September 19, 2021

जब तू रबरू आया...

आमच्या निवासी सोसायटीमध्ये दर वर्षीप्रमाणे गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली. कोव्हिडच्या नियमांत बसणारा, कमी गर्दीचा उत्सव करायचा होता. जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या आणि अगदी ध्यानीमनी नसताना गणपतीच्या रोजच्या पूजेची तयारी माझ्यावर आणि एका मैत्रिणीवर दिली गेली. आधी एक सेकंदभर बिचकायला झालं. पण त्यातही, कोव्हिडचा धोका आहे, सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे असंख्य लोकांशी संपर्क येईल, आरतीच्या वेळी गर्दी होईल, सारखं बाजारात जावं लागेल, रिस्क असेल या गोष्टी लक्षातच आल्या नाहीत!! त्या ऐवजी, ’नीट होईल का माझ्याहातून?’ हीच प्रमुख शंका होती. नाव मागे घ्यायची मुभाही होती. पण मनानं कौल दिला... बाप्पा सेवा करायची संधी देतोय. होईल. करूया.  

लागलो उत्साहानं कामाला. याद्या केल्या, ज्येष्ठांकडून मार्गदर्शन घेतलं आणि ’श्रीगणेशा’ केला. सकाळ-संध्याकाळच्या आरतीसाठी यजमान शोधणं, प्रसादाची जबाबदारी, असंख्य फोन, मेसेजेस लिहिणं, ते योग्य लोकांपर्यंत पोचवणं, पूजेची कोरडी तयारी, आयत्यावेळेची तयारी, हिशोब ठेवणं, हास्यविनोद, गॉसिप्स... सप्टेंबरचे दहा दिवस कसे गेले कळलंच नाही. आणि ठरलेल्या वेळेला आमच्या सोसायटीत आमच्या बाप्पाचं अगदी उत्साहात, जल्लोषात आगमन झालं.

स्थापनेची तयारी चोख केली होती. गुरुजीही संतुष्ट वाटले. साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा झाली, पूजा झाली, दणक्यात आरत्या झाल्या, मंत्रपुष्पांजली झाली, प्रसाद वाटला गेला, फोटो तर सतत चालूच होते. असे दोन-अडीच तास प्रचंड गडबडीत गेल्यावर मांडवातली गर्दी एकदम रोडावली. आणि ज्याच्यासाठी सगळी धावपळ चालू होती त्या गणपतीच्या मूर्तीकडे तेव्हा कुठे माझं नीट लक्ष गेलं! दोन फुटी मूर्ती, सुरेख रंगकाम, सात्विक चेहरा, बोलके डोळे... गणपतीच्या मूर्तीत खरोखर ’प्राण’ आल्यासारखं वाटत होतं! दोन-तीन तासांपूर्वी साधीशी दिसणारी मूर्ती आता जिवंत वाटत होती. खरंच! माझ्या सासरी आणि अनेकांच्या घरी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती मी याआधी कितीतरी वेळा बघितलेली आहे. पण या मूर्तीशी का कोण जाणे, एकदम जवळीक वाटली. या वेळी इन्व्हॉल्व्हमेन्ट जास्त होती, म्हणून, का ही मूर्ती घरगुती मूर्तीपेक्षा पुष्कळ मोठी, life size होती, म्हणून? काय माहित! 

 


 

पण फार वेळ मूर्तीसमोर रेंगाळता आलं नाही. लोक दर्शनासाठी येत होते. घरचीही कामं होती. संध्याकाळची परत तयारी होतीच. हे चक्र सात दिवस असंच फिरत राहिलं. रात्री झोपलं की उद्या सकाळची तयारी, दुपारची कामं झाली की संध्याकाळची तयारी. दर वेळी तयारी तीच, पण कधी रिलॅक्स होता आलं नाही. सगळं नीट होतंय ना, काही राहत नाही ना, गुरुजींना सोपी जाईल अशी मांडणी होतेय ना, आरतीच्या वेळी अनावश्यक गर्दी होत नाही ना, ज्याला इच्छा आहे, त्याला आरती करायला मिळतेय ना, प्रसाद पुरतोय ना... एक ना दोन, शंभर व्यवधानं सतत होती. मी दर्शन घेणारे लोक बघायचे. ते मूर्तीला हात लावायचे, डोकं टेकवायचे, हात जोडून पुटपुटायचे. मला त्यांचा हेवा वाटायचा. किती पटकन मनमोकळं वागतात हे. मीही रोज ठरवत होते, की आज तरी गणपतीचं मन भरेपर्यंत दर्शन घ्यायचं, त्याच्या सेवेत काही कमी-जास्त झालं असेल तर त्याची क्षमा मागायची आणि मग आपलीही दुखणी त्याला सांगून ’काहीतरी कर बाबा’ म्हणून आळवणीही करायची... पण कसचं काय? एकदाही उसंत मिळाली नाही. मांडवात शिरलं की काहीतरी निस्तरण्यासाठी पुढ्यात असायचंच. गणपतीशी खास संवाद होतच नव्हता. आरती सुरू झाली की मात्र कोपऱ्यात उभं राहून त्याच्या राजस रूपाचं सुरेख दर्शन होत होतं. तो समाधानी वाटायचा. अर्थातच, हे सगळे माझ्याच मनाचे खेळ! त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलणार होते थोडेच? मूर्तीच ती. पण तो आपल्याहातून सेवा करवून घेतो आहे याची प्रचिती मात्र येत होती.

बघता बघता विसर्जनाची संध्याकाळ आली. गणपतीशी संवाद साधायचा राहिलाच होता. आता आज नाही, तर वर्षभर नाही! मनाशी ठरवूनच थोडी लवकर खाली उतरले. आत्ता मांडव रिकामा होता. गणपतीच्या चेहऱ्यावर तेच ते मंदसं, know-it-all हास्य विलसत होतं. आत्ता कोणतीही गडबड नव्हती, आरतीला पुष्कळ वेळ होता, कोणी दर्शनासाठीही ताटकळलं नव्हतं. मी आणि तो- जो हवासा एकटेपणा होता तो होता. पण आता त्याच्यासमोर गाऱ्हाणं मांडायला शब्दच सापडले नाहीत. घरून निघताना त्याच्या कानात काय काय सांगायचं, कशाच्या तक्रारी करायच्या, कोणती उत्तरं मागायची याची यादी तयार होती. आणि आता ते सगळं बोलायची वेळ आली होती, तर दातखिळ बसली होती. एरवी मनात सतत वादळं घोंघावत असतात. शांत बसलं की प्र्श्नांच्या वावटळी सुरू होतात. पण आत्ता मनही स्तब्ध झालं होतं. आता फक्त दिसत होतं त्याचं साजिरं रूप. कितीही साठवलं तरी समाधान होत नव्हतं. कसे माहित नाही, पण आपोआप डोळे झरायला लागले. या अश्रूंमध्ये कोणतेही अपमान, अवहेलना, तक्रारी मिसळलेल्या नव्हत्या. फक्त गहिवर होता. मन स्वच्छ करणारे, किल्मिषं दूर करणारे, सर्व शंका निमावणारे अश्रू होते ते! मी कधी झुकले, कधी त्याच्या पायावर डोकं टेकवलं... मला कळलंही नाही.  

सर उठा के मैने तो कितनी ख्वहिशें की थी

कितने ख्वाब देखे थे

कितनी कोशिशे की थी...

जब तू रूबरू आया...

जर तू रूबरू आया

नजरे ना मिला पाया

सर झुका के इक पल में

मैने क्या नही पाया?

गीतकार प्रसून जोशी यांचे हे शब्द मी शेकडो वेळा ऐकले आहेत. पण त्यांची ’प्रचिती’ त्या क्षणी आली. तो असा एक अलौकिक क्षण होता, ज्यात सगळं ’मी’पण गळून पडलं. सेवा सुफळ, संपूर्ण झाली.

 

॥गणपती गेले गावाला, खरोखर चैन पडेना आम्हाला॥ पुनरागमनायच! :)

0 comments: