March 3, 2022

ते आणि आम्ही

 महत्त्त्वाची काही कामं उरकून आम्ही दोघं घरी जाण्यासाठी लिफ्टपाशी आलो, तर “ते”ही लिफ्टचीच वाट पहात उभे होते. दोघेही. शेजारीशेजारी उभं राहून. नेहेमीप्रमाणेच. आमची चाहूल लागताच त्या वळल्या आणि आमच्यावर नजर पडताच त्यांच्या चेहऱ्यावर एक आश्चर्ययुक्त हास्य पसरलं. मी आपली औपचारिक हसले. आम्हा दोघींचेही रिस्पेक्टिव्ह ’मिस्टर’ या सगळ्याच्या पलीकडचेच होते. नेहेमीप्रमाणे.

लिफ्ट आली. आम्ही चौघेही आत शिरलो. लिफ्टमध्ये सन्नाटा आणि अस्वस्थता अगदी जाणवत होती. आमचा मजला आधी आला. बाहेर पडताना त्या म्हणाल्या, “कित्ती दिवसांनी दोघे भेटलात (?!). परत भेटूया. वॉकला जाऊया सगळे एकदा.”मीही तोंडभरून “होऽऽऽ“ म्हणाले, पण क्रोधाने माझा ताबा घेतला होता... 😡

आत आल्या आल्या मी नवऱ्याला विचारलं, “काकू काय म्हणाल्या त्याचा अर्थ समजला ना? कसं काय लोक इतकं लोडेड बोलतात काही कळत नाही मला. हे दोघे सकाळी दुधाची पिशवी आणण्यापासून ते सिनेमाला जाण्यापर्यंत कायम सगळीकडे एकत्र असतात. कधीही पहावं, बाहुलाबाहुलीसारखं गोड मंद हसत जिथे तिथे एकत्र! पण बाकीच्यांना कामं असतात. सतत डोक्याला डोकं लावून, हातात हात घालून बसलेले नसतात लोक त्यांच्यासारखे. म्हणे कित्ती दिवसांनी दोघे भेटलात! कळतात बरं बोलणी. तुलाही कळलं ना?”

यावर नवरा फक्त म्हणाला,  ’अं?”

तीळपापड म्हणजे तो काही असतो ना तो झाला माझा! किती ज्वलंत, धगधगत्या विषयाबद्दल, पोटतिडिकेने बोलत होते मी आणि याला काही गंधवार्ताही नाही!!! कमाल आहे बाबा 😕

“अरे, काकू काय म्हणाल्या? दोघे दिसत नाही तुम्ही एकत्र कधीच. ते कसे सतत एकत्र असतात ना, तसे. आपलं नेहेमी एकला चलो रे. माझी मी बाहेर पडते, तुझा तू. फार क्वचित आपण एकत्र बाहेर जातो. ते लोकांच्या नजरेला दिसतं अरे. शंका येत असेल त्यांना, आपलं पटतं की नाही? वॉकला सुद्धा तुझा तू जातेस, माझी मी. फळं, भाजी, खाऊ मी आणते. तू शक्यतो बाहेर जातच नाहीस, फक्त मित्र भेटणार असतील तरच. आज बॅंकेबिंकेत गेलो तसे, किंवा लग्नबिग्न असेल तर एकत्र दिसतो आपण. कसं वाटत असेल लोकांना? एका घरात राहून स्वतंत्र राहतात. नवरा बायको आहेत की नाहीत? संसार करतात की नाही? मग असे टोमणे ऐकायला मिळतात... काही कळत नाही तुला!” राग जाऊन मला ऑलमोस्ट रडायलाच येणार होतं! 😢

“त्या काकू कशाबशा दोन वाक्य बोलल्या. त्याचा इतका भला मोठा अर्थ होता??? आयला, कमाले!” 😶

बाहेर टोमणे कमी मिळतात, म्हणून उरलेला डेफिसिट घरातच पूर्ण केला जातो आमच्या!

उत्तरादाखल मी फक्त कृद्ध नजरेनं पाहिलं त्याच्याकडे.

“बर मग काय म्हणणं आहे तुझं? आपण एकत्र आहोत हे लोकांना दाखवण्यासठी मी येऊ का तुझ्याबरोबर सगळीकडे? हातात हात घालून रोज फिरायला जाऊया का?”

सिनेमात दाखवतात तशी दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळायला लागली... भाजी आणायला आम्ही जोडीनं गेलो आहोत, त्याने हसऱ्या चेहऱ्याने शेपू, कारली आणि मशरूम घेतले... माझा चेहरा पडत गेलाय... आम्ही खाऊ आणायला गेलोय, त्याने काही विचार न करता एकदम ५०० रुपयांचा टोटल रॅन्डम खाऊ घेतलाय... माझा चेहरा ’तोंड दाबून बुक्क्याचा मार’ टाईप झालाय... आम्ही माझ्यासाठी खरेदी करायला तुळशीबागेत गेलोय, मला न आवडलेले ड्रेसच त्याला बरोब्बर आवडत आहेत... प्रेम सिद्ध करण्यासाठी चेहरा कसनुसा करून मी ते घेत आहे... तो मित्रांबरोबर मिसळ खायला गेलाय, बरोबर अर्थात मी आहेच... सगळे ऑकवर्ड झालेत... तो ऑफिसच्या कॉलवर आहे, मी भक्तीभावाने त्याच्या शेजारीच त्याचं काम बघत बसले आहे, तो वैतागलाय... तो सलूनमध्ये गेलाय... आमच्यात ठरल्याप्रमाणे मलाही मन घट्ट करून आणि डोळे मिटून आत जावंच लागणारे, पण मालक आत जाऊ देत नाहीये... (म्हणून मी हुश्श करतेय!)...

हे सगळी दृश्य माझ्या चेहऱ्यावरही दिसली त्याला बहुतेक. खाडकन मी भानावर आल्याबरोब्बर तो म्हणाला, “नको ना?”

मी ताबडतोब मान हलवली. “नको. नकोच.”

“पण काकूंना काय वाटेल? यांचं जमत नाही बहुतेक... त्याचं काय?” 😛     

“जेवढं जमतंय तेवढचं पुरेसं आहे बाबा! त्यांना काय समजायचं ते समजूदेत.”

“नक्की ना? मग जाऊ का मी खाली? पक्या आलाय. का येत आहेस तू बरोबर?”

“येऊ का?” मी खोचकपणे विचारलं

“ओके, बाऽऽऽय...”तो विद्युतवेगानं की काय, गेला. एकटाच. 🏃🏃

***

0 comments: