September 2, 2021

होते कुरूप वेडे... भाग २

 

त्या दिवशी विदुला तिच्या दुचाकीवरून कॉलेजला निघाली होती. रस्त्यावर नेहेमीसारखीच गर्दी होती. इतक्यात एक दुचाकीस्वार तिला जवळपास चाटूनच पुढे गेला. तिचा तोलच जाणार होता, पण तिनं कसंबसं स्वत:ला सावरलं. ’कोण मूर्ख आहे हा?’ म्हणून तिनं रागानं बघितलं, तोवर त्या हीरोने त्याची बाईक तशीच वेडीवाकडी पुढे दामटवायचा प्रयत्न केला आणि आणखी एका बाईकवाल्याला जोरदार धडक दिली. मोठ्ठा आवाज झाला.  तो बाईकवाला रस्त्यावर पडला, थोडा फरपटतही गेला. विदुलाचा पारा एकदम चढला. हीरो पळून जाणार होता, इतक्यात ती जोरात ओरडली, ’ए थांब!’. विदुलाच्या आवाजामुळे लोकांचं लक्ष गेलं. दोन-चार जणांनी त्याला अडवलं, त्याची कॉलर धरून त्याला बाईकवरून खाली खेचलं आणि मागे आणलं. खाली पडलेल्या माणसाला बरंच लागलं होतं. त्याची पॅन्ट फाटली होती, डावा पाय गुढग्यापासून सोलला गेला होता. डाव्या हातालाही खरचटलं होतं. तो तसाच रस्त्यावर बसून होता, त्याला उठता येत नसावं.

“ओ, तुम्हाला काही डोकंबिकं आहे की नाही? अशी चालवतात का गाडी? मूर्ख! आणि पळून काय जात होतात? किती लागलंय यांना पाहिलं? उठताही येत नाहीये. फ्रॅक्चर वगैरे झालं असेल तर? यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला नको का??” विदुलाच्या सरबत्तीपुढे तो माणूस गपगारच झाला. लोकही तिला दुजोरा द्यायला लागले.

“नुसते काय उभे आहात? मदत करा त्यांना, उचला, हॉस्पिटलमध्ये चला घेऊन. आणि पैसे सगळे तुम्ही द्यायचे. समजलं का? का पोलिसांना बोलवू?”

खाली पडलेला माणूस उगाच ’इतकं काही नाहीये’ वगैरे म्हणू पाहत होता, पण विदुलाने त्याला अडवलं.

“तुम्ही आत्ता काही बोलू नका. चला रिक्षात बसा. ओ काका, यांच्याबरोबर याला घेऊन रिक्षातून पलीकडच्या निरामय क्लिनिकला जाता का? मी येते माझ्या गाडीवरून मागून.” विदुलाने पटापट चार्ज घेतला. लोकांनीही मदत गेली, दोन्ही गाड्या पार्क केल्या. विदुलाने त्यांच्या किल्ल्या आपल्या ताब्यात घेतल्या आणि ती निरामयला पोचली.

सुदैवाने त्या माणसाला फ्रॅक्चर वगैरे नव्हतं झालं. खूप मुका मार आणि जखमा मात्र होत्या. बाईकवाल्याने मुकाट्याने पैसे दिले. ’कितीही घाई असली तरी मोटारसायकल अशी चालवणार नाही’ अशी त्याने कबूली दिल्यावरच विदुलाने त्याला त्याच्या गाडीची किल्ली दिली. बरोबरची लोकंही ’बरी अद्दल घडवली, असंच पाहिजे’ वगैरे म्हणत पांगली.

“थॅंक्यू सो मच.”, तो जखमी माणूस म्हणाला.

 “अहो, त्यात थॅंक्यू काय? वाट्टेल तशा गाड्या चालवतात, मलाही धक्का दिला होता त्याने माहिते? अशांना सोडता कामा नये. बर, तुम्हाला बरं वाटतंय ना आता? कुठे राहता तुम्ही? चला, मी तुम्हाला घरी सोडायला येते.”

“अहो नको नको. तुम्ही कशाला? माझा भाऊ येईल ना. तुम्हाला घरचा नंबर देतो. त्याला फोन करून बोलवाल का प्लीज?”

“करते की. अं? तुमचं नाव काय?” हे विचारताना विदुला अंमळ लाजली. आता कुठे तिचं त्या माणसाकडे नीट लक्ष गेलं. तिच्यापेक्षा फार मोठा नव्हता तो. आणि दिसायला चांगलाच हॅन्डसम होता. त्याचे कुरळे केस तर सेम राज किरणसारखे होते... विदुलाचं चित्त विचलित का कायसं व्हायला लागलं.

“विक्रम... विक्रम गोखले...”

“अय्या!” ती अनवधानाने म्हणाली.

तोही हसला. “फक्त नाव सारखं आहे.”

विदुलाने हसू दाबलं. तिने भावाला फोन केला, त्याला यायला पंधरा-वीस मिनिटं लागणार होती. आता मात्र त्या दोघांमध्ये ’ऑकवर्ड सायलन्स’ पसरला. ’ माझ्याऐवजी एखाद्या पुरुषाने थांबायला हवं होतं का, मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलले का, काय वाटलं असेल त्यांना, विक्रम गोखले म्हणजे कसलं भारी ना, हे काय करत असतील’, विदुलाच्या डोक्यात रॅन्डम विचार येत होते. मघापासूनचा तिचा बोलण्याचा ओघ सुरू होता, त्याला एकदम ब्रेक लागला. विक्रम तसेही फार बोलके वाटत नव्हते. आणि आत्ता त्यांना दुखतही असावं. तरी त्यांनी तिचं नाव विचारलं, ती उगाच थांबली आहे, उलट तिनं कॉलेजला जावं असंही सुचवलं. पण ती थांबली. थोड्या वेळात त्यांचा भाऊही आलाच. त्यानेही विदुलाचे मनापासून आभार मानले. तिनं आठवणीने विक्रमच्या मोटारसायकलच्या किल्ल्याही त्याच्या हाती सोपवल्या. ते गेले आणि विदुलानं घड्याळ्याकडे पाहिलं. ’रूरल इकॉनॉमिक्सचं लेक्चर बुडलं’, ती मनात म्हणाली आणि कॉलेजला निघाली.

***

पार्किंग लॉटमध्ये गाडी लावून विदुला कॉलेजच्या दिशेने निघाली. लेक्चर, अभ्यास, परिक्षा असे नेहेमीचेच विचार डोक्यात होते. इतक्यात, कॉलेजच्च्या गेटपाशी विक्रम उभा आहे असा तिला भास झाला. एक सेकंद ती दचकलीच. ’काहीही काय बावळट!’ तिनं मान झटकली आणि ती परत चालायला लागली. पण तो विक्रमच होता. खराखुरा. तो तिच्याकडे पाहून हसला. विदुलाची धडधड वाढली. काहीच न समजून ती जागीच खिळून उभी राहिली. तो जवळ आला. परत हसला.

“विदुला... मला ओळखलं ना? मी विक्रम... त्या दिवशी ऍक्सिडेंट...”

ओळखलं ना???? गेले पंधरा दिवस त्याचाच चेहरा डोळ्यापुढे येत होता! विसरणं शक्य होतं का?

पण तिच्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही. हे खरं होतं का? का स्वप्न होतं? विदुलाचा स्टॅच्यू झाला होताअ.

“सॉरी, मी इथे असा आलोय, पण तुम्हाला कुठे भेटायचं, मला कळत नव्हतं. त्या दिवशी फक्त तुमच्या कॉलेजबद्दल बोलणं झालं आणि साधारण हीच वेळ होती, म्हणून चान्स घेतला...”

मला भेटायला आलाय हा? आई शप्पथ!! काऽऽऽऽ?

“हे बघा, मला थोडी घाई आहे, मला ऑफिसला पोचायचंय. मी तुम्हाला फक्त इतकं विचारायला आलो, की मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं, नाही, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही मला आज संध्याकाळी वैशालीत भेटाल का ६ ला? प्लीज?” त्याच्या स्वरात अजीजी होती.

तिनं मान कधी डोलावली हे तिला कळलंही नाही.

“थॅंक्स. मी पळतो. हो, येतंय मला पळता. मी एकदम ठीक आहे आता, थॅंक्स टू यू. भेटूया संध्याकाळी...”

तो आला, तो हसला, तो बोलला, तो गेला. विदुला नुसतीच दिग्मूढ उभी होती एका जागी.

***

लेक्चरमध्ये लक्ष लागणं शक्यच नव्हतं. ’नेमकं काय झालं हे आत्ता? एक अपघात आणि त्यातून अपघाती भेट झालेला एक तरुण. तो तरुण परत मला भेटायला येतो, मला! त्या दिवशी कॉलेजबद्दलचं बोलणं लक्षात ठेवून मुद्दाम इथेच येतो, महत्त्वाचं बोलायचंय म्हणतो... काय बोलायचं असेल? त्याला माझ्यात काय इन्टरेस्ट असेल? हां, बहुतेक कोणालातरी इकॉनॉमिक्स शिकवायचं असेल किंवा माझ्या थ्रू एखाद्या मुलीशी ओळख करून घ्यायची असेल...’ याच दोन शक्यता दिसत असल्यामुळे मग विदुला निर्धास्त झाली.

सहा वाजून पाच मिनिटांनी ती वैशालीपाशी पोचली तेव्हा विक्रम आणि विश्वासही दारातच उभे होते. विश्वासला पाहून तिला आणखीनच मोकळं वाटलं. ’बरोबर भाऊ आहे, म्हणजे बहुतेक त्याचंच काम असेल काहीतरी’ तिच्या मनात आलं, ती दोघांकडे पाहून हसली. ’हे विक्रम खरंच किती देखणे आहेत, उंच, गोरे, कुरळे केस... ऑफिसच्या साध्या कपड्यांतही किती छान दिसतायेत. बरं असतं बुवा चांगलं दिसणाऱ्या लोकांचं...’ तिच्या मनात येऊन गेलंच.

“थॅंक्स, आल्याबद्दल.” टेबलवर बसताबसता विक्रम म्हणाला.

“आणि त्या दिवशीसाठी परत एकदा, खरंच खूप थॅंक्स,” विश्वास म्हणाला.

ती मोठ्यानं हसली. “कार्यक्रमाची सुरूवातच आभार प्रदर्शनाने?”

“नाही, खरंच. त्या दिवशी तुम्ही त्या मोटारसायकलवाल्याला थांबवलंत, लोकांकडून मदत घेऊन मला हॉस्पिटलमध्ये नेलंत, त्या माणसाला अपघाताची जबाबदारी घ्यायला लावलीत, शेवटपर्यंत थांबलात... “

“छे! अहो, त्यात काय विशेष? त्या वेळी कोणीही तेच केलं असतं.”

“नाही. बिलिव्ह मी, हे असं सहसा पाहायला मिळत नाही, विशेषत: मुली इतकं धैर्य दाखवत नाहीत... घाबरला नाहीत तुम्ही.”

इतकं कौतुक! काय बोलावं ते विदुलाला कळेचना. विश्वास आला मदतीला.

“दादा, ऑर्डर करूया का? काय घ्याल तुम्ही? वडा सांबार? संकोच करू नका. दादाची ट्रीट आहे. भरपूर कापायचंय त्याला...”

परत हसले सगळे. त्यांनी ऑर्डर दिली. इतक्यात विश्वास म्हणाला, “अरे दादा, ते बघ, अम्या आणि राहुल बसलेत तिकडे, त्यांना भेटून आलोच रे...”

ते दोघंच उरले, विदुलाच्या हृदयाचे ठोके वाढले.

“विदुला, मला आडवळणानं बोलता येत नाही. मी तुम्हाला का बोलावलं ते सांगतो. मी एम.कॉम आहे, सी.ए. इंटर आहे. पुढच्या वर्षी फायनल देईन. मी स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये गेल्याच वर्षी लागलोय. सध्या अकाऊंट्स ऑफिसर आहे. पण मला फायनॅन्समध्ये इन्टरेस्ट आहे. सी.ए. झालो की ऑडिट साईडला शिफ्ट व्हायचं आहे मला. विश्वास माझा धाकटा भाऊ, बी.ए.एम.एस. करतोय, हुशार आहे. आम्हाला एक मोठी बहिण आहे, तिचं लग्न झालंय, तिला एक मुलगीही आहे, तिचं सासर पुण्यातच आहे. माझे बाबा म्हणजे रघुनाथदादा गोखले, कदाचित त्यांचं नाव ऐकलं असेल, आयुर्वेदाचार्य आहेत ते. मोठी प्रॅक्टिस आहे त्यांची. आई गृहिणी आहे. दोन्ही बाजूंनी काका-मामा असं मोठं कुटुंब आहे. राजेन्द्रनगरमध्ये आमचा छोटा बंगला आहे.”

’ वा! सगळे हुशार आहेत की. अरे बापरे, गोखले वैद्य! बडं प्रस्थ आहे. पण हे सगळं मला का सांगत आहेत?’ विक्रमच्या एकेक वाक्यावर विदुलाच्या मनात प्रतिक्रिया येत होती.  

“आता हे सगळं तुम्हाला का सांगतोय? कारण, आई माझ्यासाठी स्थळं बघत आहे. मुलगी बघायचे काही कार्यक्रम झालेत. त्या दिवशी आपली अचानकच भेट झाली. त्या ऍक्सिडेंटपासून गेले पंधरा दिवस मी फक्त तुमचा विचार करतोय. मी लग्नाला तयार झालो खरा, तरी बायको कशी हवी या प्रश्नाचं माझ्याकडे फार धूसर उत्तर होतं. पण तुम्हाला भेटलो आणि उत्तर सापडलं. बायको अशी हवी, तुमच्यासारखी. अवचित आलेल्या प्रसंगाने डगमगून न जाणारी, काळजी घेणारी, सहृदय, माणुसकी जपणारी, बुद्धीमान, स्वतंत्र विचारांची, मुळूमुळू न रडणारी... विदुला, तू एम.ए इकॉनॉमिक्स शिकत आहेस इतकंच मला माहित आहे. तुझं लग्न झालेलं नाहीये, हेही नक्की. ते ठरलं असेल, किंवा तुझ्या आयुष्यात ऑलरेडी कोणी असेल तर माझं हे सगळं बोलणं विसरून जा. पण तसं काही नसेल, तर माझ्याशी लग्न करशील का?”

हे ऐकून विदुलाच्या पोटात काहीतरी व्हायला लागलं, हृदय बंद पडेल असं वाटायला लागलं, श्वास थांबला, कान वाजायला लागले, तिने हाताने तोंड झाकून घेतलं. अं? लग्न? यांच्याशी? माझं? ती पूर्ण हादरली. “आई शप्पथ” हे दोनच शब्द ती पुटपुटायला लागली.

विक्रम फक्त तिच्याकडे पहात होता. त्यानं तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. तिला ठसका लागला.

“हळू! तू ठीक आहेस का?” त्यानं काळजीनं विचारलं.

“नाही!”

दोघंही गप्पच बसले मग थोडा वेळ.

“तुला कदाचित हे अनपेक्षितच असेल...”

“अर्थात! अहो, तुम्ही मला डायरेक्ट लग्नाचीच मागणी घालताय. तुम्हाला कळलं का तुम्ही काय बोललात ते? खूप मोठी गोष्ट आहे ही. हा जोक नाहीये ना? किंवा टाईमपास?” धक्क्याची जागा आता रागाने घेतली.

“नाही. विदुला, प्लीज. आय ऍम सिरियस. मला नीट माहित आहे मी काय बोलतोय ते. मी म्हणालो ना, मला आडवळणानं बोलता येत नाही. प्लीज माझ्या बोलण्यावर गांभीर्यानं विचार कर. वेळ घे. लगेच उत्तर द्यायला पाहिजे, असं कुठे आहे? मी तुझं उत्तर यायची वाट पाहीन. मी फक्त आज माझी बाजू सांगितली. ऍन्ड आय मीन इट. एव्हरी वर्ड.” तो तिच्या नजरेशी नजर भिडवून बोलत होता. त्याच्या बोलण्यात सच्चाई होतीच, सिरियसनेसही होता आणि कळकळही. हा जोक नव्हता, हे खरंच घडत होतं.

पण त्यात विचार करण्यासारखं तरी काय होतं?

“सॉरी. आय मीन थॅंक्यू. पण तरी सॉरी. मी जे काही तुमच्यासाठी केलं त्याला ’माणूसकी’ असं म्हणतात. आणि आयुष्यात माणुसकी दाखवणाऱ्या अनेक व्यक्ती तुम्हाला भेटतील. प्रत्येकाशी लग्न करणार आहात का तुम्ही? लग्नाचे निकष फार वेगळे असतात. कौटुंबिक माहिती, शिक्षण, पत्रिका हे तर आहेच, पण रंगरूप हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण अनुरूप आहोत असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटत असेल, पण एकदा तुमच्या घरच्यांना विचारून बघा. फार कशाला, तुमच्या भावाला विचारून बघा.”

“त्याला माहित आहे. आणि त्याला मान्यही आहे,” तो शांतपणे म्हणाला.

ती सटपटली. “असूदे. तो लहान आहे. लग्नाचा बाजार फार क्रूर असतो. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, माझ्यासारख्या सामान्य चेहऱ्याच्या मुलीला फार अपमान सहन करावे लागतात. आयुष्य म्हणजे सिनेमा नाही, एका प्रसंगावरून संपूर्ण आयुष्याचा डाव लावायला... तुम्ही तालेवार आहात, मोठी माणसं आहात, तुम्ही स्वत: देखणे आहात. तुमच्या स्थळावर सुंदर, श्रीमंत मुलींच्या उड्या पडतील. आम्ही अगदी साधे लोक आहोत, मला नको ती स्वप्न दाखवू नका प्लीज.” तिचा आवाज थरथरायला लागला.

“म्हणजे, तुझ्या स्वप्नात माझ्यासारखाच कोणी येतो तर!” त्यानं तिला शब्दांत पकडलं. “हे बघ, तुला जे मुद्दे वाटत आहेत ते माझ्या दृष्टीने मुद्देच नाहीयेत. मी सुंदर, श्रीमंत मुलीच्या शोधात नाहीये आणि माझ्या घरचेही. आणि ते सगळं राहूदे. लग्न ज्या बेसिसवर होतं तोच तू विसरतेयस. प्रेम! तू जशी आहेस- साधी, सरळ, पारदर्शक- मी त्याच्याच प्रेमात पडलोय, मी ’तुझ्या’ प्रेमात पडलोय विदुला.” थोडं पुढे झुकत त्याने थेट तिच्या डोळ्यांत पाहिलं.

आयुष्यात प्रथमच विदुला लाजून लालेलाल झाली.

क्रमश:

***

0 comments: