February 11, 2022

मोठेपणाचं जू ...

 माझ्या सासऱ्यांच्या सगळ्यात धाकट्या काकांचं निधन झालं, तेव्हा ते दु:खाने म्हणाले होते, "आता मला नमस्कार करायलाच कोणी उरलं नाही..." वास्तविक, तेव्हा काका वय वर्ष ऐंशीच्या घरात होते आणि सासरे सत्तरीच्या. तसे वयाने दोघेही ज्येष्ठ. तरीही, ज्यांच्यापुढे वाकावं, आशीर्वाद घ्यावा, पाठीवरून हात फिरवून घ्यावा असं कोणीच नाही ही भावना किती एकटेपण आणू शकते, याची चरचरीत जाणीव मला त्यांच्या या एका उद्गारामुळे झाली. 

 जगाच्या मानाने आपण वयाने मोठे असलो, तरी आपल्यापेक्षाही कोणीतरी मोठं आहे ही भावना किती ऊबदार आहे! संसाराचं सगळंच ओझं आपल्या एकट्यावर नाही, आपण कुठे अडलो, अडखळलो, तर ज्यांच्यापाशी नि:संकोचपणे जावं, लहान व्हावं, न लाजता अपयश कबूल करावं असं कोणीतरी आहे is so reassuring. केवळ वय जास्त आहे, म्हणून लोक सल्ला मागतात, कामातून आलेल्या अनुभवामुळे मार्गदर्शनाची अपेक्षा करतात. पण सल्ला देताना काही चुकलं तर? अनुभव तोकडा पडला तर? वागताना अजूनही काही चूक झाली, तर त्या घेऊन कोणाकडे जायचं? हां- आहे कोणीतरी! त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा अधिक आहे. त्यांची समजूत अधिक आहे. ते कदाचित रागावतीलही किंवा सुचवतील काही मार्ग, नाहीतर साध्या बोलण्यातूनच नवीन काही शिकवतील, दिशा दाखवतील- मनाची समजूत घालणारी ही भावना किती धीर देणारी आहे!

अनेकदा ज्येष्ठांशी आपलं जमत नाही, ते तर्कट वाटतात, हेकट वाटतात किंवा जुनाटही. पण त्यांच्या अस्तित्वाचा केवढा आधार असतो ते अनेकदा comprehend करता येत नाही. आणि मग ’शिशिर ऋतूच्या पुनरागमे, एकेक पान गळावया’ प्रमाणे काळाचा अपरिहार्य घाला एकेक ज्येष्ठावर पडत जातो. आपला जीव घाबरा होतो, मृत्यूच्या चाहूलीने नाही; पण एकटेपणामुळे. आपलं आयुष्य, आपली मनोभूमिका यांच्याशी समरस होणारं कोणीच जेव्हा उरत नाही, जेव्हा आपल्याला ’लहान’ समजणारं कोणीच नसतं, तेव्हा खऱ्या अर्थानं वय केवढं वाढतं! तेव्हा खरं बालपण संपतं.

नुकत्याच लताबाई गेल्या, त्या आधी सिंधूताई, त्या आधी बाबासाहेब पुरंदरे... आपल्याला आवडणाऱ्या अशा अनेक, जवळच्या, लांबच्या व्यक्ती सोडून जातात, तेव्हा जीव हळहळतो तो त्यांच्या नसण्याच्या वास्तवाने. टाळता न येणारं हे वास्तव स्वीकारायची अपरिहार्यता हतबल करते. मग उरतात केवळ काही आठवणी... कडू, गोड, हसवणाऱ्या, व्याकूळ करणाऱ्या, आणखी काही आठवणींशी जोडलेल्या. त्याच आठवत आठवत मग नकळत ’मोठं असल्याचं’ जू मानेवर चढवून घ्यायचं आणि काळाने आखलेला रस्ता नांगरत बसायचं... बस्स. 

 

***

 

0 comments: