May 19, 2022

प्रिय सुनीताबाई

 

प्रिय सुनीताबाई,

खरंतर ’प्रिय’ हे संबोधन फार धाडसाने लिहित आहे. केवळ तुमचे आणि तुमच्याबद्दल वाचून तुमचा प्रचंड आदर वाटतो, दबदबा वाटतो, प्रचंड कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. पण या सगळ्यापेक्षा जास्त प्रेम वाटतं. असं वाटतं की तुम्हाला कधी प्रत्यक्ष भेटता आलं असतं, तर पुलंना साष्टांग नमस्कार केला असता आणि तुम्हाला नमस्कार करून मग एक घट्ट मिठीही मारली असती. हां, कदाचित मिठी मारण्याइतकं तुमच्या जवळ यायचं धाडस झालं नसतं, पण मनातूच तीच इच्छा बाळगली असती. आता तर काहीच शक्य नाहीये, पण तरीही भाबडेपणाने तुम्हाला संबोधत आहे, ’प्रिय सुनीताबाई’.

तुम्ही लिहिलेली ’आहे मनोहर तरी’ आणि ’प्रिय जी.ए.’ ही माझी अत्यंत आवडती पुस्तकं. जेव्हा वाचली, तेव्हा तुम्ही होतात. पण तुम्हाला पत्र लिहावं, पुस्तकं वाचून जे वाटलं ते ओबडधोबड शब्दांत कळवावं हे कधी सुचलंच नाही. पण तुमच्यावर मंगला गोडबोलेंनी लिहिलेलं हे “सुनीताबाई” पुस्तक नुकतंच वाचलं आणि राहवलं नाही. परत एकदा तुमच्या जगण्यातलं ठळकपण इतकं आतून जाणवलं, की हे व्हर्चुअल पत्र का होईना, लिहायला घेतलंच.

तुमच्याच शब्दांत सांगायचं, तर पुल हे ’खेळीया’ होते. नाटक, चित्रपट, लेखन, गाणं, समीक्षा... त्यांना सगळंच जमायचं. त्यांचे गुण हेरणारे अनेक जण त्यांना मिळाले, आणि त्यांच्या कलाप्रवासाला चहूअंगाने सुरूवात झाली. पण त्यापैकी त्यांनी नेमकं काय करायचं, कधी करायचं, किती काळापर्यंत करायचं, याचा त्रयस्थ आढावा घेतलात, तो तुम्ही! पुलंच्या खळाळणाऱ्या प्रतिभेला तुम्ही जराशी शिस्त लावलीत, आणि त्यामुळे केवढं अमाप दान मराठी रसिकांच्या ओंजळीत पड्लं! तुमच्या या ’डिसिजन मेकिंग’च्या पद्धतीवरही भरपूर, बोचरी टीका झाली. ते योग्य होतं ना का नव्हतं यावर बोलायची माझी प्राज्ञाच नाही. पण या सगळ्यात मला दिसलं ते तुमचं पुलंवरचं कळकळीचं, संपूर्ण निष्ठेचं प्रेम आणि पुलंना तुमच्याबद्दल असलेला प्रचंड विश्वास. पुलंना ’बास’ म्हणून सांगण्याचं आणि त्यांना नवीन दिशेला घेऊन जाण्याचं धारिष्ट्य तुमच्याकडेच होतं. पुल एकाच साच्यात अडकू नयेत, कौतुकाच्या झुल्यावरच झुलत बसू नयेत यासाठी तुम्ही त्यांना नवनवीन आव्हानांकडे वळवलंत. आग्रहाने, हट्टाने, रागावून वा चुचकारून. पण पुलंनीही तुमचं ऐकलं. तूफान चाललेले लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम शिखरावर असताना तेदेखील थांबले.- ही मला तुमच्या दोघांमधली सगळ्यात अनमोल गोष्ट वाटते. आपल्या प्रेमाच्या माणसाला आपण नेहेमीच कळकळीने, त्याच्या भल्याच्या गोष्टी सांगतो. पण ’ही काहीतरी सांगतेय म्हणजे त्यात तथ्य आहे, त्यात तिचा काही विचार आहे’ हे मान्य करणं आणि कोणताही ईगो मध्ये न आणता त्याची अंमलबजावणी करणं किती precious आहे! पुलंचा तुमच्यावर संपूर्ण विश्वास होता. कोणत्याही नात्यात, त्यातही नवरा-बायकोच्या नात्यात, आणि त्यातही कलाकार नवरा-बायकोच्या नात्यात इतका निस्सीम विश्वास असणं हेच मला अविश्वसनीय वाटतं. यात तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा, स्वच्छ विचारांचा, प्रामाणिकपणाचा वाटाच अधिक आहे यात काय संशय! तुम्हाला नमस्कार करावासा वाटतो, तो यासाठीच.

दुसरा पैलू म्हणजे एकटेपणा! तुमच्यासारखी व्यवहारी, स्पष्ट बोलणारी माणसं खरंच कोणालाच नको असतात. तुमच्या काळात तर माणसांमाणसांत खरोखर जिव्हाळा, प्रेम, सन्मान असायचा. पण तेव्हाही व्यवहारीपणा आणि शिस्तीची वानवाच होती. पण त्यामुळे तुमची एकटेपणाची जाणीव प्रखर होती. आणि देवदयेने,  तुम्हाला त्याच्याशी फार समझोता करावा लागला नाही. अनेकदा आपल्याला खूप काही वाटत असतं, पण आपलाच खंबीरपणा कमी पडतो, किंवा परिस्थिती वाकायला लावतेच. तत्व, आवडी, शिस्त जपताच येते असं नाही. पण तुम्ही जोपासलीत. तुम्हाला जोपासता आली. मग प्रसंगी तो आडमुठेपणा झाला असेल, हट्टीपणा झाला असेल, पण तडजोड न केल्यामुळे, आपण एकट्या पडत जाऊ हे पूर्णपणे ठाऊक असूनही तुम्ही तडजोड केली नाहीत. इतकी आंतरिक ताकद तुमच्यात होती. तुम्हाला मिठी मारावीशी वाटते, ती यासाठी.

(रॉयल्टी, मानधन, योग्य ते श्रेय यासाठी तुम्ही चिवट लढा दिलात. अनेक मनस्ताप सहन केलेत. पण खरं सांगू, तुम्ही आत्ताच्या व्हॉट्सॅपीय जमान्यात नाही आहात, हेच बरं आहे. इथे पुलंच्या नावाने जे काही खरं खोटं पुढे ढकललं जातं ते पाहून तुमची प्रचंड चिडचिड झाली असती. पण, कदाचित तुम्ही असतात, तर या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी काहीतरी नक्की केलं असतंत आणि मग मीही तुमच्या त्या चळवळीत सहभागी झाले असते :) )

अजून खूप लिहावंसं वाटत आहे, पण शब्द मला साथ देत नाहीयेत. एकाच वेळी खूप काही सांगावंसं वाटत आहे, पण संकोचदेखील वाटत आहे. योग्य शब्द शोधताना, बरंच काही आठवून गहिवरायला होत आहे. एक मात्र लिहिते, सुनीताबाई, तुम्ही “तुम्ही” होतात, म्हणून खूप जणींना बळ मिळाले. तुम्ही “तुम्ही” आहात म्हणून प्रेम, समर्पण, पारदर्शकता यांचे अर्थ समजले. तुम्ही “तुम्ही” होतात, म्हणूनच तुम्ही “प्रिय” आहात. तुमच्या पुस्तकांतून, चित्रफितीतून तुम्ही कायम सोबत कराल हा दिलासा आनंददायी आहे. Love you and miss you dear Sunitabai. 

 

तुमची नम्र,

पूनम  

0 comments: