September 1, 2021

होते कुरूप वेडे... (भाग १)

 कपडे आवरायला विदुला बेडरूममध्ये गेली. नेहा आणि रिया बेडवर आपापल्या मोबाईलमध्ये डोकी खुपसून बसल्या होत्या. कालच्या प्रोग्रामचे फोटो बघणं चालू होतं... ’ए वॉव’, ’कसला गोड आलाय हा’, ’अथर्वचे एक्स्प्रेशन्स बघ’ वगैरे कमेन्ट्सही चालू होत्या.

’फोटो हा किती महत्त्वाचा विषय झालाय ना!’ विदुलाच्या मनात आलं. तिलाही उत्सुकता होतीच. तीही त्यांच्यात सामील झाली.

“ए, मलाही दाखवा ना. हे कोणी काढलेले आहेत? आणि आपला फोटोग्राफर कधी देणारे सीडी?”

“बहुतेक आज देईल संध्याकाळी. हे सगळे फोटो वेगवेगळ्या लोकांनी काढलेले आहेत, काही माझ्या फ्रेन्ड्जनी, काही आपल्या नातेवाईकांनी. व्हॉट्सॅपवर आलेत, मी आपल्या फॅमिली ग्रुपवरही शेअर केलेत.” नेहा म्हणाली.

फोटो खरंच सुंदर आले होते. नेहा-अथर्वचा जोडा अगदी दृष्ट लागेल असा दिसत होता. लाईट्स, स्टेजवरची पुष्परचना, नेहाच्या साडीचा रंग अगदी शोभून दिसत होते.

तेवढ्यात ’मामी ना… वियर्ड एक्सप्रेशन्स देते नेहेमी’ असं म्हणत रिया खुसखुसायला लागली. नेहाही तिच्या मोबाईलमध्ये बघत हसली आणि विदुला कमालीची गोरीमोरी झाली. ’मामी काय गं, कॅमेरा समोर आला की काहीतरी होतं का तुला?’ रियाने तिचं चिडवणं चालू ठेवलं. ’हा बघ तुझा फोटो’, रियाने मोबाईल तिच्यासमोर धरला.

खरंच! तिचे साडी, दागिने सुंदर दिसत होते, पण चेहरा? चक्क कसनुसा होता. भुवया उडवलेल्या, नाक तिरकं, डोळे भलतीकडेच… फोटो काढणा-याने नेमकी नको ती मुद्रा टिपलेली होती! मुद्दाम करवून घेतलेला प्रोफेशनल मेक-अप, हेअरस्टाईल… कश्शा कशाचाही उपयोग झालेला नव्हता! नेहेमीप्रमाणे तिचे फोटो वाईटच आले होते. फोटो वाईट आले होते, कारण ती होतीच दिसायला अतिशय सामान्य!

कसनुसं हसत ती बाहेर हॉलमध्ये आली, तर बाहेर सगळे बसलेले होते. आपापल्या मोबाईलवरचे फोटो बघत कालच्या कार्यक्रमाबद्दलच बोलणं चालू होतं. विदुलानं सगळ्यांवर नजर फिरवली. सासरेबुवा थकले होते, पण चेहरा अजूनही गोरापान, प्रसन्न होता. पंच्याहत्तरी आली तरी सासूबाईंचं रूप ठसठशीत होतं. त्यांची तीनही मुलं अगदी त्यांच्या वळणावर गेली होती. मुलगी सुनिता तर जणू त्यांची कॉपीच, आणि नेहा-रियाही अगदी गोड होत्या दिसायला. सुनिताचे मिस्टर श्रीकांतही छान, स्मार्ट होते. विदुलाचा धाकटा दीर विश्वास आणि त्याची बायको अश्विनीही उंची-रंग-स्वभाव याबाबतीत एकमेकांना अनुरूप होते. या उलट ती आणि विक्रम... विदुलापेक्षा विक्रम उंच, गोरा होता, रुबाबदार दिसायचा. विक्रमपुढे तिचं साधारण रंग-रूप कधीच शोभलं नाही. एकंदरच या सगळ्या लोकांमध्ये ती कधीच फिट बसली नव्हती.

सुंदर, सुस्वरूप असं तिचं कुटुंब होतं आणि त्यांच्यातली तीच एक होती- ’वियर्ड!’

विदुलाच्या डोळ्यात पाणी आलं. चटकन ती स्वयंपाकघरात गेली.

***

आपल्या सगळ्या मैत्रिणी सुंदर आहेत, पण आपण नाही याची जाणीव विदुलाला पहिल्यांदा झाली कॉलेजमध्ये, अकरावीत.

तिला मोठी बहिण असूनही त्यांच्या’दिसण्याबद्दल’ तिच्या माहेरी कधीच चर्चा होत नव्हती. तिच्या आईकडेही प्रसाधन म्हणून फक्त फेस पावडर होती. पण, विदुला कॉलेजमध्ये गेली आणि हवाच पालटली. तिच्या सगळ्या मैत्रिणी गो-यापान, नाजूक, देखण्या होत्या. मोरपंखी वय होतं, प्रत्येकीचं देखणेपण आणखीनच खुलून आलेलं होतं. तिच्या प्रत्येक मैत्रिणीच्या आसपास कितीतरी मुलं घोटाळायची. मैत्रिणी कधी लाजून लाल व्हायच्या, कधी वैतागायच्या, कधी रागावायच्या. पण तेवढ्यापुरत्याच. त्यांना ते अटेंशन आवडत होतं. आपल्याकडेही कोणी बघावं, आपल्याशी बोलायला धडपडावं अशी विदुलालाही वाटायचं, पण तसं काही होत मात्र नव्हतं.  

पण तिला मात्र एक मुलगा आवडायला लागला. त्यांच्या वर्गातलाच होता. विदुलाला तो मॅच्युअर वाटायचा. ’त्याला आपण कदाचित आवडू’ असा आशावादही वाटत होता. मोठ्या हिंमतीने ती त्याच्याशी जुजबी बोलायला लागली. नवल म्हणजे तोही तिच्याशी बोलायला लागला, त्यामुळे विदुलाचा पतंग एकदम उंच उडायला लागला. ’हाच असेल का माझा स्वप्नातला राजकुमार?’ वगैरे वाटत असताना एक दिवस त्यानेच तिला विचारलं, “ऐक ना विदुला, प्राजक्ता तुझी खास फ्रेन्ड आहे ना... माझा इन्ट्रो करून दे ना तिच्याशी!” 

धत तेरे की! विदुलाचा चेहरा खर्रकन उतरला. प्राजूशी ओळख करून घ्यायची आहे म्हणून माझ्याशी मैत्री केली, नव्हे मैत्रीचं नाटक केलं! याला माझ्यात काहीच इन्टरेस्ट नाही, सगळी धडपड ब्यूटी क्वीन प्राजूसाठी! हमसाहमशी रडली बिचारी त्या दिवशी.

रडण्याचा पहिला जोर ओसरल्यावर त्या दिवशी तिनं आरशासमोर स्वत:ला पहिल्यांदा निरखून पाहिलं. तिला दिसला एक साधा चेहरा, साधेसे केस, साधासा रंग, साधीशी उंची, साधासा बांधा. एक साधीशी मुलगी तिच्याकडे बघत होती. तिलाच ती आवडली नाही, मुलांना कुठे आवडायला?  त्या दिवसापासून न्यूनगंडाला सुरुवात झाली.

याच न्यूनगंडाशी भांडण्याच्या नादात मग विदुलानं आणखी मूर्खपणे केले. पाय दुखायचे, तरी ती उंच टाचेचे बूट घालू लागली, न शोभणारे कपडे तिच्या कपाटात विराजमान झाले, आरशासमोर उभं राहून केसांचे विविध प्रकार करण्यात जास्त वेळ जाऊ लागला. एरवी स्पष्ट, खणखणीत बोलणारी ही मुलगी खाली मान घालून चक्क कुजबुजत बोलायलाही शिकली! पण व्यर्थ! तिच्या मैत्रिणींच्या ’मजनूं’च्या संख्येत भर पडतच होती, आणि इतकं करूनही विदुला बिचारी एकटीच होती.

याच निराशेपोटी विदुला एकदा मग एका ब्यूटी पार्लरची पायरी चढली. मोठ्या हिंमतीने तिने केसांचा लेटेस्ट हेअरकट करून घेतला. पार्लरवालीच्या दृष्टीने ती तेव्हाच्या एका प्रसिद्ध हीरॉइनसारखी डिट्टो दिसत होती. विदुलाही खूष झाली. पण घरी पोचल्यावर तिला बघताक्षणी ताई किंचाळली, “अय्या, आई, हे बघ भूत!” आणि खदाखदा हसू लागली. तिची आई आणि आजी धावतच बाहेर आल्या. “अगं हे काय ध्यान केलंय? बटा कापल्यास? कोणाला विचारून?” आजी कडाडली. आई तर अविश्वासाने नुसती बघत राहिली तिच्याकडे. नवीन फॅशनप्रमाणे केसांच्या दोन्ही बाजूच्या कापलेल्या बटा कपाळावर रुळत होत्या, बाकी केस खांद्यावर येतील इतके आखूड केले होते. आपण किती मोठा मूर्खपणा केलेला आहे हे आता कुठे तिला समजलं. ’मी कोणालाच आवडत नाही’ असं जोरात ओरडत तिने भोकाड पसरलं.

बारावीच्या परिक्षेसाठी आय-कार्डचा फोटो काढताना तर तिला ब्रह्मांड आठवलं होतं. होता ब्लॅक ऍन्ड व्हाईट फोटोच, पण तिच्या मैत्रिणींनी किती प्लॅनिंग केलं होतं त्यासाठी! ड्रेस, कानातलं, टिकली, केस सगळ्याची जय्यत तयारी होती. ही मात्र वेडेवाकडे वाढलेले केस कसे बसवायचे आणि कॅमेरासमोर हसायचं की नाही, या चिंतेत होती. कॅमेरात बघायची भीती बसली ती तेव्हापासून!    

त्यानंतर मात्र विदुलाने कानाला खडा लावला. आपण जशा आहोत तशा आहोत. बॉयफ्रेंड वगैरेची अशक्य स्वप्न न बघता आपण आपला अभ्यास करावा, ते बरं. एकदा ते दडपण झुगारल्यावर मग मित्र-मैत्रीणींबरोबर माफक मजा करत तिची कॉलेजची सगळी वर्ष छान पार पडली. मधल्या काळात मैत्रीणींच्या मजनूंची संख्या कमी-जास्त झाली, काही मैत्रीणी उघडउघड खास मित्रांबरोबर फिरायला लागल्या, कोणी गांभीर्याने अभ्यास करू लागलं, काही जणी तर छोटीमोठी नोकरीही करू लागल्या. विदुलानेही स्वत:चा मार्ग ठरवला. ती आर्ट्स साईडला होती. इकॉनॉमिक्स आवडत होतं, त्यातच पुढे शिकावं हेही तिचं ठरलं होतं.

***


ताईचं लग्न! विदुला कॉलेजच्या दुस-या वर्षाला असतानाची झालेली सर्वात धमाल गोष्ट होती ही! पण तेही इतकं सहजपणे कुठे जमलं होतं? त्या आधी बिचाऱ्या ताईला कांदेपोहे, अर्थात ’अरेंज्ड मॅरेज’च्या सगळ्या त्रासदायक चक्रातून जावं लागलंच. आईनं तिचं नाव वधू-वर सूचक मंडळात नोंदवलं आणि मग जोरदार हालचाली सुरू झाल्या. मंडळात जाणं, स्थळाची माहिती आणणं, ती ताईला वाचून दाखवणं, पत्रिका आणि फोटो पाठवणं आणि फोनवरून विचारणा करणं… आईची धडपड पाहून विदुलाला वाईट वाटायचं. ही कसली पद्धत आहे? मुलांना नको असते का बायको? मग त्यांच्याकडून का काही हालचाली होत नाहीत? मुलीकडच्यांनीच का विचारायचं? पण या प्रश्नांना उत्तरं नव्हती; किंवा उत्तरं द्यायची हिंमत कोणात नव्हती.

ताईचे बरेच कांदेपोहे झाले. सुरूवातीला उत्साह होता, पण कधी स्थळं अनुरूप नव्हती, कधी समोरच्यांच्या बड्या अपेक्षा होत्या. हळूहळू उत्साह कमी व्हायला लागला. दर वेळी काही ना काही विघ्नं येत होती. ताईला बरेच नकार पचवावे लागले. क्वचित तिनेही दोन-तीन ठिकाणी नकार दिला. आजी-आईला टेन्शन यायला लागलं. ताई त्या काळात सतत हिरमुसलेली असायची. ’ताई दिसायला छान, तरतरीत, तरी तिच्या लग्नात अडथळे! माझं तर काय होईल?’- विचारानेच विदुलाचा थरकाप व्हायचा.

पण हे दुष्टचक्र एकदाचं संपलं. ताईचं लग्न ठरलं!! आणि लग्न ठरल्यापासून ताईमध्ये इतका आश्चर्यकारक बदल झाला, की बास रे बास! सगळा कडवटपणा विसरला गेला, मळभ दूर झालं. ताई तिच्याशी गोड बोलायला लागली, आई आणि आजीच्या गळ्यात पडून सारखी रडायला लागली. ती तिच्या नव-याला एसटीडी बूथवरून फोन करायची आणि खूप हसायची. अरेंज्ड मॅरेज असलं तरीही प्रेम होऊ शकतं हे विदुलाला ताईकडे बघून अगदी नीटच समजलं. किती छान वाटत होतं ताईचं हे रूप! ताईचे मिस्टरही एकदम मस्त होते. ते ताईला भेटायला आले की विदुलालाच लाजल्यासारखं व्हायचं. त्यांनी तिला साधे प्रश्न विचारले, तरी तिच्या तोंडातून शब्द फुटायचा नाही.

ताईचं लग्न एकदम छान झालं, तिनं भरपूर धमाल केली, छान कपडे घेतले, दागिने मिरवले. ग्रुप फोटोंमध्ये तिला काही वाटलं नाही. पण आजीने फोटोग्राफरला अचानक ’हिचा एकटीचा फोटो काढा हो एक’ असं म्हणल्याबरोब्बर तिने तिथून पळ मात्र काढला.

***

मग पुढचे काही दिवस भराभर गेले. ताईचे सण-समारंभ, लगेचच तिचं बाळंतपण यात एक-दीड वर्ष सरलं, विदुलाही ग्रॅज्युएट झाली. ठरवल्याप्रमाणे तिनं एम.ए.ला प्रवेश घेतला. आता आई-बाबांचं नेक्स्ट मिशन होतं ’विदुलाचं लग्न’.

“विदुला, तुझं नाव नोंदवूया ना लग्नासाठी आता?”, आईनं एक दिवस हळूच विषय काढला.

या प्रसंगाला तोंड द्यायला लागणार याची अटकळ तिने बांधलेली होतीच. तिनं किल्ला लढवायला सुरूवात केली. “आई, अजून मी शिकतेय गं. मला आधी एम.ए. पूर्ण करायचंय, नंतर एम.फिल. करून प्रोफेसर व्हायचंय. हे लग्नाबिग्नाचं काय मध्येच?”

“मध्ये नाही, वेळेवरच आहे.” आईचा डिफेन्स एकदम स्ट्रॉन्ग होता. “अगं, शिक्षण थांबवायला सांगतंय का कोणी? ते चालूच राहील. पण स्थळं बघूया, तशी घाई नसली, तरी लग्नाचंही योग्य वय असतं ना बाळा? बर, तुझे छान फोटोही काढायला जाऊया दोन-चार दिवसांत. नाव नोंदवताना फोटो लागेल.”

 “फोटो???” विदुलाच्या पोटात खड्डा पडला. “ए, नाही गं आई. मला नाही काढायचाय फोटो. तुला माहीतेय की माझे फोटो चांगले येत नाहीत. मी नाही काढणार फोटो-बिटो.” विदुलाने जोरदार विरोध केला.

“मग तुझं तू ठरवतेस का? किंवा ठरवलं असशील तर, तसं लगेच सांग. म्हणजे मग माझ्या मागचा त्रासच संपेल. हे फोटो, नाव नोंदवणं वगैरे काहीच करायला लागणार नाही…” आई शांतपणे म्हणाली आणि विदुलाची बोलतीच बंद झाली.

साडी नेसून, केस नीटनेटके विंचरून ती फोटोग्राफरसमोर उभी राहिली तेव्हा प्रचंड अवघडलेली होती आणि रागावलेलीही होती. आपण दिसायला ब-या असतो तर खरंच एव्हाना आपापलं लग्न जमवलं असतं आणि हे असले प्रकार करावे लागले नसते असं सारखं तिच्या मनात येत होतं. शेवटी ते अनुभवी फोटोग्राफर म्हणाले,

“ताई, अगं जरा हास, दोन मिनिटात काम होईल आपलं. हे बघ, ही अशी तिरकी उभी रहा, एकदा या ऍंन्गलने इकडे बघ... मग त्या बाजूने...”

हसल्यावर छान दिसायची ती खरंच. एरवीही ती भरपूर हसायची, पण कॅमेरा समोर आल्यावर न्यूनगंड आपोआपच डोकं वर काढत असल्यामुळे चेहरा आपोआप विचित्रच व्हायचा. त्यात आज फार असहाय आणि हतबल वाटत होतं. चेहऱ्यावर कसंबसं कृत्रिम हास्य आणत, प्रचंड कॉन्शस होत तिने पोजेस दिल्या आणि एकदाचा तो सोपस्कार पार पडला.

चार दिवसांनी फोटो आले, अपेक्षेप्रमाणेच ते इतके काही खास नव्हते. रंग-रूप महत्त्वाचं नसतं, गुणच संसाराला उपयोगी येतात असं कोणीही कितीही म्हणलं, तरी लग्नाच्या बाजारात सुंदर मुलींनाच मागणी असते हे विदुलाला माहित होतं. ’हे फोटो पाहून कोण मला बघायला येणार?’- विदुलाच्या मनात आलं. तिचा स्वत:वरचा विश्वास डळमळीत झाला. फार निराश झाली बिचारी. कादंबऱ्यांमध्ये वर्णनं असतात, तशीच तीही एकाकी पडणार, निरस आयुष्य जगणार अशी खातरीच पटली तिची.

पण नियतीच्या मनात काय होतं?

 

क्रमश:

***  

0 comments: