July 9, 2021

नाव महत्त्वाचं असतं!


Rich Aromatic Pearly-white Rice served with Sunshine Yellow Dal, topped with a spoonful of rich ghee and a dash of lemon- पदार्थाचं नुसतं वर्णन वाचूनच तोंडाला पाणी सुटलं ना? हा पदार्थ कोणता आहे माहितेय? अहो, आपला रोजचा ’वरण-भात’! कपाळावर हात मारून घेतलात ना? J J हीच तर महती आहे नावाची! आपल्याकडे महाराष्टात पदार्थांचं केवढं वैविध्य आहे! डावे, उजवे, मधले (पानातले पदार्थ हां), वाटीतले, गडूतले, आधीचे, नंतरचे... पण यातल्या काही अत्युच्च पदार्थांनी नावं म्हणजे... आजच्या भाषेत सांगायचं तर अगदीच ’put off’ करणारी आहेत!

मी हे असं म्हणल्याबरोब्बर तुमच्या मनात एक पदार्थ हमखास आला असणार आहे – अळूचं फतफतं! अळू शिजल्यावर ’फतफत’ आवाज करतो म्हणून ते फतफतं- मला, तुम्हाला, सगळ्यांनाच या शब्दाची युत्पत्ती ठाऊक आहे. बहुतांश लोकांना हा पदार्थ आवडतो देखील... पण ते नाव! एखाद्या उत्तम पदार्थाचं नाव जास्तीत जास्त किती अनाकर्षक असू शकतं त्याचं हे साक्षात उदाहरण आहे- अळूचं फतफतं!! मी लहान होते, तेव्हा घरात अनेकदा हे व्हायचं, लग्नकार्यात तर हमखास जिलबी-मसालेभात-बटाट्याची भाजी आणि हे फतफतं असाच बेत असायचा. त्यामुळे पदार्थ नवा नव्हता, पण त्याच्या या नावामुळे त्याच्याबद्दल कधी आस्थाही वाटली नाही. आस्था वाटली नाही, म्हणून तो कधी आनंदाने, उत्साहाने खाल्लाही गेला नाही. मग हळूहळू वय वाढलं, चव ’डेव्हलप’ झाली तसं जाणवलं की हा पदार्थ ’ऐकू येतो’ इतका काही वाईट नाहीये. शिजवलेला, मिळून आलेला अळू, त्यात आंबट चुका, भिजवलेले शेंगदाणे आणि डाळ (अहाहा!), भाजी मिळून यावी म्हणून त्याला लावलेलं डाळीचं पीठ, मधूनच तोंडात येणारा एखादा हिरव्या मिरचीचा तुकडा... गरमागरम अळू आणि पहिल्या वाफेचा साधा पांढरा भात आणि वर साजूक तूप! जगातला बेस्ट मेनू आहे! पण हा माईलस्टोन किती उशीरा येतो... ’फतफतं’ या नावालाच आधी अडखळायला होतं. हा पहिला प्रचंड मोठा अडसर दूर करता आला तरच हे स्वर्गसुख पदरी पडतं. आता आपल्या घरी ही भाजी होत होती, मोठ्यांच्या धाकाने आपण पानात पडेल ते (कुरकुर करत का होईना) खात होतो, म्हणून आपण चव तरी घेतली. पण या कशातरीच नावामुळे कित्येक नवखे लोक फतफत्याच्या वाटेलाच गेले नसतील, त्याच्या सुंदर चवीला आणि अप्रतिम ’टेक्स्चर’ला मुकले असतील, त्यांच काय? माझ्या म्हणण्यात तथ्य आहे की नाही? आहे. तेच! J

आता वर लग्नकार्याचा विषय निघाला आहे, तर त्यातलाच एक असाच अत्यंत बंडल नाव असलेला एक अत्यंत आवडता पदार्थ- मठ्ठा! मठ्ठा म्हणलं की वर्गातले मास्तर एखाद्या गरीब बिचाऱ्या विद्यार्थ्याचा कान धरून आख्ख्या वर्गासमोर त्याच्या बुद्धीचं माप काढत ओरडत आहेत हेच चित्र डोळ्यासमोर येतं! कुठे तो पांढराशुभ्र, जर्रासा आंबट, जरासा गोड, आलं-मिरचीचं वाटण आणि कोथिंबीरीची पखरण असलेला, कार्यालयातल्या बंपर जगांमध्ये काठोकाठ भरलेला गारेगार, फेसाळलेला अप्रतिम मठ्ठा... आणि कुठे हे एखाद्याची अक्कल काढणं! काही कम्पॅरिझन तरी आहे का? आं? म्हणजे नेमक्या कशाला मठ्ठा म्हणताय आणि कोणाची व्हॅल्यू कमी करताय? आणि का? हां, आजकाल यालाच ’मसाला ताक’ म्हणून खपवतात हां. पण त्याला ’मठ्ठ्या’ची चव नाही. त्यात जिरं, शेंदेलोण, पादेलोण घालून मठ्ठ्याचा पार रस्सा करून टाकलाय! या मठ्ठ्यासाठी काहीतरी त्याच्या स्टेटसला साजेसा मस्त शब्द शोधायला हवा.

आता हा सीन डोळ्यासमोर आणा- कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही काही अपरिहार्य कारणांमुळे घराबाहेर पडला आहात, कामं करून, दमूनभागून, घामेघूम होऊन तुम्ही घरी आल्या आल्या आई म्हणते, “दमलास ना बाळ? थांब हो, मी तुझ्यासाठी नाचणीची आंबील आणते.” लागली ना ठेच? माठातलं गार पाणी नाहीतर गेलाबाजार कोकम सरबत किंवा पन्ह्याची अपेक्षा असताना व्हॉट इज धिस आंबील? याईक्स! कसलं बोअर नाव आहे हे. काहीतरी आंबूस, आंबट, अंगावर काटा आणणारं काहीतरी वाटतं. हे नाव ऐकल्यावर ’क्या बात है! आंबील! एक नाही, दोन ग्लास आण’ असं उत्साहाने कोण म्हणेल? नावाला महत्त्व असतं हो. बाय द वे, नाचणीला सध्या फारच बरे दिवस आले आहेत. तिच्यात लोह आहे, कॅल्शिअम आहे, लो कॅलरी आहे, वेट लॉससाठीही परिणामकारक आहे वगैरे वगैरे. त्यामुळे तिची सुंदर, आकर्षक इंग्रजी नावं सध्या चर्चेत आहेत. ’रागी सूप’, ’रागी मॉल्ट’, ’फिंगर मिलेट रेसिपीज’ वगैरे. त्यामुळे का होईना, पण लोक नाचणीकडे वळलेत, हे काय कमी आहे? पण प्लीज नोट, त्यासाठी तिलाही पाश्चिमात्य लहेजा पतकरावा लागलाय!

तुम्ही खानदेशी ’बिबड्या’ खाल्ल्या आहेत? अतिशय ऑसम लागतात चवीला. या बिबड्या करण्याची पद्धत लांबलचक आणि अतिशय कष्टप्रद आहे. पण तळलेली ’बिबडी’ इतकी खुसखुशीत लागते की काय सांगू? एकच खटकतो- ’बिबड्या’ हा शब्द! इतक्या अवघड, कौशल्यपूर्ण पदार्थासाठी हा असा शब्द का? सेम विथ ’मासवडी’! शुद्ध शाकाहारी आणि एकदम खमंग असलेल्या या वडीत ’मास’ आल्यामुळे पहिल्यांदा ऐकलं की चरकल्यासारखं होतं, होतं की नाही?

अर्थात, आपल्याकडे पीयूष, चंपाकळी, पंचामृत, आम्रखंड, रंजका वगैरे खास नावं असलेले पदार्थही आहेतच, पण मोजकेच. आपण मराठी लोक फारच रोखठोक असल्यामुळे ’जे आहे ते’ या न्यायाने ’रव्याचे लाडू’, ’कारल्याची भाजी’, ’ताकातला चाकवत’ अशी स्पष्ट नावं पदार्थांना देतो. त्यात सौंदर्य कमीच. खरी सुंदर नावं असतात बंगाली पदार्थांची- राजभोग, संदेश, खीरमोहन, रसकदम, चमचम- वावावा. खरंतर या सगळ्याच पदार्थांमध्ये फक्त पनीर आणि साखर वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेले असतात. पण नावं काय शाही! एकदम थाट. त्यामुळे बाकी काही नाही, तर कुतुहल वाढतं, आपोआप दोन ’अंगूर’ तोंडात जास्त टाकले जातात. असं आपल्या पदार्थांचंही झालं पाहिजे. ’बेटा, मैने तेरे लिए ’फिरनी’ बनाई है’चं ग्लॅमर काहीही झालं तरी ’बाळा, तुझ्यासाठी किनई ’तांदळाच्या रव्याची खीर केलीये’ला नाहीच येत. पटतंय ना?

तर, मुद्दा कायये, की असे अनेक पदार्थ असतील... नाव अगदीच ओबडधोबड असलेले, पण चवीला एक नंबर. कोणी हेही म्हणेल, की ’नावात काय आहे? चवीशी मतलब!’ १०० टक्के सत्य. पण, कसं आहे, की पदार्थ तोंडात जाण्याआधी तो डोळ्यांना दिसतो, आणि तो डोळ्यांना दिसण्याआधी कानाला ऐकायला येतो. थोडक्यात काय, की पदार्थाचं नाव आधी कानाला आवडलं, तर आपोआप डोळे त्याच्याकडे वळतील आणि मग यथावकाश ’रसनातृप्ती’ही होईलच. म्हणूनच मी म्हणते, नाव महत्त्वाचं असतं.   

तर, आजपासून मी अळूच्या फतफत्याला त्याला न्याय देईल अशा नव्या नावाने हाक मारणार आहे-  ’मखमली अळू’!! तुमचं काय? :) 

       

1 comments:

Aishwarya Kokatay said...

नमस्कार,
आमच्या येत्या दिवाळी अंकासाठी लेख अगर कथा पाठवता येईल का? अभिप्राय कळवावा. नियमावली ची लिंक खालील प्रमाणे आहे. माझा इमेल kokatayash@gmail.com
https://www.marathicultureandfestivals.com/invitation-diwali-2021
Aishwarya Kokatay