March 25, 2022

मानसिक आजारांवरची तीन पुस्तकं

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांची ही खालील तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. वास्तविक, ही तीनही पुस्तकं १९८०च्या दशकात लिहिली गेली होती आणि ती प्रचंड लोकप्रियदेखील होती. पण आता, एकविसाव्या शतकात, याच पुस्तकातला मजकूर reprise करणं, त्यात नवीन भर घालणं आवश्यक झालं होतं. तर या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांतल्या नवीन मजकुराच्या लेखनाचं काम डॉक्टरांबरोबर मी केलं आहे, म्हणून ही पोस्ट 🙂 याचबरोबर, ’भयगंड’ आणि ’निद्रानाश’ या दोन मानसिक त्रासांवरही पुस्तकं लवकरच येणार आहेत. या सगळ्या पुस्तकांसाठी मी एक छोटंसं मनोगत लिहिलं होतं, ते शेअर करत आहे-

---
एकविसाव्या शतकात मानसिक आजार आणि मानसोपचार यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे. शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजार होतात आणि उपचारांमुळे ते बरेही होऊ शकतात, याबद्दल समाज पुरेसा सजग झालेला आहे. पण या शतकात तंत्रज्ञानामध्ये क्रांतीकारी म्हणावे असे बदल झाले. इंटरनेट आणि मोबाईल फोन सामान्यांच्या आवाक्यात आले. त्यांचा परिणाम थेट मनुष्याच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. नवनवीन मानसिक व्याधींनी अधिकाधिक लोक ग्रस्त होत आहेत. त्यामागचं नेमकं कारण आणि त्यावरचे आधुनिक उपचार यांबद्दल या पुस्तकात ज्येष्ठ आणि अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे. 
 



 
 
डॉ. बर्वेंबरोबर पुस्तकाकरता संवादक म्हणून काम करणं या फार आनंददायी अनुभव होता. समृद्ध अनुभव, सजग वैद्यकीय दृष्टीकोन आणि उत्तम विनोदबुद्धी यांचं अप्रतिम मिश्रण डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांनी माझ्याशी मोकळेपणानं संवाद साधला, सर्व प्रकारचं सहकार्य केलं. आमचे संवाद हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यात अनेक विषयांवर वेळोवेळी उपयुक्त चर्चा होत गेल्या, ज्यांनी माझ्या ज्ञानात भर पडली.
जुन्या आणि नवीन वाचकांनाही या पुस्तकातून मानसिक विकारांबद्दल आणि त्यांवरच्या उपचारांबद्दल नव्याने माहिती होईल. नजीकच्या काळात एक समाज म्हणून आपण मानसिकरित्या अधिकाधिक सुदृढ आणि प्रगल्भ होऊ अशी आशा वाटते.
-पूनम छत्रे
---

0 comments: