकाच शब्दांतून मांडलं असेल. पण त्या एकाच शब्दाची ताकद बघा ना... आपण एका मोठ्या शहरातल्या, एका सिमेंटच्या बंदिस्त घरात बसून ही अंगाई ऐकत असतानादेखील तो ’घरामागे वाहणारा झरा’ बिलिव्हेबल वाटतो. एखादा असा झरा खरंच मागे खळखळत आहे, पण आता रात्र झाल्याने तोही दमला आहे, शांत झाला आहे- हे चित्र फारसं खोटं वाटत नाही. ही किमया केवळ त्या कवीची!

आणि या चित्रात पाडगावकर पुढे सुरेख रंग भरतात. सहजपणे झोपी जाईल ते बाळ कसलं? मग दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात त्याने ’का झोपायला हवं’ हे आई त्याला पटवून देऊ लागते. त्यासाठी ती त्याला सांगते, की गाई गोठ्यात झोपल्यात, पाखरंही झोपली, आता तूही झोप बाळा... इतकंच नाही, तर ’चांदण्याला नीज आली’ असे शब्द त्यांनी योजले आहेत! आहाहा, काय सुंदर कल्पना! म्लान होणारा चंद्रप्रकाशच येतो ना डोळ्यापुढे? त्याहीनंतर ’झऱ्या’सारखीच एक अगदी खरी वाटावी अशी उपमा पाडगावकर देतात- ’रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे...’ एव्हाना आपण गाण्यात इतके तल्लीन झालेलो असतो, की खरोखर आपल्या मनात वसणाऱ्या रातराणीच्या दरवळाने आसमंत भिजून जातो...

आणि शेवटचं कडवं तर कमाल आहे! इतकं सांगूनही बाळ नाहीच झोपत आहे. किती दाखले दिले, किती पटवून दिलं... पण द्वाड बाळ झोपण्याचं नाव काही घेत नाही! मग आई शेवटी थकून त्याला विनवायला लागते-

नीज रे आनंदकंदा, नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्‍यांचा छंदताला, छंदताला रे

सोनुल्या, छकुल्या, गोडुल्या... बाळाला हाक मारायची कितीतरी गोड नावं... आनंदकंदा, मुकुंदा हीदेखील तशीच, आईनं लाडानी घेतलेली संबोधनं... आणि यानंतर अंगाईतली शेवटची सिक्सर लागते- ’आवरी या घागर्‍यांचा छंदताला, छंदताला रे’. घागऱ्या म्हणजे बाळाच्या पायात घातलेले वाळे किंवा पैंजण. तान्ही बाळं पालथी पडली की बाय डिफॉल्ट हात आणि पाय एका लयीत न थकता हलवतात. इथे बाळ अजूनही जागं आहे, म्हणजेच मस्तपैकी पाय वर करून एका ’छंदात’, एका ’तालात’ त्याची पायाची पी.टी. सुरू आहे! तेच आता ’आवर’ असं ती आई त्याला विनवतेय आणि परत एकदा ’नीज माझ्या नंदलाला’ म्हणत आहे. पाडगावकरांच्या ऑब्झर्वेशन स्किल्सना सलाम करावासा वाटतो. हातपाय मजेत हलवणारी बाळं आपण प्रत्येकानं पाहिली आहेत. पण त्याचा असा काव्यात्म वापर करावासा त्यांना वाटला, इथेच त्यांच्यातला महान कवी, गीतकार दिसतो.

ही संपूर्ण अंगाई एकदम ’जमून’ आलेली आहे. शब्द, संगीत आणि स्वर यापैकी कोणालाच वेगळं काढता येत नाही. यांपैकी कोण वरचढ असा प्रश्नही पडत नाही, इतके हे तीनही घटक यात एकरूप झालेले आहेत. ’नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे...’ दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हे गाणं ऐकावं, आईच्या आवाजासारखंच ते शांत करत जातं...

***

2 comments:

Anonymous said...

मस्त लिहिलंय... छंद तालाबद्दल पहिल्यांदाच कळलं

पूनम छत्रे said...

Thanks so much :) हो, छंद , ताल या गाण्यातल्या गोष्टी, पण बाळांच्या लयबद्ध हालचालींसाठीदेखील एकदम पर्फेक्ट वर्णन आहे ते :)