April 7, 2022

धूळपाटी

 

शांता शेळके लिखित हा ललितलेख संग्रह अनेकांचा ऑलरेडी वाचूनही झाला असेल. हे शांताबाईंचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या निमित्ताने हा संग्रह माझ्याकडून वाचून झाला... आणि मी शांताबाईंच्या साध्या शैलीच्या परत एकदा प्रेमात पडले! J त्यांची असंख्य गीतं लहानपणापासून ऐकत आले आहेच, पुढे त्यापैकी काही गाणी मुद्दामून ’डायसेक्ट’ करून त्यांचा रसास्वादही घेतलाय. अक्षरश: कोणत्याही जॉनरच्या गाण्यावर शांता शेळके हे नाव ’गीतकार’ म्हणून पाहिलं, ऐकलं तरी आता आश्चर्य वाटत नाही, इतकं विस्तृत काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी केलेला “चौघीजणी”चा अनुवादही नुकताच परत वाचला. पण “धूळपाटी”मधून त्या स्वत:चीच जी ओळख करून देतात, ती त्यांची पद्धत, ती शैली इतकी अकृत्रिम, इतकी सुंदर आहे की त्यांच्याबद्दल प्रेमच वाटायला लागतं! (या प्रेमाला आणखी एक पर्सनल कारण आहे. डोक्यावरून साडीचा पदर, कुंकू आणि चष्मा आणि चेहऱ्यावर गांभीर्य असंच शांताबाईंचं रूप मी कायम पाहिलं आहे. त्यांना पाहिलं की आजीची आठवण येते.)

पुस्तकाची सुरूवात त्यांच्या लहानपणापासून होते. खेड, म्हणजे आजचं राजगुरूनगर हे त्यांचं आजोळ. वय वर्ष नऊ. बरोबर आणखी तीन धाकटी भावंडं आणि पाचवं मूल पोटात असलेली गरोदर, विधवा आई आजोळी पोचतात या आठवणीबरोबर पुस्तक सुरू होतं आणि हे वाचल्यावरच आत काहीतरी हलतं... आणि मग झपाटल्यासारखं आपण वाचतच जातो. पुस्तकात विषयानुरूप प्रकरणं येतात. गावाची, माणसांची अनेक वर्णनं, मधूनमधून स्वत:च्या स्वभावाबद्दल, सवयींबद्दल, आठवणींबद्दल सांगणं... परिस्थितीचा परिणाम कसाकसा होत गेला त्याचं आज रोजी केलेलं चिंतन... आसपासचे लोक, गोतावळा, जातनिहाय कामं, आईबद्दलची माया, स्वत:चं शिक्षण, कविता लेखन, लेख आणि कथासंग्रह, प्राध्यापकी आणि गीतलेखन... जपमाळेतले मणी जसे एकामागून एक न अडखळता, अव्याहत येतात, तसं शांताबाईंचं सांगणं विनाअडथळा, विनागचके एका सहज लयीत येतं आणि एक वाचक म्हणून आपण शब्दश: गुंगून जातो. त्या वर्णनाची एक धुंदीच चढते... मॅटर ऑफ फॅक्ट थेट शैली, थोड्या जुन्या वळणाची मराठी भाषा आणि शब्दांमध्ये तो काळ जिवंत करायचं सामर्थ्य... कमाल!

त्यांची आई, मावशी, आजी या सतत ओव्या, गाणी, कविता म्हणत... त्यांचे संस्कार नकळत त्यांच्यावर कसे होत गेले, त्याचा गीतलेखनात पुढे कसा उपयोग होत गेला, १९३० ते १९४४ सालच्या पुणे शहराचं वर्णन, एस पी कॉलेजमधले त्यांचे झपाटलेले कवितेचे दिवस, अनुवाद पर्व आणि गीतलेखनाचा त्यांचा प्रवास ही पुस्तकातली वर्णनं मला सगळ्यात जास्त आवडली. आणि त्यातही आवडला त्यांचा प्रांजळपणा! केवढं कर्तृत्व गाजवलेली, केवढं मोठं काम केलेली ही बाई, अगदी साधेपणाने ’मी अनुवाद केलेल्या पुस्तकांपैकी ’चौघीजणी’चा अनुवाद सगळ्यात चांगला उतरला आहे असं मला वाटतं’, असं म्हणते तेव्हा त्यात मोठेपणाचा दर्पही येत नाही, हे विशेष. ’हो, माझ्या हातून काही चांगलं काम झालं आहे’ असं म्हणायला खरा कलाकार कधीच धजावत नाही, कारण तो सतत स्वत:बद्दल आशंकित असतो. पण हे मान्य करण्या इतका humbleness शांताबाईंमध्येच आहे! आणि इतक्याच मोकळेपणाने न जमलेल्या लेखनाबद्दल, सुरूवातीच्या अर्ध्याकच्च्या कवितांबद्दल, स्वत:च्या अपयशाबद्दलही त्यांनी कबूली दिलेली आहे. सांगा, हे पुस्तक न आवडणं शक्य आहे का? :-)

’हे आत्मचरित्रात्मक लेखन नाही’, असं शांताबाईंनी प्रस्तावनेत स्पष्टपणे लिहिलं आहे. पण या स्मरणरंजनातून त्या त्या वेळेचा काळ उभा राहतो, त्यामुळे त्याला एक ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे, असंही त्यांनी लिहिलं आहे. आणि हे किती खरं आहे! सुमारे शंभर वर्षांपूर्वीचं पुण्याचं वर्णन वाचून मी इतकी हरखले! इतका अस्सल दस्तावेज नाहीतर कुठे मिळाला असता? :-)

हे पुस्तक आत्मचरित्र नाही, ते एक बरंच आहे. कारण त्यात मग वैयक्तिक आयुष्याबद्दलदेखील सांगणं अनिवार्य होतं. ते आयुष्य जस्टिफाय करायचाही मग आपोआपच प्रयत्न होतो. मी कामानिमित्त अनेक कलाकारांना थोडं जवळून पाहिलं आहे. ’आपण फक्त कलाकारावर त्याच्या कलेपुरतं प्रेम करावं, का एक माणूस म्हणून तो कसा आहे यावर आपलं प्रेम ठरवावं?’ याचं स्पष्ट उत्तर मला अजूनही सापडलेलं नाहीये. पण “धूळपाटी”मुळे मला शांताबाई जेवढ्या कळल्या, जेवढं त्यांनी त्यांच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे, तेवढं मला नक्की पुरेसं आहे. त्यांची गाणी, त्यांच्या कविता आणि त्यांची पुस्तकं यातूनही मला पुष्कळ शांताबाई मिळतात. तृप्त व्हावं तेवढं त्या देतातच.

तर, “धूळपाटी” वाचलं नसेल, तर एकदा तरी नक्की वाचा. आणि वाचलं असेल, तर परत एकदा वाचा. Its worth it, no? :-)

0 comments: