July 27, 2021

श्रद्धा(?)

एका खोल खोल अंधारमय, तळ नसलेल्या विहिरीत आपण पडत आहोत असं काहीतरी अस्वस्थ करणारं स्वप्न पडत असतानाच इलाला खाडकन जाग आली आणि तिचे उघडले. पण डोळ्यांवर थेट पडणारी तीव्र प्रकाशाची तिरिप आणि त्याच क्षणी संपूर्ण शरीरातून सरसरत जाणारी वेदना तिला सहन झाली नाही. ती कण्हली आणि तिचे डोळे आपोआप परत मिटले. पण आता ती पूर्ण जागी होती.

“अगंबाई हिला जाग आली वाटतं…”

“गौतम, डॉक्टरना बोलाव.”

“नर्स… अहो, ही उठलीये…”

अनेक आवाज कानात शिरत होते. इला नुसतेच ते ऐकत होती. आपण कुठे आहोत, इथे इतका उजेड का आहे, आई, बाबा, दादा कधी आले, अंग इतकं का ठणकतंय, उजवा हात बधीर का वाटतोय, डावा पाय जड का वाटतोय… नुसतेच प्रश्नावर प्रश्न पडत होते.

“इला, इला उठलीस ना राजा? डोळे उघड बघू. तुला पाणी देऊ का?” 

मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले. आई काळजीने तिच्याकडे बघत होती. बाबा-दादा तिच्यामागेच उभे होते. ती आईला काही विचारणार, इतक्यात मागून डॉक्टर आले, आणि त्यांच्या मागे हवालदार.

तिच्या छातीला स्टेथस्कोप लावतच डॉक्टर म्हणाले, “हं, नाव सांगा तुमचं, पूर्ण नाव…”

ती नाव सांगेपर्यंत त्यांनी तिच्या डोळ्यात टॉर्च मारला, उजवा हात हलवून पाहिला, तेव्हा कोपरातून एक तीव्र वेदना गेली, ती कण्हली. त्यांच्यावर काही फरक पडला नाही. त्याच निर्विकारपणे त्यांनी तिच्या डाव्या पायाच्या नडगीवर स्टेथस्कोपच्या मागच्या बाजूने ’टकटक’ करून पाहिलं. शेजारीच तिचे एक्स-रे होते, ते परत एकदा वरच्या ट्युबलाईटच्या प्रकाशात पाहिले. मग हवालदाराकडे पाहून म्हणाले,

“या ठीक आहेत. तुम्ही स्टेटमेन्ट घेऊ शकता. यांच्याबरोबर कोण आहे?”

आई, बाबा आणि गौतम तत्परतेने पुढे झाले.

“हं, यांना कोणतीही गंभीर दुखापत नाहीये, सगळीकडे मुका मार आहे, पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे, प्लास्टर घालून ठीक होईल. प्लास्टर इथे घालायचं, का तुम्ही त्यांना दुस-या हॉस्पिटलमध्ये नेणार आहात, ते ठरवून नर्सला सांगा. डिस्चार्ज देऊ शकतो मी कधीही.” एकंदर त्यांचा स्वर ’ही ब्याद इथून लवकर गेली तर बरं’ असा होता.

“ताई, स्टेटमेन्ट द्या. काय झालं, कसं झालं, वेवस्थित डिटेलमध्ये सांगा.”

इला गोंधळली. कसलं स्टेटमेन्ट? कशाबद्दल विचारतायेत हे?

अचानक तिच्या स्मृती जागृत झाल्या.

“निखिल!” ती अचानक ओरडली. “निखिल कसा आहे? दादा, निखिल कसा आहे? कुठे आहे? तो बरा आहे ना?” घाबरंघुबरं होत तिनं विचारलं.

“आहे, तो ठीक आहे इला. घाबरू नकोस.”

“नक्की? नक्की ना? अरे कारची काच सगळी फुटली होती, त्याचे तुकडे त्याच्या चेह-यावर…. आणि त्याचे पाय अडकले होते…” इलाच्या डोळ्यासमोर एकदमच कालचं दृश्य आलं आणि ती शहारली, तिला ओक्साबोक्शी रडायला आलं.

“इला, इला बाळा रडू नकोस. निखिलला तुझ्यापेक्षा जास्त लागलेलं आहे, पण तो ठीक आहे... तू फोन करून आम्हाला बोलावून घेतलंस म्हणून तुमच्यावर लगेच उपचार सुरू झाले. हे घे, तू पाणी पी. नीट काय झालं ते सांग यांना. म्हणजे निखिलला आणि तुलाही आपण आपल्या घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवू शकू.” बाबांनी प्रेमानं इलाला धीर दिला.

इलाच्या डोळ्यासमोरून काल रात्रीचा अपघात जात नव्हता. अक्षरश: पाच सेकंदात केवढं काय झालं! तिला बारिकसारिक तपशील आठवत नव्हते, पण ठळक गोष्टी नक्कीच आठवत होत्या.

ती आणि निखिल काहीतरी बोलत होते. निखिलचा सीटबेल्ट लावलेला होता, तिचा नव्हता. उत्तेजित होऊन तिच्याशी बोलत असतानाच निखिलसमोर अचानकच तो ट्रक वळणावरून आला, आणि काही समजायच्या आत, धाऽऽऽड!!! ट्रक शब्दश: गाडीत घुसला. इतकी जोरदार धडक बसली, की इला जागची उडली, तिचं डोकं छताला आपटलं, तिचा उजवा हात तिने पुढे स्वत:ला वाचवायला केला, तो जोरात आपटला. त्याच वेळी पुढच्या दोन्ही एअरबॅग्ज ’भस्स’ आवाज करत दोघांच्याही तोंडावर उघडल्या. ट्रकच्या धडकेने निखिलची गाडी अक्षरश: मागे मागे ढकलली जात होती. काही सेकंदांच्या अंतराने सगळेच आवाज थांबले. गाडी स्टेबल झाली, तिने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले होते, ते उघडले. तिनं निखिलकडे पाहिलं, तर त्याचा संपूर्ण चेहरा रक्तबंबाळ झाला होता. धडकेमुळे गाडीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता, तो भाग चेपून आतल्या बाजूला आला होता. निखिलचे पाय अडकले होते आणि तो बेशुद्ध झाला होता. म्हणजे बहुतेक बेशुद्धच असावा. इलाने घाबरून त्याला हाका मारल्या, चापट्या मारल्या. त्याच्या तोंडातून कसलेतरी अस्पष्ट आवाज आले. इलाला हायसं वाटलं. आता तिचं लक्ष स्वत:कडे गेलं. तिची मान दुखत होती. तिला चक्कर आल्यासारखं होत होतं. पण मदत मागणं गरजेचं होतं. निखिलसाठी मदत मागायलाच हवी होती. तिनं दार उघडायचा प्रयत्न केला, पण ते घट्ट बसलं होतं. तिनं काच पूर्ण खाली केली, बाहेर मिट्ट काळोख होता. आणि पूर्ण शांतता. ट्रक ड्रायव्हर ट्रकमध्ये नव्हता. जवळ जिवंतपणाचं कोणतंही चिन्हच दिसत नव्हतं. हे असं कसं झालं? ते शहरापासून काही फार लांब आले नव्हते. हजार वेळा ती स्वत: या रस्त्यावरून गेलेली होती. या हायवेवर हे एकच वळण विचित्र होतं आणि नेमका तिथेच घात झाला होता.

इला जोराने किंचाळली. काहीच हललं नाही. अंधार होता, तसाच राहिला. काहीतरी करायलाच हवं होतं. मोबाईल. तिची पर्स तिच्या पायाशी पडली होती. तिनं त्यातला मोबाईल काढला. तो चालत होता, पण रेंज नव्हती. गाडीच्या दाराच्या खाली केलेल्या काचेतूनच तिनं स्वत:ला बाहेर काढलं. ती पडली. तिचा पाय मुरगाळला, तिला खरचटलं. पण तिला भान नव्हतं. मोबाईलच्या रेंज दाखवणा-या काड्यांकडे बघत ती धडपडत पुढे चालायला लागली. जमेल तसं पळायला लागली. शंभर-एक मीटर गेल्यावर रस्ता वळला आणि अचानक पूर्ण रेंज आली. ती कुठे होती? कुठे आले होते ते? हं. हायवेवरच्या एका छोट्या वाडीतल्या एका कॅफेत. निखिल. निखिलला कोण वाचवेल? पोलिस? दादा? कोणाला फोन करू? दादा. तिने दादाला फोन लावला. त्याने फोन घेईपर्यंत तिचे प्राण कंठाशी आले. पण त्याने एकदाचा फोन घेतला. फोनवर ती नेमकं काय बोलली हे तिला आठवत नव्हतं. तिला खूप रडायलाही येत होतं. रडता रडताच तिने अपघाताबद्दल आणि मदतीला येण्याबद्दल सांगितलं. मग मनाचा हिय्या करून तिने १०० क्रमांक डायल केला. त्या बाजूला एका ऑपरेटरने फोन उचलला. दादाशी बोलल्यामुळे ती आता थोडी शांत झाली होती. ऑपरेटर अनेक प्रश्न विचारत होता. पण त्याचं काहीही ऐकून न घेता, स्वत:चं नाव, निखिलचं नाव, त्यांचं साधारण लोकेशन आणि अपघात झाला आहे, इतकं सांगितलं हे तिला नक्की आठवत होतं. हे बोलता बोलताच बहुतेक तिला चक्कर आली होती, कारण त्यानंतर तिला थेट आत्ताच जाग आली होती.

किती वाजले होते? ती आणि निखिल निघाले तेव्हा जवळपास साडेदहा झाले होते.

“मद्यप्राशन केलं होतं का?” हवालदाराने अचानक विचारलं.

“अं? छे. काहीही काय? त्या ट्रक ड्रायव्हरने केलं असेल. प्रचंड वेगात होता तो. टर्नवर किती भयंकर जोरात वळला…”

“ते पाहू आम्ही. बर. इथे सही करा. मोबाईल नंबर लिहा. जेव्हा लागेल तेव्हा कोर्टात हजर व्हा. हं, तुम्ही इथे सह्या करा …” हवालदार त्याच्या कामाच्या मागे लागला.

इला आईकडे वळली. “आई, आपण कुठे आहोत? तू कशी आलीस? आई, निखिल कसा आहे? मला नीट सांग. मला पहायचं आहे त्याला.”

“शूऽ शूऽऽ. तू थोडी शांत हो बाई. खूप लागलंय तुला. निखिल ठीक आहे. तोही इथेच ऍडमिट आहे आत्ता. अगं, तुझा फोन आला तेव्हा किती घाबरलो आम्ही. दादाने ऍम्ब्युलन्सला फोन केला. दादाचे दोन मित्र, बाबा, आम्ही सगळे तू सांगितलं होतंस तिथे आलो, तर कोप-यावरच तू रस्त्याच्या कडेला पडलेली दिसलीस. तिथे पोलीस होते आणि काही बघेही होते. निखिलची गाडी बघितली. भयंकर गं बाई! तुम्ही वाचलात ही देवाचीच कृपा. बाहेर येऊन फोन करायचं कसं तुला सुचलं, कुठून तुला बळ आलं…” आईचा आवाज गहिवरला. तिने इलाला जवळ घेतलं.    

“इला, इलाऽऽ …” अचानक एक बाई मोठ्या आवाजात हाका मारत आल्या. इलाजवळ येऊन त्यांनी तिचे हात हातात घेतले. इला कळवळली, पण त्या स्वत:च्याच तंद्रीत बोलत होत्या. “माझी गुणाची बाई ती. माझ्या लेकराचा जीव वाचवलास. आत्ताच डॉक्टरांशी बोलणं झालं आमचं. अगदी वेळेवर निखिलला उपचार मिळाले, नाहीतर काय झालं असतं काय माहित. महाराजांची कृपा. त्यांनी तुला बुद्धी दिली, तुला हिंमत दिली. स्वत:ला इतकं लागलेलं असूनही निखिलसाठी किती केलंस पोरी. चला, चला, आम्ही निखिलला ’जीवनज्योती’ मध्ये नेतोय. तिथले डीन, डॉ. सरपोतदार निखिलच्या बाबांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. ऍम्ब्युलन्स मागवली आहे. इलालाही तिथेच यायचं आहे…”

इला स्तब्धपणे नुसतं ऐकत होती. निखिलची आई होती ती. एकदाच भेट झाली होती त्यांची. कालच. तीही पाच मिनिटं. ती निखिलच्या घरी गेली होती आणि तिथूनच ते बाहेर पडले होते. फॉर्मॅलिटी म्हणून पुसटसं भेटण-बोलणं झालं होतं, त्यात अवघडलेपणाच जास्त होता. ते निघाले तेव्हा, ’नीट जा, फार उशीर करू नका’ असं त्या म्हणाल्या होत्या. आणि आत्ता एकदम अधिकारवाणीने त्यांनी सगळी सूत्रच हातात घेतली होती.

’अहो इलाला इतकं काही लागलं नाहीये. घराजवळच्या छोट्या हॉस्पिटलमध्ये नेलं तरी चालणारे तिला…”, बाबांनी त्यांना सांगायचा प्रयत्न केला.

“पण आम्हाला नाही ना चालणार. तिच्या पायगुणामुळे आमच्या मुलाचा जीव वाचलाय. ते काही नाही, जीवनज्योतीमध्येच जायचंय आपण. ऍम्ब्युलन्स येईलच. मी इकडे व्हीलचेअर सांगते. इला, तू चाकाच्या खुर्चीतूनच ये. चालू नकोस. बाकी सामान काही नाहीये ना? तुम्ही तिचे भाऊ का? येता का माझ्याबरोबर जरा? डॉक्टरशी बोलायचंय मला परत, तुम्हीही या.” निखिलच्या आईने सगळ्यांचा ताबाच घेतला. इला कोणतंही मत द्यायच्या किंवा विरोध करायच्या स्थितीतच नव्हती. थकून तिने डोळे मिटून घेतले. पण का कोण जाणे, एक शब्द तिच्या डोक्यात घुमत राहिला, ’पायगुण’.  

***

यानंतरचे काही तास भयंकर धावपळीचे आणि थकवणारे होते. दोन ऍम्ब्युलन्सेसमधून निखिल, इला आणि इतर नातेवाईक, मित्र यांचा ताफा ’जीवनज्योती’मध्ये दाखल झाला. या भव्य हॉस्पिटलची स्वत:ची तपासणीची पद्धत होती आणि तिथे खुद्द रुग्णालाही कशालाही नकार द्यायची मुभा नव्हती. इलाने मुकाट्याने स्वत:ला तिथल्या डॉक्टरांच्या हवाली केलं. एमआरआय, रक्त, एक्स-रे, इंजेक्शन्स, आणखी कसकसल्या टेस्ट्स करून इलाला एकदाचं खोलीत नेलं, तेव्हा सकाळचे दहा वाजले होते फक्त. काल रात्री दहा ते आज सकाळचे दहा. बारा तासांत जग उलटं पालटं झालं होतं. इतक्यात नर्स एक ट्रे घेऊन हजर झाली. तिला हॉस्पिटलमधलंच खाणं खायचं होतं. पेशन्टच्या तब्येतीनुसार आखलेलं डायट फूड. इलाने त्याच्यापुढेही मान तुकवली.

“आई, तुम्ही आता सगळे घरी जा. तुम्हीही दमला आहात, आणि इथे माझी काळजी घेतली जातेय. तू रात्री ये आता एकदम आई, खरंच.”

“अगं पण इथे कोणीतरी हवं ना तुझ्याबरोबर. तुला एकटीला कसं…”

“एकटी कशाने?” निखिलच्या आईंना अचानक येण्याची सवय होती, का हे योगायोग होते, हे इलाला समजेनासं झालं. “ही बेल दाबली, की नर्स येईल. आणि निखिलची रूम इथेच पलीकडे आहे. आमचे बक्कळ नातेवाईक आहेत. इलाला आम्ही क्षणभरही एकटं सोडणार नाही. कोणी ना कोणीतरी इथे सतत असेल. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जा आता घरी. रात्री या आता एकदम. घरी सोडायला सांगू का कोणाला?”

त्यांना ’नाही’ ऐकून घ्यायची सवयच नसावी; असली तरी त्यावर त्यांचं उत्तर आधीच ठरलेलंही होतं. त्या प्रेमाने, मनापासूनच करत होत्या सगळं, पण त्या प्रेमात दुस-याच्या मताला काही जागा नव्हती. निखिलही असाच होता का? काय माहित. सगळे गेल्यावर इलाने चक्क अंग टाकून दिलं, नाश्त्याबरोबर किमान सहा गोळ्या खाल्ल्या होत्या तिनं. त्यांचाही परिणाम असावा. ती गाढ झोपली.

***

चार तासांनी तिला जाग आली ती परत एकदा अपघाताच्या दृश्यानेच. हं, काही दिवस आता हे असंच होणार. तिनं स्वत:लाच समजावलं. खोलीत एक अनोळखी मुलगी बसलेली होती. ती तिच्याकडे पाहून हसली. आणि लगेच बाहेर गेली. पाठोपाठ परत एकदा निखिलची आई आणि आणखी सात-आठ जण एकदमच आत आले. काही पुरुष होते, काही स्त्रिया.

“कशी आहेस आता? बरं वाटतंय ना? बरंका, ही इला, इला देसाई. हीच आपल्या निखिलबरोबर गेली होती काल आणि हिनेच निखिलचा जीव वाचवला. अगदी सत्यवान-सावित्रीच्या कथेसारखंच झालं, तेही लग्नाआधीच! फार भाग्याची मुलगी आहे हो. हिच्या पायगुणामुळे निखिल वाचला.” त्या हसत हसत म्हणाल्या, पण इला अस्वस्थ झाली. पायगुण कसला? साधी माणूसकी होती ती. साध्या गोष्टीचा किती मोठा इश्यु करतायेत या! आणि सत्यवान-सावित्री काय? बापरे! काल तिची आणि निखिलची केवळ दुसरी भेट झाली होती. त्यांचे सगळे नातेवाईक इलाकडे कौतुकानं, भक्तीभावानं बघत होते. तिला ते सगळंच असह्य झालं.  

“अहो, काकू, प्लीज. असं काही नाहीये”.

“नाही कसं, श्रद्धा ठेवावीच लागते कुठेतरी. नाहीतर हा चमत्कार झाला असता का? निखिलच्या सगळ्या टेस्ट झाल्या. तो अजूनही झोपलेला आहे, आमच्याशी काहीच बोलला नाहीये अजून, पण डॉक्टरांनी सांगितलंय की त्याच्या चेह-यावर कुठेही काच खोलवर गेली नाहीये. चेहरा एकदम व्यवस्थित आहे त्याचा. व्रण वगैरे काहीच राहणार नाहीत. आहे तसाच देखणा चेहरा राहील त्याचा. डाव्या पायात रॉड घालायचं ऑपरेशन तेवढं करावं लागणार आहे, पण एका महिन्यात पळायला लागेल तो! बघ, जीवावर आलेलं पायावर निभावलं फक्त. हे तुझ्यामुळेच घडलं की नाही? आणि अर्थातच बापू महाराजांच्या आशीर्वादामुळे!”

“खरंच गं बाई, महाराजांची कृपा.” एकीने त्यांची ’री’ ओढली, जमलेल्या बाकीच्यांनीही माना डोलावल्या. हं, हे महाराज. निखिलशी याच विषयावरून वाद झाला होता. हे आठवताच इला थबकली. तिच्या आईनं आधी विचारलं होतं, ’अपघात कसा झाला? निखिलचं लक्ष नव्हतं का रस्त्यावर?’ त्याचं कारण तिला तेव्हा आठवत नव्हतं. आत्ता एकदम आठवलं आणि तिच्या घशाला कोरड पडली.

“काकू, मला प्लीज पाणी देता?”

“हो गं हो. आणि हे जेवणही व्हायचं आहे ना तुझं. तुझ्या उजव्या हाताला लागलंय ना? थांब तुला भरवते. हे सगळं संपवायचं बरंका. बेचव असलं, तरी पौष्टिक असतं ते, तुला चटणी देऊ का? घरची ताजी चटणी आणली आहे, मीना आणतेस का गं? आणि किनई, तुझे आई-बाबा आले ना, की आपण पुढचंही ठरवून  टाकू…” त्यांनी परत एकदा तिचा ताबा घेतला. इला परत एकदा हताश झाली.

***

इला त्यानंतर दिवसभर अस्वस्थ होती. त्या दोघांची झालेली कालची भेट, त्यांचं संभाषण स्पष्टपणे तिला आता कुठे आठवायला लागलं होतं. साधारण एक महिन्यापूर्वी एका मॅट्रिमनी साईटवर इला-निखिल पहिल्यांदा भेटले. दोघांचेही तपशील एकमेकांना अनुरूप होते, म्हणून त्यांनी एकमेकांचे नंबर घेऊन चॅट करायला सुरुवात केली. त्यानंतर फोनवर बोलणं झालं, एकदा साधी भेट झाली. दोघेही एकमेकांना आवडले होते. दोघांनीही तसं आपापल्या घरी कळवलं होतं. आणि एकमेकांची आणखी चांगली, थोडी इनफॉर्मल ओळख व्हावी म्हणून ते काल लांब हायवेवर गेले होते. त्यांच्यात कोणतंही नातं निर्माण झालेलं नव्हतं. कदाचित झालं असतंही. पण त्यांच्यातलं शेवटचं संभाषण… इलाच्या डोक्यात ते बोलणं घुमत होतं.

निखिल म्हणाला होता, “मला तू आवडली आहेस. पण आपण एकमेकांमध्ये आणखी इन्व्हॉलव्ह होण्याआधी, तुला एक गोष्ट करावी लागेल. आम्ही सगळे बापू महाराजांना खूप मानतो. तुला त्यांनाही एकदा भेटावं लागेल. मीही येईन बरोबर. त्यांना माणसांची उत्तम पारख आहे, त्यांनी एकदा तुला पसंती दिली की मगच आपण पुढे जाऊया.”

हे ऐकून इलाच्या डोक्यात तिडिक गेली होती. एखाद्यावर श्रद्धा असणं एकवेळ ठीक. पण लग्नासारखे निर्णयही त्यांच्यावर सोपवायचे?

“त्यांची पसंती का घ्यायची? तुझी पसंती महत्त्वाची नाहीये?”

“माझी आहेच. पण त्यांचीही आहे.”

“तुझा या सगळ्यावर विश्वास आहे? सिरियसली? आणि त्यांना मी नाही पसंत पडले तर? आणि सपोज आपलं लग्न झालं तर मलाही त्यांची भक्त व्हावं लागेल?”

“अरे, झालीस भक्त तर काय बिघडलं? नो बिग डील. आमची भक्तीही काही आंधळी नाहीये. महिन्यातून एकदा त्यांच्या सत्संगाला आम्ही जातो. छान वाटतं. त्यांच्या सल्ल्यामुळे आम्हाला अनेकदा फायदा झाला आहे. आणि लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांची पसंती हवीच. आणि त्यांना पडशील तू पसंत, मला त्यात काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे.”

“आणि मला हाच नेमका प्रॉब्लेम वाटतोय निखिल. कोणाच्या तरी उपकाराखाली मी माझं आयुष्य नाही सुरू करू शकत. हा अधिकार फक्त तुझ्या आणि माझ्या फॅमिलीला आहे. इतर कोणालाही नाही.”

“काहीही काय बोलतेयस… उपकार काय, आशीर्वादच देतील ते. आणि आम्ही त्यांना फॅमिलीच मानतो.”

“सॉरी, पण मला हे मान्य नाही. तुला, तुझ्या आई-बाबांना माझ्याबद्दल काय वाटतं हे आणि हेच फक्त महत्त्वाचं आहे माझ्यालेखी. बाकी त्यांना मी आवडले तरी मला फरक पडणार नाही, आवडले नाही तरी पडणार नाही. मुळात मी त्यांना भेटायलाच येणार नाही.”

“तू एका साध्या छोट्या गोष्टीचा उगाच खूप मोठा इश्यु करतेयस असं नाही वाटत आहे का तुला? तुला स्वत:वर विश्वास नाही का? आणि माझ्यावर? बिलिव्ह मी, बापूंचा आशीर्वाद माझ्यासाठी फार गरजेचा आहे. मग जे माझ्यासाठी गरजेचं आहे, ते तुझ्यासाठी महत्त्वाचं नाहीये का? माझ्यासाठीही तू त्यांना भेटणार नाहीस का?”

“अरे हे तर सरळ सरळ इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. तू मला प्रेशराइज करतोयस निखिल.”

“काय? तू आता आरोप करतेयस माझ्यावर…” निखिल चिडला होता. पण या नंतर तो काहीही बोलला नाही. या विषयावर त्यांचं पटणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या दोघांचं नातंही पुढे जाऊ शकणार नाही, हे एव्हाना दोघांनाही कळून चुकलं होतं.

“हा तुझा शेवटचा निर्णय आहे, यात काहीच बदल होणार नाही?”, तो तिच्याकडे बघत म्हणाला आणि त्याच क्षणी!!! त्याच क्षणी तो ट्रक…

इलाला हे सगळं आठवून पुन्हा एकदा रडायला यायला लागलं. तिनं बेडजवळची बेल दाबली. नर्स धावतच आली. तिने तिला निखिलच्या आईला बोलवायला सांगितलं. पाच मिनिटात त्या आल्याच.

“काकू, निखिलला जाग येण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे…” म्लान चेह-याने ती म्हणाली. तिने हा सगळा प्रसंग त्यांना सांगितला. त्यांच्या चेह-यावरचे भाव झरझर बदलले.

“काकू, अप्रत्यक्षपणे निखिलच्या अपघाताला मीच जबाबदार आहे! आज आम्ही माझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहोत, हो, माझ्यामुळे. खूप खूप सॉरी, खरंच. मला हे माहित असतं, तर मी तेव्हा बोलले नसते. पण आमचं बोलणं अचानकच वेगळ्या ट्रॅकवर गेलं...आणि हे असं काहीतरी झालं! मला इतकं गिल्टी वाटतंय की मी तुम्हाला सांगू शकत नाही काकू, थॅंक गॉड, की निखिलला खूप मोठी दुखापत झाली नाही, नाहीतर मी स्वत:ला कधीही माफ करू शकले नसते. काकू, माझ्यात काहीही पायगुण वगैरे नाहीये. मी सावित्रीबिवित्री नाहीये. मी ते सगळे फोन केले, मदत मागितली ते माणुसकीच्या नात्याने, कर्तव्य म्हणून, ते तसं करायलाच हवं होतं म्हणून. आमच्यात काहीही रिलेशन नव्हतं. जे होऊ शकलं असतं ते तुटलं, तुमच्या त्या बापू महाराजांमुळे!”

“ए! तोंडाला लगाम घाल. महाराजांना यात आणू नकोस!” निखिलची आई जरबेनं म्हणाली.

“का नको आणू?” इलाही उसळून म्हणाली. “त्यांच्यामुळेच आमच्यात वाद झाले. तुम्ही कोणत्या बाजूला उभे आहात यावर सारंकाही ठरतं, हो ना? तुम्ही त्यांना मानत असाल, पण माझ्यासाठी तर ते अनलकी आहेत.”

 “बास बास! एक शब्दही या पुढे बोलू नकोस. प्रत्यक्ष महाराजांना अद्वातद्वा बोलतेस! बरं झालं मी स्वत: हे तुझ्याच तोंडून ऐकलं ते, नाहीतर माझा विश्वासच बसला नसता. तू अशी उद्धट, कुलक्षणी आहेस हे वेळीच कळलं हीदेखील महाराजींच कृपा…”

“अहो, त्यांची कसली कृपा? मी स्वत:हून बोलले हे. मी नसतं सांगितलं तर कसं कळलं असतं तुम्हाला?”

“ते तुला नाही समजणार. तुला हे कबूल करण्याची बुद्धीही महाराजांनीच दिली असं मी मानते. ठीक आहे. जे झालं ते झालं. निखिलचा जीव वाचला, यातच सगळं काही आलं. तुझा विश्वास नाही, हेही आधीच समजलं ते बरं झालं. नाहीतर पुढे फार अवघड झालं असतं. बरं झालं महाराजांना भेटली नाहीस तू... त्यांनी तुला कधीच स्वीकारलं नसतं. पण माझे शब्द लक्षात ठेव... देव दिसत नाही आपल्याला. पण हे महापुरुष असतात म्हणून आपण निर्धास्त जगू शकतो. तू एकदाच भेट महाराजांना… नाही तुला प्रचिती आली तर सांग…”

तत्या महाराजांबद्दल बोलत राहिल्या. त्या दोघींचे रस्तेच वेगळे होते. कोणालाच समजावणं शक्य नव्हतं. इला हताश झाली.

त्या महाराजांमुळे आपलं निखिलशी लग्न होऊ शकत नाही हे एका परीनं चांगलंच झालं, तेवढ्यापुरतं तरी त्यांच्याप्रती कृतज्ञ रहायला हवं, एवढं मात्र इलाने स्वत:शी मान्य केलं.

 

***

0 comments: