September 3, 2021

होते कुरूप वेडे... भाग ३ (अंतिम)

मिया-बीबी राजी तो क्या करेगा काझी, असं म्हणतातच. इथे तर बीबी आधीपासूनच राझी होती, मियांही होता, त्यामुळे काझीचा प्रश्नच आला नाही. विदुलाचं लग्न ठरलं, नुसतं ठरलं नाही, तर खऱ्या अर्थाने एका बड्या, तरीही सुसंस्कृत घरात ठरलं. सगळेच अतिशय खूष होते.

पण, कोणाला कशाचं तर बोडकीला केसाचं अशातली गत झाली विदुलाची! इतका मोठा गड जिंकल्यावर तिला टेन्शन आलं लग्नाच्या फोटोंचं! तिच्या स्वत:च्याच लग्नाचे फोटो!!

“ताईऽऽऽ अगं शेजारी विक्रम उभे. माझे फोटो तर नेहेमीच बंडल येतात, मला माहिताय. लोक किती नावं ठेवतील गं, ’कसा विजोड जोडा आहे’ असंही म्हणतील, सासरचे लोक आडून टोमणे मारतील, ’असली कसली सून केली’ म्हणतील... मला फार भीती वाटतेय गं, मी काय करू?” तिने शेवटी ताईपाशी मन मोकळं केलं.

“तू ना इतकी बावळट आहेस की सांगता सोय नाही! मूर्ख कुठची. चक्क विक्रम गोखलेंनी तुला मागणी घातलीये आणि तुला फोटोंचं पडलंय!” ताईनं आधी माप काढलं, पण तिला एकदम भरून आलं. किती अनपेक्षित, किती मोठी घटना घडली होती. तिची छोटीशी बहिण बिचारी अगदी गांगरली होती.

ताईनं विदुलाचा चेहरा आपल्याकडे वळवला. “हे बघ, आता तरी हे ’मी दिसायला चांगली नाही’चं हे जे खूळ  डोक्यात घेतलं आहेस ते काढून टाक. चांगली गोजिरी आहेस तू. हसलीस की किती गोड दिसतेस! तुझा आणि विक्रमरावांचा जोडा अगदी छान दिसतो, कळलं? आणि अगं फोटोसाठी एक सोप्पी ट्रिक सांगते. लग्नात किनाई मुंडावळ्या लावलेल्या असतात, मोत्याच्या आणि वर फुलांच्याही. त्या लावल्यावर कोणाचाच चेहरा धड दिसत नाही. माझे फोटो नाही पाहिलेस का? ओळखायला तरी येतंय का त्यात आम्हीच आहोत का आणखी कोणी आहे ते? त्यामुळे चिंता सोड. तुझेच काय, राजबिंड्या विक्रमरावांचेही फोटो तसे ठीकठाकच येणारेत.” दोघींनाही हसू फुटलं. “आणि एक सांगते, नवऱ्यामुलीनं फोटोत सतत हसायचं तरी, नाहीतर मान खाली घालायची. तुला ज्यांची भीती आहे ना, ते लोकही म्हणतील, काय हसरी सून मिळालीये हो! नाही तर म्हणतील, किती लाजरीबुजरी सून मिळालेय गं बाऽऽई!” यावर दोघींनाही भरपूर हसू लोटलं.

***

विदुला-विक्रमचं लग्न छान पार पडलं. गोखले मंडळी तालेवार होती, पण समंजसही होती. विक्रमने विदुलाबद्दल सांगितल्यावर कोणताही त्रागा न करता किंवा नापसंती न दर्शवता त्यांनी सोयरिक जुळवली होती, तीही आनंदाने.

विदुलाचे सासू-सासरे दोघेही अतिशय कर्तबगार होते. आयुर्वेदाचार्यांचा कामाचा पसारा आणि व्याप खूप मोठा होता. कामाला घरात आणि बाहेरही भरपूर माणसं होती. त्यांच्यावर देखरेख ठेवायची जबाबदारी सासूबाईंची होती. चटचट निर्णय घेऊन ते तडीस नेण्यात त्यांचा हातखंडा होता. सासरे तर दिवस-रात्र रुग्ण, उपचार, अभ्यास, लेखन यातच व्यग्र असायचे. सासूबाई स्वभावाने काहीशा अबोल होत्या. अगदी मोजकं बोलायच्या, तेही शांतपणे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडायची. दिसायला त्या अतिशय सुंदर, गोऱ्यापान होत्या. त्या माहेरच्या इंदूरच्या जोशी, त्यामुळे वागण्या-बोलण्यात एक खानदानी अदब होती. त्यांच्याशी अघळपघळ बोलण्याची किंवा गप्पा मारायची कोणाची टाप नव्हती. पण त्या असल्या की आश्वस्तही वाटायचं.

विदुला सतत त्यांचं निरिक्षण करायची. त्या तिच्याशी कसं बोलतात, त्यांना तिच्याबद्दल काय वाटतं याचा अंदाज घ्यायचा चाळाच तिला लागला होता. ’विक्रम त्यांचा हुशार, कर्तबगार मुलगा, त्याची बायको म्हणून त्यांना सुंदर राजकन्याच आणायची असणार, पण मी पडले गळ्यात!’ तिची खातरीच होती की सासूबाईंनी नाईलाजानंच तिचा स्वीकार केला आहे. या शंकेला काहीही ठोस आधार नव्हता. सगळे विदुलाच्या न्यूनगंडाचे खेळ!   

पण एका प्रसंगानंतर विदुलाने स्वत:च्याच वेड्या मनाला चांगलंच कोसलं.

लग्न होऊन महिनाच झाला असेल. भर दुपारी साडेतीनच्या सुमारास दार वाजलं. सासू-सासरे दोघेही वामकुक्षी घेत होते. विदुला पुस्तक वाचत होती. तिनं दार उघडलं. दारात घामेघूम झालेले एक वयस्कर गृहस्थ उभे होते.

“आयुर्वेदाचार्य गोखलेंचं घर ना? आहेत का ते? मी आण्णा शिंत्रे. औरंगाबादहून आलोय.”

“आहेत ते. पण ते घरी रुग्ण तपासत नाहीत...”

“मी त्यासाठी नाही आलो... आत येऊन बोलू का?”

“हो हो, या ना...”

घाम पुसत ते आत आले, कोचावर बसले.

“त्यांचा मोठा मुलगा आहे ना लग्नाचा? माझी मुलगीही लग्नाची आहे. मी पत्रिका द्यायला आलोय तिची.”

विदुलाचा श्वास अडकला. ’झालं लग्न मुलाचं, जा तुम्ही’, असं सांगून त्यांना परस्पर कटवायचं, ’मीच त्याची बायको’ म्हणून पुढेपुढे करायचं का सासूबाईंना उठवायचं? आणि त्यांची मुलगी सुस्वरूप असेल तर? तर आयतंच स्थळ चालत आलं म्हणून परत विक्रमचं लग्न तिच्याशी करून देतील का हे... विचारानेच तिची दातखिळ बसली.   

इतक्यात सासूबाई बाहेर आल्या. त्यांना पाहून ते गृहस्थ उठले.

“नमस्कार, मी आण्णा शिंत्रे. औरंगाबादहून आलोय, शकुताई परांजपेंच्या वधू-वर सूचक मंडळात आपल्या मुलाचं स्थळ मिळालं. माझ्या मुलीची पत्रिका घेऊन आलोय मी. फोटोही आहे. वर्षा, माझी मुलगी दिसायला सुरेख आहे, हुशार आहे, बी.एस्सी झाली आहे, माझी फॅक्टरी आहे छोटी एक औरंगाबाद एमआयडीसीत. अनेकदा कामानिमित्त पुण्याला येतो मी म्हणून म्हणलं समक्षच पत्रिका द्यावी...” त्यांनी भराभर येण्याचं प्रयोजन सांगून टाकलं.

विदुलाची अपेक्षा होती की सासूबाई त्या शिंत्रेंना लगेच तिच्या आणि विक्रमच्या लग्नाबद्दल सांगतील आणि निरोप देतील. पण उलट त्या म्हणाल्या, “बसा ना. शांतपणे बोलूया. विदुला, सगुणाला पाणी आणायला सांग. चहा घ्याल ना? विदुला तू चहा घेऊनच ये.” त्यांनी सूत्र आपल्या हातात घेतली.

विदुलाचं डोकं सटकलं. ’सांगत का नाहीयेत या त्यांना आमच्या लग्नाबद्दल? उलट आदरातिथ्य काय चाललंय? मला का आत पाठवलं? माझी लाज वाटतेय का? फॅक्टरीवाले वडिल, सुंदर मुलगी... माहिती ऐकून भूल तर नाही न पडली? दुसरं लग्न करून देणारेत की काय विक्रमचं? तसं करण्याबद्दल कायदे आहेत, माहिताय ना यांना? मी कायदेशीर बायको आहे विक्रमची...’  नव्याकोऱ्या मंगळसुत्राशी चाळा करता करता तिच्या मनात काय काय येऊन गेलं! पण सगुणाने केलेला चहा घेऊन ती निमूटपणे बाहेर गेली.

“घ्या चहा. ऊन कितीही झालं, तरी वेळेला चहाच लागतो, नाही का? ओळख करून देते- ही आमची नवी सून विदुला, मोठ्या चिरंजिवांची पत्नी.”

शिंत्रे एकदम गडबडले. “अरेच्या! मला कल्पना नव्हती. मी आपला पत्रिका वगैरे बोलत बसलो...”

“अहो त्यात काय झालं? आम्हालाही मुलगी आहे, नाही म्हणलं तरी मुलीचं लग्न जमेपर्यंत आई-वडिलांना चैन पडत नाही. शकुताईंना खरं तर कळवलं होतं आम्ही, पण त्यांनी विक्रमची माहिती काढली नाही वाटतं अजून वहीतून. तुम्हाला मात्र हेलपाटा झाला.” त्या म्हणल्या.

“तुम्ही हे चहा-पाणी उगाच केलं... मी गेलो असतो लगेच...”, ते संकोचले.

“असं कसं! तुम्ही उन्हाचे आलात. हे एवढं तर करायलाच हवं.”

“तुम्हाला आणखी एक मुलगा आहे ना...त्याचं लग्न”, शिंत्रे माहिती घेऊनच आलेले होते!

“अहो, लहान आहे तो अजून, शिक्षण व्हायचंय अजून त्याचं.” किंचित हसून सासूबाई म्हणाल्या. “पण तुमची मुलगी छान आहे. मनासारखा जावई मिळेल तुम्हाला. पाहिजे तर फोटो-पत्रिका ठेवून जा, मी दोन ठिकाणी शब्द टाकू का?”

“तुम्हाला जमलं तर मेहेरबानी होईल...” ते उठलेच.

सासूबाई हलक्या आवाजात म्हणाल्या, “विदुला, त्यांना नमस्कार कर...”

ती तत्परेतेने त्यांच्या पाया पडली. “अखंड सौभाग्यवती भव. मुली, चांगलं सासर मिळालं तुला. सुखी रहा.”

विदुलाला मनातून स्वत:ची लाज वाटली. किती स्वार्थी, किती कोता विचार करत होती ती. दुसरं लग्न काय आणि काय काय! स्वत:च्या इन्सेक्युरिटीपायी भर दुपारी दारात आलेल्या माणसाला पाणीही विचारलं नव्हतं तिनं. त्या उलट सासूबाईंचं वागणं किती समजुतदार! त्यांना फाडकन उत्तर देऊन परत पाठवण्यापेक्षा, त्यांची आस्थेनं चौकशी करावी, त्यांचं काम होऊ शकत नाही याबद्दल आपणच दिलगिरी व्यक्त करावी, ते आपल्या घरातून बाहेर जाताना कटूता राहू नये यासाठी कसं बोलावं याचा वस्तूपाठच सासूबाईंनी दाखवून दिला होता विदुलाला. त्यांना इतका मान का होता याचं उत्तर तिला मिळालं होतं. आणि त्यांचे ते शब्द- ही आमची नवी सून! ’’आमची सून’ म्हणाल्या. त्यांनी स्वीकारलंय मला.’ विदुलाच्या मनातलं सगळं किल्मिष दूर झालं. तिचं हृदय आनंदाने उचंबळून आलं. सासूबाईंच्या जागी आई असती तर तिने त्यांना मिठीच मारली असती. पण तिनं अर्थातच तसं काही केलं नाही. उलट, पटकन मागे वळून त्यांनाही नमस्कार केला.  

 

*** 

विदुला दिसायला जशी साधीसुधी होती, तसंच तिचं वागणंही अगदी ’मध्यमवर्गीय’ आणि साधंच होतं. आणि गोखलेंचं राहणीमान पुष्कळच वेगळं होतं. घरात नोकरच तर इतके होते, आणि त्यातही नवलाची गोष्ट म्हणजे पुरुष गडी होते कामाला! हरीदादा चक्क स्वयंपाकी होते, सगुणा सर्व प्रकारच्या वरकामासाठी, धुणं-भांड्याला रखमा, केर-फरशी-बागकामासाठी बाबुल. शिवाय दादांचा एक पी.ए. होता, सुहास. तो सकाळी साडेसातपासून त्यांच्याबरोबर असायचा. दारात त्या काळीही दोन कार होत्या. एक दादा नियमित वापरायचे, दवाखान्यात जायला आणि एक घरच्या मंडळींकरता होती. त्याचा ड्रायव्हर होता- रवी. यांपैकी कोणालाही काम सांगायचं म्हणजे विदुलालाच अवघडल्यासारखं व्हायचं. ती आपापली कामं पटकन उरकून टाकायची. उठल्याबरोबर खोलीचा केर काढायची, सगळ्यांसाठी पहिला चहा करायची, स्वत:चं धुणं हाताबरोबर धुवून टाकायची... तिचं हे वागणं सगळ्यांनाच विचित्र वाटायचं. घरची गाडी असताना ती कॉलेजला टू व्हीलरने जायची हे तर कोणालाच आवडत नव्हतं. पण इतकं आरामी आयुष्य विदुलाला झेपणंच शक्य नव्हतं. या अर्थाने ती त्या घरात कायमच ’मिसफिट’ होती. ’मी या घरची सून शोभत नाही’ याचं दडपण तिला यायचं, वाईटही वाटायचं, पण नोकरांकडून काम करवून घेण्यासाठी तिची जीभच रेटायची नाही. उलट हरीदादांना वाटण करून दे, सगुणाबरोबर आपणही तांदूळ निवड, बाबुलकडून झाडांची माहिती करून घे हे तिला सोपं वाटायचं. सासूबाई तिला एरवी कशावरूनही टोकत नसत, पण तिचं हे नोकरांमध्ये मिसळणं मात्र त्यांना पसंत नव्हतं. पण विक्रमचा तिला मूक पाठिंबा होता. त्याच्या जिवावरच ती आपला मध्यमवर्गीयपणा रेटून नेत होती.

विश्वास आयुर्वेदिक डॉक्टर झाला, आणि लगेचच अश्विनीशी त्याचं लग्न झालं. तीही बी.ए.एम.एस होती. दादांची प्रॅक्टिस पुढे नेण्यासाठी दोन सक्षम हात आता घरातच होते. तिचं माहेरही इंदूरचंच. अश्विनी खऱ्या अर्थाने त्या घराला शोभणारी होती.  तिच्याकडे वागाय-बोलायची ’टॅक्ट’ होती, दिसायलाही ती ठसठशीत होती, अगदी सासूबाईंसारखीच. त्या दोघींचे सूर चटकन जुळले आणि विदुलानेच निश्वास सोडला. तिनं स्वत:वरच एक ’सूनपणा’चं ओझं ओढून घेतलं होतं, ते आता उतरलं.

कालचक्र फिरत राहिलं. प्रत्येकाचं विश्व विस्तारत होतं. कुटुंब म्हणून सगळे एकत्र होते, सगळ्यांत खूप जिव्हाळा, प्रेम होतं. मोठी सून म्हणून विदुलाला अश्विनीसकट सगळेच योग्य मान द्यायचे. एम.ए. पूर्ण करून ठरवल्याप्रमाणे तिनं एम.फिल.ही पूर्ण केलं. सेटची परिक्षा देऊन ती एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाली. काळाबरोबर तिच्यावर घरच्या काही जबाबदाऱ्या आल्या होत्या, त्या ती मन लावून पार पाडत होती. विक्रमचं करियरही त्याच्या मनासारखं सुरू होतं. पण त्याला फिरती असायची, तो अनेकदा एकटाच बदलीच्या गावी रहायचा. त्या वेळी मात्र विदुलाला एकाकी वाटायचं. तसं विश्वास-अश्विनीबरोबर तिचं मैत्रीचं नातं होतं. पण सगळे ’आयुर्वेद’वाले एका बाजूला आणि ती एका बाजूला असं आपोआपच व्हायचं. कोणी तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, किंवा मुद्दाम वेगळंही वागायचं नाही, पण ’वेव्हलेन्थ’चं अंतर राहायचंच. सगळ्यांत असूनही विदुलाला रितं रितं वाटायचं. ती मग गप्प व्हायची, कसकसले विचार करत बसायची.

मुलं झाल्यावर विदुलाचं आयुष्य थोडं सोपं झालं, तिची दोन आणि अश्विनीची दोन- चारही मुलांमध्ये ती मनापासून रमायची. मुलांना निरखणं हा तिचा आवडता छंद होता. त्यांना गोष्टी सांगायला, त्यांच्याबरोबर खेळायला, बाहेर न्यायला आणि शिस्त लावायलाही तिला आवडायचं. दोन्ही वेळी दिवस असताना मुलगा होईल का मुलगी ही चिंताच नव्हती तिला; चिंता ही होती, की बाळ दिसेल कसं? देवापाशी तिची एकच प्रार्थना होती- तिचा चेहरामोहरा असलेलं बाळ नको! आणि देवानं दोन्ही खेपेस तिचं ऐकलं. थोरला तर अगदी विक्रमसारखा होता, धाकट्याचं अजून कळत नव्हतं, पण तिच्यासारखा नक्की नव्हता.

देवानं तिच्यावर आणखी एक मेहेरबानी केली. प्रोफेसरबाईंना शोभेल असा चष्मा तिला पस्तिशीतच लागला. चष्मा लागला की सहसा स्त्रियांना वाईट वाटतं, उलट विदुलाच्या साध्या चेहऱ्याला चष्म्याचं छानसं कोंदण लाभलं. गोखलेंकडे फोटोची सतत वेळ यायची. माणसं जितकी जास्त, तितका गोतावळा मोठा. गोतावळा जितका मोठा, तितके समारंभ जास्त. आणि समारंभ असला की फोटो आलेच! साखरपुडे, लग्न, डोहाळजेवणं, बारशी, मुंजी, साठी, पंच्याहत्तरी, वाढदिवस... सतत चालू असायचे. कॉलेजात ती इकॉनॉमिक्सची प्रोफेसर होती. तिथे असंख्य उद्घाटनं, कार्यक्रम, व्याख्यानं, सेमिनार, कॉन्फरन्स यातही’फोटों’ना अनन्यसाधारण महत्त्व होतं. विद्यार्थ्यांच्या हातात सर्रास मोबाईल फोनही दिसायला लागले. विद्यार्थी धीटही झाले होते. एखादा कार्यक्रम झाला, की सरळ जवळ येऊन फोटो काढायचे. फोटोत ती कायम मागे उभी राहायची आणि ताईच्या सल्ल्याप्रमाणे तोंडभरून खोटं हसायची. पण चष्मा लागल्यापासून थेट कॅमेऱ्यात पाहिलं तरी फोटो ठीकठाक यायचे. खोटं हसायचीही गरज पडत नव्हती.

इतकं असूनही विदुलाला अजूनही कॅमेऱ्याची सवय होत नव्हती. ’चला, फोटो काढूया’ किंवा ’फोटो टाईम, से चीज’ वगैरे ऐकलं की मनात ’अरे देवा, नको!’ हीच भावना यायची; आणि ती फोटोतही उमटायचीच. वयाची पंचेचाळीस वर्ष झाली, तरीही.

***

तो ’वियर्ड’ फोटो हे एक निमित्त... विदुलाचं सगळं आयुष्यच तिच्या डोळ्यापुढून तरळून गेलं. 

नेहाचं लग्न ठरलं तेव्हा सगळ्या घरात आनंदाची लहर पसरली. सुनिताच्या आग्रहावरून सगळ्यांनीच नवीन साड्या, दागिने घेतले. साखरपुड्यासाठी प्रोफेशनल मेंदीवाली, मेक-अप आर्टिस्ट बोलावल्या गेल्या. विदुलाही सजली. पण शेवटी घात झालाच होता. या घराला, विक्रमला ती नाहीच शोभत यावर परत एकदा शिक्कामोर्तब झालं. आता तर तिच्या अंगाखांद्यावर खेळलेली मुलंही तिची थट्टा करायला लागली होती. तीच ती परिचित परकेपणाची भावना विदुलाचं मन भरून राहिली.

इतक्यात विक्रम स्वयंपाकघरात आला.

“जरा पाण्याचे दोन तांबे दे गं...”, असं म्हणता म्हणता त्याचं लक्ष विदुलाकडे गेलं.

“काय गं? चेहरा असा का दिसतोय तुझा?”

“काही नाही. माझे फोटो... मेक-अप केला तरी नाहीच आलेत चांगले...”, खट्टू आवाजात ती बोलली.

“आलेत की बरे. आत्ताच पाहिले मी...”

“’बरे’ काय हो विक्रम? त्च! तुम्ही सगळे किती छान दिसता, काहीही न करता, आणि मी...” तिला खूपच भरून आलं. रडं डोळ्यात मावेना.

“ओहो!” विक्रमने तिच्या खांड्याभोवती हात टाकला. “विदु, तुला किती वेळा सांगितलं असेल मी, इट डझन्ट मॅटर! तुला वाटतेस इतकी वाईट नाही दिसत तू. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. हे काये आं? रडणं वगैरे इतक्या छोट्या गोष्टीसाठी...”

“छोटी गोष्ट तुमच्यासाठी आहे, तुमच्यासारख्या सगळ्या सुंदर सुंदर लोकांसाठी...”

“लीव्ह इट. मी आधीही असंख्य वेळा सांगितलंय तुला, पण तुला काही ते पटत नाही. बर हे बघ, माझ्याकडून शेवटचा प्रयत्न. मला सांग, मी तुला एकदा तरी बोललो आहे का यावरून? कधी थट्टा केली आहे? कधी खिल्ली उडवली आहे? कमेन्ट केली आहे?”

विदुलाने मान हलवली. खरंच, विक्रमने कधीच तिचं ’दिसणं’ मनावर घेतलं नव्हतं.

“का- माहित आहे? कारण मला ते कधी जाणवतच नाही. मला तुझ्या चेहऱ्यात दिसते मॅच्युरिटी. तुझा चेहरा माझ्याशी बोलतो, इट्स सो ट्रास्न्परन्ट. तू सतत विचारमग्न असतेस. तुझा अभ्यास, लेक्चर्स, मुलांच्या ऍक्टिव्हिटीज, घरचं काम... सतत तू कोणता ना कोणता विचार करत असतेस आणि तो तुझ्या चेहऱ्यावर दिसतो मला. एव्हरीवन रिस्पेक्ट्स यू फॉर युअर ब्रेन्स. मुलं मोठी झाली, तरी त्यांच्या कित्येक अडचणी घेऊन तुझ्याकडेच येतात. घरचे तुझ्यावर अवलंबून आहेत, कारण जबाबदारी दिली की ती तू पार पाडणारच अशी त्यांनाही खातरी आहे. ते सोड, आपणही दोघं कित्येक विषयांवर बोलतो. तुला स्वत:चं एक ओपिनिअन आहे, तू वाचतेस, बहुश्रुत आहेस, इंटरनॅशनल इश्यूजबद्दलही तू चर्चा करू शकतेस. हे सगळं मॅटर करतं विदु. तू काय मेक-अप आणि साड्या आणि फोटो घेऊन बसली आहेस? सुंदर म्हणजे नेमकं काय, मला माहित नाही. पण माझ्यासाठी तू सुंदर आहेस. इजन्ट दॅट इनफ फॉर यू?”

विक्रमच्या बोलण्याने ती नेहेमीच विरघळायची. आत्ताही तेच झालं. तिच्या उतरलेल्या, म्लान चेहऱ्यावर बारिक हसू आलं एकदाचं. पण तरी...

“हां. आणि फोटोचंच घेऊन बसली असशील, तर हा बघ...” त्याने खिशातून त्याचा मोबाईल काढला. लॉक स्क्रीनवर तिचाच एक फोटो होता, नेहाच्याच साखरपुड्यातला. ती खुर्चीवर बसली होती. तिच्या मांडीवर एक ताट होतं ज्यात हार होते, आणि अंगठ्यांचे बॉक्स. नेहा-अथर्वने एकमेकांना अंगठ्या घालायच्या आधी पाचेक मिनिटं काढलेला फोटो असेल तो. तिचं पूर्ण लक्ष स्टेजवर होतं. नेहासाठी वाटणारा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मंद स्मित करत, एकटक ती नेहाकडे बघत होती. विसावलेली, तरी कोणत्याही क्षणी “मामी...” अशी हाक आली, की उठायच्या तयारीत अशी... सदैव तत्पर, नेहेमीप्रमाणेच.

फोटो खूप सुंदर आला होता. त्यात विदुलाचं सत्वच कॅप्चर झालं होतं. 

कसा आहे? मीच काढलाय मॅडम. आता हा फोटो सुंदर नसेल, तर मला खरंच माहित नाही सुंदर म्हणजे काय?”

“अय्या, खरंच छान आलाय की.” ती ऑलमोस्ट लाजली होती.

“थॅंक गॉड! तुला समजावून सांगण्याचा हा माझा शेवटचा अटेम्प्ट होता.”, तो जोरात हसला. “मी दोन तांबे घेऊन जातोय बाहेर, तूही ये ना, सगळ्यांच्यात. अशी एकटी नको थांबूस...”

तिच्या डोळ्यांत पाणी आलं. यावेळी, कृतज्ञतेचं. तो बाहेर जायला वळला, इतक्यात तिनं त्याला हाक मारली, “विक्रम...” त्यानं मागे वळून पाहिलं.

“थॅंक यू. सगळ्यासाठीच.” 

त्याचा हात धरून तीही बाहेर गेली, तिच्यासकट सुंदर, सुस्वरूप असलेल्या तिच्या कुटुंबात.

***     

समाप्त

0 comments: