February 1, 2022

आपकी नजरों ने समझा...

ज्याप्रमाणे श्लोक, प्रार्थना ऐकत ऐकत आपण मोठे होतो, त्याचप्रमाणे काही गाणी ऐकत ऐकत आपण मोठे होतो. हे गाणं त्या पैकीच एक. माझ्या लहानपणापासून मी हे गाणं ऐकते आहे, आणि कोणताही प्रयत्न न करता, केवळ ऐकून ते मला तोंडपाठही झालेलं आहे. मी लहान असताना विविधभारतीवर ’भूले बिसरे गीत’, ’मधुमालती’ किंवा ’जयमाला’वर दर तीन-चार दिवसांनी, नाहीतर चित्रहार किंवा छायागीतमध्ये एकाडएक आठवड्यात हे गाणं लागायचंच. लताबाईंचा तलम आवाज, मदन मोहन यांचं सुरेख संगीत, ब्लॅन्क ऍन्ड व्हाईटची जादू... ’क्लासिक’ समजलं जाणारं हे गाणं होतं. त्याच्या शब्दांकडे लक्ष द्यावं असं वय तेव्हा नव्हतं. ते लक्ष गेलं अचानकच, वयाच्या विशीत. शेकडो वेळा ऐकलेले शब्द-

आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे

दिल की ए धडकन ठहर जा मिल गयी मंझिल मुझे...

आणि तोंडात खडा यावा असं झालं! आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे- म्हणजे? प्यार के "काबिल" मुझे??? काबिल??? what do you mean? मला काबिल समजणारा तू कोण? आणि मी तुझ्या प्रेमाच्या लायकीची आहे असं तू समजलास, म्हणून मला माझी मंझिल मिळाली? मी धन्य झाले?? oh come on! काय nonsense आहे हा? तेव्हा डोकं लगेच फिरायचं. स्वत:च्या अस्तित्वाची ओळख व्हायला लागली होती, माझी मी स्वतंत्र आहे, मला कोणाची गरज नाही- अशा कल्पना डोक्यात असायच्या. अर्थातच हे असे शब्द ऐकून डोक्यात तिडिक गेली. त्या क्षणापासून माझं अत्यंत नावडतं गाणं झालं ते.

कडव्यांचे शब्दही असेच आहेत. ’जी हमे मंजूर है आपका ये फैसला, कह रही है हर नजर बंदा परवर शुक्रिया...’. ’पड गयी दिल पर मेरे, आपकी परछाईयां, हर तरफ बजने लगी सैकडो शहनाईयां...’ तू माझा उद्धार केलास, माझ्यावर प्रेम केलंस, तुझे उपकार झाले, तुझी उतराई कशी होऊ वगैरे वगैरे वगैरे. अरे प्रेम आहे ना, का दान? प्रेम दोघांनी एकमेकांवर करायचं असतं ना? मुळात कोणी कोणाला प्रेमाच्या लायकीचं कसं समजू शकतं? ही लायकी ठरवणारा कोण हा नरपुंगव? किती regressive, over the top narcissistic, anti feminist आहे हे? कोणालाच खटकलं का नाहीये हे? दर वेळी गाणं ऐकायला आलं की माझा संताप संताप होत होता. एकीकडे माझं शिक्षण-करियर-प्रेम-लग्न-संसार सुरू होतं आणि त्याच वेळी हे गाणंही अव्याहत सुरू होतं.

त्या वेळचे माझे झगडे वेगळे होते. त्यात या ’धन्य होण्या’ला वगैरे स्थानच नव्हतं. सर्वप्रथम शिक्षण पूर्ण करायचं होतं, मग नोकरी मिळवायची होती, करिअर करायचं होतं, उत्तम काम करून स्वत:चं स्थान पटकवायचं होतं. चांगली नोकरी मिळणं, चांगलं काम मिळणं, चांगले सहकारी, वरिष्ठ मिळणं यात पदोपदी कष्ट असतात. काहीचं नशीब असतं चांगलं, पण बहुतांश सगळ्यांना ते करावे लागतात. मीही रीतसर केले. हे चालू असताना parallely प्रेमातही पडले, लग्न केलं, मुलगा झाला. मग नोकरीच्या आव्हानात संसार, सासर, रुसवेफुगवे, मानापमान, मजा, धमाल याही कसरती आल्या. एक मात्र खरं, की आपली लायकी, आपलं स्थान सगळीकडेच प्रूव्ह करावं लागलं. चुकूनही कोणी, कुठे, कधी मेहेरबान झालं नाही आणि त्यामुळे ’मी धन्य झाले’ असं म्हणायची कधी वेळ आली नाही. Meanwhile, रेडिओ, टीव्हीवर गाणं हे चालूच होतं- कोई तूफ़ानों से कहदो मिल गया साहिल मुझे, आपकी नजरों ने समझा...

असं करत करत वयाच्या चाळिशीत प्रवेश केला. आता पुष्कळसे संघर्ष संपले होते, किंवा धार कमी झाली होती. समज, दृष्टी व्यापक झाली होती. आपल्याला ’न’ समजणाऱ्याही खूप गोष्टी आहेत जगात याचंही आकलन झालं होतं :) आता सतत छळणाऱ्या या गाण्याला मीच भेटायला गेले. ’हंस के अपनी जिंदगी में कर लिया शामिल मुझे’ असे शब्द नायिकेच्या तोंडी का आले असतील? कोणी लिहिलंय हे? का लिहिलंय? मग उत्तरं मिळाली- "अनपढ" सिनेमातलं हे गाणं. राजा मेहदी अली खान यांचे शब्द, साल १९६२. बहुतेक, प्रसंगावर आधारित गाणी गीतकाराकडून लिहून असावीत. नायिका अशिक्षित आहे, पण तिचं लग्न अत्यंत विद्वान, हुशार अशा नायकाशी ठरतं. साहजिकच, improbable वाटावं असं हे लग्न ठरल्यावर नायिका त्या काळानुसार ’मोहरते’, आपल्या नशिबावर तिचा विश्वासच बसत नाही, होणाऱ्या नवऱ्यापेक्षा सर्वार्थाने कमी असूनही, त्याने तिचा ’स्वीकार केला’ म्हणून तिला धन्य धन्य वाटतं! अशी ती सिच्युएशन. आता हे सगळं समजून मग मी पुन्हा गाणं ऐकलं, तर ते इतकं खटकलं नाही :) 


 

पण आता अगदी objectively विचार केला, तो काळ, ती गोष्ट, तो प्रसंग सगळं सगळं factorize केलं, तरीही गाण्याचे शब्द मला तरी पूर्णपणे पचत नाहीत, अजूनही! :) प्रेम मीही केलं आहे, करते आहे. प्रेमाचे अनेक आविष्कार पाहिले आहेत, अनुभवले आहेत. त्याग, समर्पण, एकमेकांत विरघळून जाणं, एकमेकांसाठी काहीही करणं, ओढ, आकर्षण सगळं काही पटतं. प्रेम करावंच. प्रेम व्हावं. फार सुंदर भावना असते ती, no doubt. पण तरीही, कोणालातरी आपण हवेहवेसे वाटतो यावर आपलं अस्तित्वच अवलंबून असावं, आपण कोणालातरी हवेहवेसे वाटतो यावर आपली self worth ठरवावी हे मला कविकल्पनेतही पटत नाही बाबा! कदाचित माझ्यात इतका भाबडेपणा नाही हा माझा दोष असेल. कदाचित मी फारच बुद्धीवादी असेन. कदाचित माझ्यायात काही दोष असेल. आधी सांगोपांग विचार न करता, केवळ शब्द ऐकून मी हे गाणं नाकारलं होतं. आता नीट विचार केला, तरीही या गाण्याशी एकरूप होता होत नाही, क्या करे! :)

एक मोठा फरक मात्र आहे. अजूनही हे गाणं कानावर पडतं, पण आता त्याचा त्रास होत नाही. I have made my peace with it.

4 comments:

इंद्रधनु said...

>>I have made my peace with it.
हे वाक्य फार व्यापक आहे, आवडलं.

Poonam Chhatre said...

Thanks Indradhanu :)

Satish said...

asach kahis rajanigandha ful tumhare ganyat aahe...

अधिकार ये जब से साजन का
हर धड़कन पर माना मैंने

मैं जबसे उनके साथ बँधी
ये भेद तभी जाना मैंने
कितना सुख है बंधन में

poonam said...

सतीशजी, हो बरोबर. पण यात एक फरक ही आहे. सजन का अधिकार ’तिने स्वत:’ मान्य केला आहे, त्यामुळे बंधनात सुख आहे असं मानते ती.